दामोदर मावजोंना ‘ज्ञानपीठ’

|
08th December 2021, 12:33 Hrs
दामोदर मावजोंना ‘ज्ञानपीठ’

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : प्रसिद्ध कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना मंगळवारी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ज्ञानपीठ मिळविणारे मावजो हे कोकणीतील दुसरे साहित्यिक असून, याआधी २००६ मध्ये रवींद्र केळेकर यांना हा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मावजो यांच्यावर सर्वच क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.            

दामोदर मावजो गेली चार दशके साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. या कालावधीत कथा, कादंबऱ्या, नाटके, पटकथा, लघुकथा आदी प्रकार हाताळत त्यांनी कोकणी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झालेला आहे. मावजो यांच्या गाजलेल्या ‘कार्मेलिन’ या कादंबरीला १९८३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला आहे. आपल्या लेखणीतून कोकणी साहित्य समृद्ध करणाऱ्या गोमंतकीय सुपुत्राला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने तमाम गोमंतकीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.             

दरम्यान, साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मावजो यांना आतापर्यंत कोकणी भाषा मंडळ, गोवा कला अकादमी पुरस्कार, जनगंगा, राज्य संस्कृती, विश्व कोकणी केंद्राचा विमला वि. पै साहित्य पुरस्कार आदी प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या ‘सूड’ कादंबरीवर चित्रपटाची निर्मिती झालेली असून, काही कथा दूरदर्शनवरून प्रसारीत झाल्या आहेत.            

साहित्यातून अंधश्रद्धेवर प्रहार!            

दामोदर मावजो यांनी आपल्या साहित्यातून अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केले आहेत. सर्वसामान्य जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रसिद्ध विचारवंत एम.  एम. कलबुर्गी तसेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्यानंतर मावजो यांनी आपले अंधश्रद्धेविरुद्धचे विचार जाहीरपणे मांडलेले होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण झालेला होता.