एफसी गोवाचा पहिला विजय

चुरशीच्या सामन्यात एससी ईस्ट बंगालला ४-३ असे नमवले


07th December 2021, 11:28 pm

पणजी : हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या या पर्वातील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या एफसी गोवा व एससी ईस्ट बंगाल यांच्यातील सामना कमालीचा चुरशीचा झाला. दोन्ही संघांकडून तोडीसतोड खेळ झाल्याने फुटबॉल चाहत्यांना खेळाचा मनमुराद आस्वाद लुटता आला. ईस्ट बंगालच्या अँटोनियो पेरोसेव्हिचची कामगिरी या सामन्यात वरचढ ठरली. पण, त्याच्याकडून झालेला स्वयंगोल सामन्यात निर्णायक ठरला. एफसी गोवाने ४-३ अशा फरकाने आयएसएलच्या या पर्वातील त्यांच्या पहिल्या विजयाची नोंद केली.
दरम्यान, एफसी गोवा संघाकडून अल्बेर्टो नोग्युराने दोन गोल केले. सुरुवातीला संथ वाटणारा खेळ हळूहळू रंगत गेला अन् त्यात एफसी गोवाचे डावपेच वरचढ ठरले. १४व्या मिनिटाला आक्रमणपटू जॉर्ज ऑर्टिझच्या पासवर स्पॅनिश मध्यरक्षक अल्बेर्टो नोग्युरा याने ३० यार्डावरून सुरेख गोल केला. या गोलने गोवा संघाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. परंतु, प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव दिसले नाही. हा गोल सांघिक कामगिरीपेक्षा वैयक्तिक कामगिरीमुळे झाल्याने कदाचित ते तितके आनंदी झाले नाहीत. १६व्या मिनिटाला गोवाला ही आघाडी आणखी मजबूत करण्याची संधी होती. अल्बेर्टो व ऑर्टिझ ही जोडी पुन्हा गोल करण्यात यशस्वी ठरेल असेच चित्र अखेरपर्यंत वाटत होते. पण, ऑर्टिझला चेंडूला अंतिम दिशा दाखवण्यात हलकीशी चूक झाली.
२६व्या मिनिटाला एससी ईस्ट बंगालकडून बरोबरीचा गोल झाला. आमिर डेर्व्हीसेविचने मिळालेल्या फ्री किकवर चेंडू गोलजाळीच्या दिशेने भिरकावला. परंतु, गोवाच्या बचावपटूच्या डोक्यावर आदळून तो माघारी आला. तेव्हा डेर्व्हीसेविचच्या शेजारीच उभ्या असलेल्या अँटोनियो पेरोसेव्हिचने लेफ्ट फूटने चेंडूला दिशा दाखवली अन् चेंडू गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगला चकवून गोलजाळीत विसावला. ईस्ट बंगालच्या बरोबरीच्या गोलला गोवा संघाकडून लगेच उत्तर मिळाले असते. परंतु, देवेंद्र मुरगावकर याने २८व्या मिनिटाला आघाडी घेण्याची सोपी संधी गमावली. ३२व्या मिनिटाला पेनल्टीक्षेत्रात बंगालच्या बचावपटूने खेळाडूला चुकीच्या पद्धतीने पाडल्यामुळे गोव्याला पेनल्टी मिळाली. ऑर्टिझने त्यावर कोणतीच चूक न करताना गोव्याला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
पण, हा थरार इथेच थांबणारा नव्हता. ३७व्या मिनिटाला ईस्ट बंगालने बरोबरीचा गोल केला. डेर्व्हीसेविचने फ्री किकवर अप्रतिम गोल केला. त्याने टोलावलेला चेंडू अर्धवर्तुळाकार दिशा घेत गोलजाळीत सहज विसावला. ४४व्या मिनिटाला सामन्याला आणखी एक रंजक वळण मिळाले. कॉर्नरवरून आलेला चेंडू देवेंद्रने हेडरद्वारे गोलजाळीच्या दिशेने धाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नशीबाची साथ मिळाली. बंगालचा खेळाडू पेरोसेव्हिचच्या स्वयंगोलने गोव्याला इथे ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये बंगालने डॅनिएल चिमा व आदील खान या दोन बदली खेळाडूंना मैदानावर उतरवले. पहिल्या हाफमध्ये केलेल्या स्वयंगोलची भरपाई पेरोसेव्हिचने लगेच केली. ५९व्या मिनिटाला गोवा संघाच्या बचावपटूंकडून झालेल्या चुकीचा फायदा उचलत पेरोसेव्हिचने बंगालसाठी बरोबरीचा गोल केला. सामना ३-३ असा बरोबरीत आल्याने पुन्हा चुरस वाढली. ६१व्या मिनिटाला देवेंद्रने गोवा संघासाठी आघाडीचा गोल जवळपास केलाच होता. परंतु, चेंडू गोलखांब्याशेजारून गेला. ६६व्या मिनिटाला बंगालचा गोलरक्षक सुवम सेन याने गोव्याचा गोल अडवला. ७८व्या मिनिटाला पेरोसेव्हिचचा एक प्रयत्न गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंगने अडवला, पण तो रिटर्न डॅनिएल चिमाकडे गेला. मात्र, त्याला गोल करता आला नाही. ७९व्या मिनिटाला नोग्युराने गोवा संघाला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली आणि ती अखेरपर्यंत कायम राखताना विजय पक्का केला.