सोशल डेमोक्रेटिक पार्टी, पॉप्युलर फ्रंटच्या पाच जणांना अटक

बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फातोर्ड्यात बेकायदेशीर मोर्चा; प्रक्षोभक वक्तव्ये

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th December 2021, 11:38 pm
सोशल डेमोक्रेटिक पार्टी, पॉप्युलर फ्रंटच्या पाच जणांना अटक

फातोर्ड्यातील ‘माथानी साल्ढाणा’ प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करताना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते.

मडगाव : बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे सोमवारी कोणतीच परवानगी न काढता मोर्चा काढण्यात आला होता. अशाप्रकारे बेकायदेशीर मोर्चा काढून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष शेख मुजफ्फर अहमद (४६, रा. नीलतारा अपार्टमेंट; राय-आर्ले सर्कल), खजिनदार रईस अंजुम (५२, लिव्हिंग स्पेस कॅस्टल; बोर्डा), सरचिटणीस झबीर अहमद शेख (४५, रा. शिरवडे-मडगाव), इफ्तियाज सय्यद (४७, रा. माडेल-मडगाव) व इम्रान मुहम्मद (४६, रा. दवर्ली) यांचा समावेश आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी फातोर्ड्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फातोर्ड्यातील ‘माथानी साल्ढाणा’ प्रशासकीय इमारतीजवळ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संस्थांतर्फे बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या मोर्चासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच मोर्चावेळी एका ठरावीक उद्देशाने बेकायदेशीररीत्या जमावही करण्यात आला होता.

मोर्चावेळी नेत्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भडक विधाने केली. धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी वक्तव्येही नेत्यांनी केली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याचे सांगण्यात आले.