मला निवडून द्यावे की नको, जनता ठरवेल

आमदार जोशुआ यांचे स्पष्टीकरण : म्हापशाचा विकासासाठी प्रयत्नरत


07th December 2021, 11:56 pm
मला निवडून द्यावे की नको, जनता ठरवेल
  • प्रतिनिधी । गोवन वार्ता
    म्हापसा :
    पक्षाची मलाच उमेदवारी मिळेल किंवा राजकारणात मला दीर्घ कारकीर्द आहे, असे वाटत असल्यामुळेच पक्षातील काहीजण माझ्याविषयी अपप्रचार करीत आहेत. पण मी म्हापशाचा विकास करण्यासाठी पुढे आलो आहे. मला निवडून द्यावे की नको, हा निर्णय सर्वस्वी म्हापशाची जनता घेईल, असे स्पष्टीकरण आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिले.
    म्हापशातील लोकांना यावेळी बदल हवा. नवीन चेहर्‍याला संधी द्यावी, अशी लोकांची भावना आहे. भाजपने जनतेच्या या भावनेचा आदर न केल्यास लोक आपल्याला हवा तो चेहरा निवडून देतील, असे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या विरुद्ध म्हापशाचे माजी नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी सोशल मीडियावरून जाहीर वक्तव्य केले आहे.
    गणेशपुरी येथे एका कार्यक्रमस्थळी याविषयी आमदार जोशुआ डिसोझा यांना प्रश्न केला असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
    फळारी यांनी आपल्याविषयी दिलेला अभिप्राय हा त्यांचा एकट्याचा नसून इतर इच्छुकांच्या वतीने तो दिलेला आहे. कोणत्या आधारावर आणि कुठच्या सर्वेवरून ते बोलत आहेत, हे मला माहीत नाही. आम्हीही सर्वे केलेला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत आपण केलेले काम आणि आमदार म्हणून केलेल्या कामगिरीनुसार म्हापशातील जनता आपल्या पाठीशी राहील, असा आपल्याला ठाम विश्वास आहे, असे डिसोझा म्हणाले.
    फळारी यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यासंबंधी आपण पक्षाकडे तक्रार करणार नाही किंवा कारवाईची मागणी करणार नाही. कारण पक्षाला हा उठसूठ इतरांच्या तक्रारी करीत आहे, असे वाटेल. पण फळारी यांनी खुले वक्तव्य केले आहे. त्याकडे पक्षाचे लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा निर्णय पक्षाने घ्यायला हवा. अन्यथा लोकांनी काय तो निर्णय घ्यायला हवा, असे डिसोझा म्हणाले...
    कुणाला खाली पाडून नव्हे, गुणवत्तेवर इथपर्यंत
    आपण येथे कुणाला खाली पाडून वर आलेलो नाही, तर आम्ही आमच्या गुणवत्तेवर वर आलेलो आहे. लोकांनी पाठिंबा दिला म्हणून आज आपण आमदार आहे. वयाच्या ३० व्या वर्षी आमदार होईन असा आपण कधी विचारही केला नव्हता. माझे हितचिंतक भरपूर आहेत. पक्षातील मंत्री, आमदार आहेत. लोकांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे. मला वर काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सदोदित पाठबळ देतात. हे सर्वजण आहेत, त्यामुळे मला कसलीच भीती नाही, असा विश्वास आमदार जोशुआ डिसोझा यांनी व्यक्त केला.
    आपण दोन वर्षांत बरीच विकास कामे केली आहेत आणि मी ३० वर्षाचा आहे. वडील ख्रि. बाबुश डिसोझा हे १९९९ साली आमदार बनले. त्यावेळी ते युवकच होते. २० वर्षांनी ते त्या उंचीवर पोचले. १५ वर्षांनी त्यांना पालिका मंडळावर सत्ता स्थापन करता आली. माझ्याकडे दुरदृष्टी आहे. म्हापशासाठी काम करण्यास पुढे आलो आहे. म्हापसावासीयांना उत्कृष्ट आणि पूर्ण सुविधांसहित मॉडर्न सिटी द्यावी, अशी आपली इच्छा आहे, असे डिसोझा यांनी सांगितले.