हैदराबाद समोर आज बंगलोरचे आव्हान


07th December 2021, 11:24 pm

हैदराबाद एफसीचे खेळाडू सराव करताना.

गोवा : हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसी व बंगलोर एफसी हे दक्षिणेकडील दोन तगडे क्लब बुधवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. हिरो आयएसएलमध्ये हैदराबादविरुद्ध बंगलोर अपराजित आहे. या दोघांमध्ये झालेल्या चार सामन्यांत बंगलोरने १ विजय मिळवला आहे तर त्यांचे तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. मनोलो मर्क्यूज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हैदराबाद एफसी संघ गुणतक्त्यात चार गुणांसह सातव्या स्थानावर आहेत.
डावातील पहिल्या हाफमधील संघाच्या कामगिरीवर प्रशिक्षक मर्क्यूज हे काहीसे नाराज आहेत आणि बंगलोरविरुद्ध त्यात सुधारणा करण्याचा त्यांचा मानस आहे. बंगलोर संघाला मागील सामन्यात टेबल टॉपर मुंबई सिटी एफसीकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे चार सामन्यांत त्यांना एकच विजय मिळवता आलेला आहे आणि चार गुणांसह ते आठव्या क्रमांकावर आहेत. मात्र, प्रशिक्षक मार्को पेज्जाइओली यांनी मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही खेळाडूंच्या सकारात्मक भावनेवर समाधान व्यक्त केले. त्या सामन्यात क्लेइटन सिल्वा याने पहिल्या दहा मिनिटांत गोल केला होता. पण, हैदराबाद एफसीने त्यांच्या दुसऱ्याच सामन्यात मुंबई सिटी एफसीवर ३-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यात हैदराबादचे पारडे जड असेल, असा अंदाज आहे.
बंगलोरने यंदाच्या पर्वाची सुरुवात विजयाने केली. त्यांनी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीवर ४-२ असा दणदणीत विजय मिळवला होता. परंतु, त्यानंतर त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले. दोन्ही संघ आपापल्या खेळात सुधारणा करून पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. मर्क्यूज म्हणाले की, आम्हाला सातत्यपूर्ण खेळाची आवश्यकता आहे. लीगमधील सर्वच संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे निकालांत चढउतार पाहायला मिळत असून सत्राच्या अखेरच्या टप्प्यातील संघाची क्रमवारी निर्णायक ठरणारी आहे. हलिचरण नार्झरी आणि मोहम्मद यासीर हे बंगलोरविरुद्धच्या लढतीत खेळणार नाही. हलिचरण पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल परंतु. यासीरला बराच काळ मैदानापासून दूर रहावे लागेल.
हैदराबादला रोखणे हेच आमचे लक्ष्य
बंगलोरचे प्रशिक्षक पेज्जाइओली यांनी सांगितले की, ही निराशाजनक सुरुवात आहे असे मला वाटत नाही, आम्ही त्यात सुधारणा करू शकतो. आमच्या बचावफळीचा खेळ आणखी चांगला झाला असता, हे मी मान्य करतो. परंतु, तुम्ही जेव्हा ते सर्व सामने पहाल, तर प्रतिस्पर्धींना फार कमी संधी मिळाल्या. त्यामुळे आम्हाला हैदराबादला गोल करण्यापासून रोखायचे आहे आणि तेच आमचे लक्ष्य आहे. दरम्यान, सुनील छेत्री याचा फॉर्म हा आमच्यासाठी चिंतेचा विषय ठरतोय. चार सामन्यांत छेत्रीला एकही गोल करता आलेला नाही.