वारसा स्थळाजवळील वादग्रस्त बांधकाम पाडण्याच्या मागणीवर जोर
जुने गोवे पंचायत कार्यालयासमोर पत्रकारांशी बोलताना अॅड. अमित पालेकर. सोबत त्यांचे कार्यकर्ते.
पणजी : जुने गोवे वारसा स्थळाजवळ उभारलेल्या अवैध बांधकामावर कारवाई करावी, असे निर्देश नगरनियोजन खात्याने येथील पंचायतीला दिले आहेत. याची कार्यवाही व्हावी, अशी नोटीस आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर यांनी सोमवारी पंचायतीला बजावली आहे.
वारसा स्थळाजवळील बांधकामासाठी मालकाला जरी परवाना दिला असला तरी तो रद्द करावा, असा आदेश नगरनियोजन खात्याने पंचायतीला दिला होता. त्यावर कार्यवाही व्हावी, असेही अॅड. पालेकर यांनी म्हटले आहे. या बांधकामाविरोधात पालेकर यांनी गेल्या आठवड्यात पाच दिवस उपोषण केले होते. त्यानंतर नगरनियोजन खात्याने पंचायतीला त्या बांधकामाचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर व वैद्यांनी सल्ला दिल्यानंतर पालेकरांनी उपोषण सोडले होते. पण बांधकाम जमीनदोस्त होईपर्यंत एक वकील म्हणून लढा चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यानुसार सोमवारी त्यांनी पंचायतीचे सरपंच व सचिव यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय त्यांनी पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, राज्य पोलीस दल आणि दक्षता खात्यालाही पत्र पाठवून बेकायदेशीर बांधकामात गुंतलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘सेव्ह ओल्ड गोवा कृती समिती’ने सादर केलेल्या कागदपत्रांवरून संबंधित बांधकाम सर्रासपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होते. याबाबत आदेश जारी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पंचायत सचिवांनी नुकतीच दिली आहे, असे पालेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आम्हाला लोटलीकर यांच्याकडून आधीच्या नोटिशीबाबत उत्तर मिळाले आहे. मालमत्ता विकल्यापासून ही बेकायदेशीर रचना आता त्यांच्या मालकीची नाही. या प्रकरणात, सरकारी दस्तावेजाचा गैरवापर केला जात होता. त्यामुळे या प्रकरणात त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, असे पालेकर यांनी म्हटले आहे.