राज्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्या

माकड केळी बागायतीचे नुकसान करीत आहेत; रानडुकर, गवे रेडे हे बागायतींमध्ये घुसून नुकसान करीत आहेत, काजूच्या झाडांना कीड लागून काजूची झाडे मरत आहेत.

Story: विचारचक्र | वल्लभ केळकर |
08th December 2021, 12:00 am
राज्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्या

शेतीला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटला जातो.परंतु सगळीचकडे शेतकऱ्यांची स्थिती ही विदारक झाली आहे.गोव्यात पेडणे, सत्तरी, सांगे, काणकोण हे शेतीसाठी प्रसिद्ध आहेत,तसे संपूर्ण गोव्यात शेती व बागायती केली जाते.जसा काळ पुढे जातो आहे,तसे शेतकरी वर्ग शेतीकडे पाठ करून दुसऱ्या क्षेत्रात जात आहेत.कारण शेती करून पोट भरता येईल या गोष्टीवर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही. आज या विषयावर लिहिण्याचे कारण की सध्या सत्तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुरुवातीला एक मेळावा व पुढील आठवड्यात जाहीर धरणे कार्यक्रम आयोजित केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतीप्रधान देशात शेतकरीच का हवालदिल होतो?त्याच्याकडे का दुर्लक्ष केले जाते.या गोष्टींवर चिंतनाची गरज आहे.

शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न : गेले वर्षभर आपल्या देशात शेतकरी(एका ठराविक भागातील)आंदोलन सुरू आहे.सरकारला वेठीस धरून त्या शेतकऱ्यांनी देशातील अन्य भागात उपयोगी होणारे कृषी कायदे मागे घेण्यास सरकारला भाग पाडले.याचा अर्थ असा होतो,आपल्या ताकदीच्या व झुंडशाहीच्या जोरावर सरकारला  जेरीस आणता येते,तीच गोष्ट गोव्यात मायनिंग व टॅक्सी आंदोलनाने सिद्ध केली. सत्तरीसह गोव्याच्या इतर भागात सुद्धा जंगली प्राण्यांच्या संकटामुळे लोकांची शेती व बागायती उध्वस्त होत आहे व त्याच्यावरच जगणारा शेतकरी  हवालदिल झाला आहे. इतकी वर्षे खर्च जास्त  व उत्पन्न कमी अशी स्थिती होती, परंतु आता जंगली प्राण्यांच्या संकटामुळे नारळ, सुपारी, केळी, काजू  व इतर उत्पादनांवर खूप मोठा परिणाम झाला आहे व फक्त हतबल होऊन पाहण्यापेक्षा शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिले नाही. सत्तरी तालुक्यात माकड, खेती, शेकरा, रानडुक्कर, गवे रेडे, मोर, साळ या व इतर प्राण्यांनी शेती करणे अशक्य  केले आहे. उदाहरण सांगायचे झाल्यास ५ ते १० हजार नारळाचे उत्पादन घेणारा शेतकरी आज नारळ विकत घेत आहे, यावरून नुकसानीचा अंदाज यावा. 

शेतकऱ्यांचा आक्रोश व सरकारचे दुर्लक्ष : गोव्यात निवडून येणारे प्रत्येक सरकार लोकांना शेती करा, शेतीकडे वळा, म्हणून सांगते,परंतु प्रत्यक्षात शेतकरी कोणत्या परिस्थितीमधून जात आहे, याबाबत त्यांना काहीच फरक पडत नाही. शेकरा, खेत्यांनी नारळ उत्पादनाची वाट लावली आहे, माकड केळी बागायतीचे नुकसान करीत आहेत; रानडुकर,गवे रेडे हे बागायतीमध्ये घुसून नुकसान करीत आहेत, काजूच्या झाडांना कीड लागून काजूची झाडे मरत आहेत. फक्त लोकांना उपदेश करण्यापेक्षा मुख्यमंत्री, कृषिमंत्री (बहुतेक बाबू कवळेकर असावेत)यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. हल्ली मुख्यमंत्री सोडून इतर लोकांची खाती लक्षात राहतच नाहीत,कारण त्यांचे अस्तित्वच लक्षात येत नाही. 

पिकांचे रक्षण कसे करायचे? : सत्तरी तालुक्यातील भात शेतीच्या बहुतेक जमिनी अशाच पडून आहेत,त्यामागे दोन गोष्टी आहेत,एक तर लोकांना खर्च आणि उत्पन्न यांची सांगड घालताना खूप मोठी कसरत करावी लागते.कामगारांची समस्या,तसेच बियाणे,खते यांचे वाढणारे दर व जंगली जनावरे करीत असलेली नासाडी यामुळे लोकांनी शेती सोडून दिली आहे.दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानात मिळणारे स्वस्त धान्य हेही कारण आहे. ब्रिटिश काळात लोकांनी शस्त्र हातात घेऊ नये, म्हणून त्यावर अनेक बंधने लादली होती व सातत्याने त्यांच्याकडून शस्त्रे काढून घेतली जात होती व त्यासाठी कायदे केले होते. आज शेतकऱ्यांकडे शस्त्रेच नाहीच,त्यामुळे पिकांचे रक्षण कसे करावे हा मोठा प्रश्न आहे. प्राण्यांना संरक्षण आहे,पिकांचे काय? ही मोठी समस्या आहे.आज बंदुकीचा परवाना मिळणे कठीण झाले आहे,परवाना मिळाल्यास अनेकवेळा बंदुका सरकारकडे जमा कराव्या लागतात.त्याला लागणाऱ्या काडतुसांची किंमत शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेली आहे.

काही लोकांचे अजब तर्कट : सत्तरीच्या लोकांनी जंगली जनावरांची समस्या मांडायला सुरुवात केल्यानंतर काही लोकांनी शेतकऱ्यांची बाजू घेण्याऐवजी जनावरांची बाजू घेऊन अजब तर्कट मांडण्यास सुरुवात केली आहे.त्यांचा एक ठराविक निष्कर्ष असतो,तो म्हणजे लोक प्राण्यांच्या अधिवासात घुसले आहेत, परंतु सत्तरीतील किंवा कोणताच शेतकरी जंगलात शिरत नाही,गेली शेकडो वर्षे सगळे शेतकरी त्याच ठिकाणी आपली शेती करीत आहेत. अनेक समस्या असून सुद्धा त्यांनी कधी पणजीचा मांडवी पूल अडवून लोकांना व सरकारला वेठीस धरले नाही. संख्येच्या जोरावर आपल्या मागण्या मान्य करून घेता येतात(त्या अनुचित असल्या तरी) याची उदाहरणे गोव्यात आहेत. प्रसंगी ते कायदे मोडतात, गुन्हे करतात, परंतु त्यांच्यावरचे सगळे गुन्हे माफ केले जातात.ही वस्तुस्थिती आम्ही बघितली आहे. 

सत्तरीत सरकार दारी कधी येणार : गेले दोन महिने सरकार आले दारीच्या! बातम्या रोज येत आहेत,म्हणून सहज चौकशी केली तर लक्षात आले,वाळपईत अजून ते पोचले नाही. ते पोचल्यास अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना आपली बाजू मांडता येईल. त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. 

पुराचा फटका : यंदा सत्तरीत आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे,या पुरात अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे,अशा आपत्तीत लहान शेतकरी भरडला जातो,सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट केली. त्याचा परिणाम सुपारी बागायती बरोबर,सत्तरीतील प्रमुख उत्पादन असलेल्या काजू पिकावर होणार आहे,खाण भागातील लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असलेल्या सरकारने वन्य पशु व निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदतीचा हात द्यावा व त्यांच्यावर  रस्त्यावर येण्याची पाळी आणू नये.