अग्रलेख। वेदनादायी घटना

ही घटना खरोखरच चुकून घडली की त्यामागे काही अन्य कारण होते ते पुढे तपासात स्पष्ट होईल; पण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे

Story: अग्रलेख |
07th December 2021, 01:13 am
अग्रलेख। वेदनादायी घटना

'नागालीम' नावाचा सार्वभौम नागा प्रांत स्थापन करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून नागालँडसह ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या चळवळीत आतापर्यंत अनेकांचे बळी गेले. आपली मागणी धसास लावण्यासाठी प्रसंगी म्यानमार सारख्या देशांमध्ये आसरा घेऊन भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये वारंवार देशविरोधी कारवाया करणारे बंडखोरांचे गटाच्या गट तिकडे सक्रिय आहेत. नागालँड, मणीपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमधील उत्तर- पश्चिम भागातील नागा जमातीच्या लोकांचा वेगळा प्रांत व्हावा अशा मागण्यांसाठी बंडखोरांचे हे गट प्रयत्न करतात. भारतीय लष्कर आणि या बंडखोरांमध्ये वारंवार चकमकही होत असतात. मागणी करणाऱ्यांमध्ये विशेषतः बहुसंख्य ख्रिस्ती धर्मीय असल्यामुळे अशा नागा जमातींचे वेगळे राष्ट्र हा बंडखोरांचा हेतू. अर्थात नागा राष्ट्रवादाने प्रेरित बंडखोरांच्या कारवाया नियमितपणे होतच असतात. पण त्यांना देश विभाजनात यश आलेले नाही; किंवा त्यांची मागणी मान्य होण्याची कुठली शक्यता नाही. भारतीय लष्कराने गेली कित्येक वर्षे या बंडखोरांना डोके वर काढण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे देशाचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी लष्कराचा मोठा हात आहे. पण लष्कराच्या कारवायांना डाग लावणारा एक प्रकार नागालँडमध्ये घडल्यामुळे लष्कर आणि नागरिक यांच्यातील दरी ईशान्य भारतात वाढण्याची शक्यता आहे. लष्कराविरोधात असलेला असंतोष नागालँडमधील घडलेल्या दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेतून वाढत चालला आहे.
नागालँडमध्ये कोळसा खाणीवर काम करून घरी परतणाऱ्या मजुरांना बंडखोर समजून भारतीय लष्कराच्या २१ पॅरा विशेष दलाच्या तुकडीने ठार केले. एक दोन नव्हे तर सात कामगारांना लष्कराच्या जवानांनी गोळीबारात ठार केले. त्यानंतर कामगारांच्या शोधार्थ गेलेल्या ग्रामस्थांमध्ये आणि २१ पॅरा विशेष दलाच्या जवानांमध्ये वाद झाला. तिथेही गोळीबार झाला. नागरिकांनी या घटनेनंतर वाहनांची जाळपोळ केली. भारत-म्यानमार सीमेच्या जवळील या भागात दंगलीची स्थिती निर्माण झाली. या दोन्ही घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. एका जवानाचाही त्यात समावेश आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ओटींग गावातील ही घटना आहे. शनिवारी कोळसा खाणीतून परतणाऱ्या कामगारांना पीकअपमधून येताना पाहिल्यानंतर वाहन थांबविण्याचे आवाहन केले, पण वाहन थांबले नाही असा लष्कराचा दावा आहे. या परिसरात बंडखोरांकडून अतिरेकी कारवाया होणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे लष्कराच्या तुकडीने मागे पुढे न पाहता वाहन न थांबल्यामुळे गोळीबार केला. घटनेनंतर हे चुकून झाले, त्यासाठी लष्कराने दिलगिरीही व्यक्त केली तसेच चौकशीही सुरू केली. ही घटना खरोखरच चुकून घडली की त्यामागे काही अन्य कारण होते ते पुढे तपासात स्पष्ट होईल; पण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांचा दावा आहे की लष्कराने अशी कारवाई करण्यासाठी जर निर्णय घेतला होता तर पोलिस गाईड मागितला असता. पण तसे काही केलेले नाही. त्यामुळे पोलिसांनाही या संपूर्ण घटनेमागे संशय आहे. त्यातूनच लष्कराच्या २१ पॅरा तुकडी विरोधात गुन्हा नोंदवला आहे. नागालँड पोलिसांनी हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिले आहे.
पॅरा स्पेशल दलाने स्थानिक पोलिसांना कळवले नव्हते किंवा पोलीस गाईड देखील मागितला नव्हता, त्यामुळे नागरिकांना मारण्याचा आणि जखमी करण्याचा सुरक्षा दलाचा हेतू होता असे एफआयआरमध्ये पोलिसांनी म्हटले आहे. नागालँड सरकारने एका विशेष चौकशी पथकाची स्थापनाही केली आहे. दुसऱ्या बाजूने लष्करानेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. जे घडले त्याबाबत नागालँडचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री, भारतीय लष्कर या सर्वांनीच खेद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे एक चूक घडल्यानंतर पुन्हा जे नागरिक लष्कराच्या जवानांशी वाद घालून त्यांची शस्त्रे काढून घेण्यासाठी प्रयत्न करू लागले त्यातीलही काहीजणांना मारले गेले. पहिली घटना टाळता आली असती पण ती टाळली नाही. दुसरी घटना तर टाळणे शक्य होते पण त्यानंतर आणखी एक चूक केली गेली. निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यामुळे सगळीचकडे हळहळ व्यक्त होते आहे. बंडखोरांच्या कृत्याचे परिणाम सर्वसामान्य मजुरांना आणि नागरिकांनी भोगावे लागले हे फारच वेदनादायी आहे. त्याही पेक्षा वेदनादायी आहे की देशाच्या संरक्षणार्थ आणि एकता अबाधित ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या लष्कराकडून ही चूक झाली.