रोहित शर्मा वनडेचा कर्णधार; लवकरच घोषणा

आफ्रिकेत हिटमॅनच्या नेतृत्वात खेळणार विराट


07th December 2021, 11:22 pm
रोहित शर्मा वनडेचा कर्णधार; लवकरच घोषणा

दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टी-२० नंतर आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्याची तयारी करत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ३ सामन्यांची कसोटी आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याची अधिकृत घोषणा भारतीय संघाच्या घोषणेवेळी केली जाणार असल्याचे समजते.
बीसीसीआयकडून रोहितकडे एकदिवसीय कर्णधारपद देण्याची तयारी सुरू आहे. भारतीय संघ याच महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहितने नेतृत्व केले होते. ही मालिका मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची देखील पहिली मालिका होती. भारताने न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला होता.
विश्वचषकानंतर विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर चर्चा सुरू झाली होती की, टी-२० सोबत एकदिवसीयचे कर्णधारपद रोहित शर्माकडे दिले जाईल. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माचे कौतुक केले आहे. त्याच्या मते रोहित टी-२० सोबत वनडेचा देखील चांगला कर्णधार आहे.

२०१७ नंतर प्रथमच दोन कर्णधार
भारतीय संघाचे २०१७ नंतर प्रथमच दोन कर्णधार झाले आहेत. याआधी २०१४ ते २०१७ या काळात संघाला दोन कर्णधार होते. २०१४ साली धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली होती. तेव्हा विराट कर्णधार झाला. तर धोनी वनडे आणि टी-२०चा कर्णधार होता. २०१७ साली वनडे आणि टी-२०चे नेतृत्व विराटकडे आले. आता विराटने टी-२०चे कर्णधारपद सोडल्यानंतर संघाला दोन कर्णधार झाले आहेत.