अॅशेस मालिकेला आजपासून प्रारंभ

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पहिली कसोटी


07th December 2021, 11:23 pm
अॅशेस मालिकेला आजपासून प्रारंभ

सिडनी : कसोटी क्रिकेटमधील सर्वात जुनी लढत अॅशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशस मालिका ४२ दिवस चालणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ यावेळी नव्या कर्णधारासह म्हणजेच पॅट कमिन्ससह मैदानात उतरेल.
अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होत असली तरी संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या मालिकेवर असते. भारतात देखील ही मालिका पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलियात होत आहे. बुधवारी पहिली कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू होईल. भारतीय वेळेनुसार पहाटे ५.३० वाजता सामना सुरू होईल.
सलामी सामन्याला जेम्स अ‍ॅण्डरसन मुकणार
अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसनला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत विश्रांती मिळाल्याने अ‍ॅण्डरसन अ‍ॅडिलेडमध्ये होणाऱ्या गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी अधिक चांगल्या प्रकारे सज्ज होऊ शकेल, असे संघ व्यवस्थापनाला वाटते. अ‍ॅण्डरसन खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे व त्याला कोणतीही दुखापत नाही. सहा आठवड्यात पाच कसोटी खेळून त्याला अ‍ॅडिलेडमधील दुसऱ्या कसोटीसाठी तयार करण्याची योजना आहे, असे इंग्लंड क्रिकेटने निवेदनात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ : डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड.
इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, जोस बटलर, हसीब हमीद, डेव्हिड मलान, ओली पोप, स्टुअर्ट ब्रॅड, जॅक लीच, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन, मार्क वुड.