ओबीसी समाजासाठी स्थापणार कला, शिक्षण व न्यायिक कक्ष

काणकोणातील ओबीसी महामेळाव्यात निर्धार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th December 2021, 11:42 pm
ओबीसी समाजासाठी स्थापणार कला, शिक्षण व न्यायिक कक्ष

सत्कारमूर्तींसमवेत अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी.

काणकोण : अखिल भारतीय इतर मागासवर्गीय (ओबीसी) महासभेच्या गोवा शाखेतर्फे काणकोण तालुक्यासाठी नुकताच महामेळावा घेण्यात आला. या महामेळाव्यात समाजाच्या विकासासाठी कला, शिक्षण, न्यायिक क‌क्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाटणे (काणकोण) येथील श्री देवगीपुरूष देवस्थान सभागृहात झालेल्या या महामेळाव्यात महासभेचे अध्यक्ष शशिकांत घाडी, डॉ. पूर्णानंद च्यारी, सोयरू कोमरपंत, अॅड. सुहास वळवईकर, मंगेश पागी, केवल नाईक, दिवाकर पागी, तुकाराम आसोलकर व पंकज नमशीकर व्यासपीठावर उपस्थित होते.
गोव्याच्या इतिहासात प्रथमच काणकोण तालुक्यात ओबीसी समाजातील १३ जाती महामेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्या. यामध्ये पागी, भंडारी, च्यारी, कोमरपंत, सतरकर, गाबीत, ख्रिश्चन रेंदेर, नाभिक, मडवळ, गोसावी, कुंभार, ख्रिश्चन कुंभार आणि धनगर यांचा समावेश होता. ही या महामेळाव्याची फलश्रुती आहे, असे मत महामेळाव्याचे कार्याध्यक्ष सोयरू कोमरपंत यांनी यावेळी व्यक्त केले. तर ओबीसी महासभेने ओबीसीची स्वतंत्र कला अकादमी स्थापन करण्याची गरज आहे, असे मत डॉ. च्यारी यांनी परिसंवादात व्यक्त केले.
ओबीसी समाजाला ताठ मानेने जगता यावे. सुसंस्कृत असलेल्या या समाजाने गोमंतकात पिढीजात असलेली संस्कृती टिकवून हा वारसा युवा पिढीला हस्तांतरित करावा, या हेतूने ज्ञातीबांधवांचे विचार व पुढील वाटचाल, यावर या महामेळाव्यात चर्चा करण्यात आली.
ओबीसी समाजातील महिलांच्या समस्यांवर सविस्तर चर्चासत्र झाले. यामध्ये महिलांच्या स्वंयसाहाय्य गटांची स्थापन करून सरकारी योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार महासभेने केला. तालुका अध्यक्ष मंगेश पागी व कार्याध्यक्ष सोयरू कोमरपंत यांनी मेळावा सल्लागार म्हणून कार्य केले. पंकज नमशीकर व प्रसाद पागी यांनी सूत्रसंचालन केले.

ओबीसींना हवा स्वतंत्र मंत्री

काणकोण तालुक्यात स्वतंत्र ओबीसी भवनाची निर्मिती करण्यासाठी सरकारकडे जमिनीची मागणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य सरकारमध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्री व मंत्रालयाची निर्मिती करावी, अशी मागणी या महामेळाव्यातून पुढे आली आहे, अशी माहिती महासभेचे अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी दिली.

मान्यवरांचा सत्कार

ओबीसींसाठी काम केलेल्या समाजातील २६ मान्यवरांचा महामेळाव्यात शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात धनंजय पागी, सुरेखा पागी, गोविंद सतरकर, रुक्मिणी सतरकर, दिलखुश खोलकर, सुभाष महाले, नारायण ठक्कर, विश्वनाथ तारी, जनार्दन भंडारी, रमेश भंडारी, रत्नाकर काणकोणकर, संगीता मडीवळ, सोयरू कोमरपंत, रघुवीर कोमरपंत, सैरू गोसावी, राजेंद्र गोसावी, केव्हीन लोबो, दामोदर च्यारी, गौरीश च्यारी यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे.