ओमिक्राॅनचे नवे संकट, कठोर निर्बंधांचे संकेत

राज्यरंग । महाराष्ट्र

Story: नीलेश करंदीकर |
07th December 2021, 12:03 am
ओमिक्राॅनचे नवे संकट, कठोर निर्बंधांचे संकेत

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत करोनाच्या पहिल्या लाटेत ११ हजार बळी गेले होते; तर दुसऱ्या लाटेत १४ हजारांहून अधिक मृत्यू झाले होते. या पार्श्वभूमीवर आता ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग रणनीती आखत आहे. सध्या राज्यात या नव्या व्हेरिएंटचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडणार असून, पुढील काळात कठोर निर्बंधांचे संकेत मिळत आहेत.                   

 करोना संबधी जे काही निर्णय होतील त्याचे जनतेने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. सध्या विमानतळांसह विविध ठिकाणी की जेथून अन्य राज्यांतून प्रवासी दाखल होतात तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. दर आठवड्याला कॉर्पोरेट कार्यालयांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जनतेला केला आहे.                   

बारा कोटींहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात यापूर्वी करोनाचा प्रतिबंध करताना आरोग्य व्यवस्थेला अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन काही चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुस्टर डाेस घ्यावा का, याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.                   

महाराष्ट्रातील काही भागांत पहिली ते दहावीपर्यंत एक डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत; तर अनेक भागांत शाळा अद्याप बंदच आहे. मुंबई तसेच पुण्यातील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण केले जाते आहे. स्थानिक पातळीवर निरीक्षण करून शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवण्यात आली आहे. ‘लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र लहान मुलांचे आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे’, असे मत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.                  

एकीकडे ओमिक्रॉनचा धोका उद्भवला असतानाच शासकीय रुग्णालयांबाहेर ‘मार्ड’च्या निवासी डाॅक्टरांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ‘नीट पीजी काऊन्सिलिंग’ सतत पुढे ढकलण्यात येत असल्याने निवासी डाॅक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत मागण्या पूर्ण करण्यासाठी आता काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील सरकारी रुग्णालये आणि काॅलेजमधल्या बाह्यरुग्ण विभागातील डाॅक्टरांनी हे आंदोलन छेडले आहे. सरकारच्या धोरण निश्चिततेमध्ये समानता नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने सोबतच ॲडमिशन प्रक्रिया लवकर पार पडत नसल्याने रुग्णालयातील इतर डाॅक्टर्सवर ताण येत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच ‘मार्ड’च्या डॉक्टरांनीही बंडाचा पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर पुन्हा नवे आव्हान उभे ठाकले आहे.