पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा विजेतेपदाची हुलकावणी

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स २०२०चे कोरियाच्या आन सेयुंगला विजेतेपद


05th December 2021, 10:35 pm
पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा विजेतेपदाची हुलकावणी

बाली : दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू पुन्हा एकदा अंतिम फेरीत येऊन विजेतेपदापासून वंचित राहिली. रविवारी झालेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या विजेतेपदाच्या लढतीत सिंधूचा दक्षिण कोरियाच्या आन सेयुंगने २१-१६, २१-१२ असा पराभव केला. 

सिंधूने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कांस्यपदक जिंकले. मात्र त्यानंतर तिला एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. याआधी तिने इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती मात्र तिला विजय मिळवता आला नाही. वर्ल्ड टूर फायनल्समध्ये तिने शानदार खेळ दाखवत अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र तिला विजेतेपदाचा सामना जिंकता आला नाही आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कोरियन खेळाडूचे सिंधूवर वर्चस्व

१९ वर्षीय कोरियन खेळाडूच्या शानदार खेळाला सिंधू काहीही उत्तर देऊ शकली नाही. तिने ज्या आक्रमकतेने सिंधूवर वर्चस्व गाजवले त्यापुढे भारतीय खेळाडू हतबल दिसत होती. सेयुंगने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली. ब्रेकपर्यंत तिने ११-६ अशी आघाडी घेतली होती. मात्र, ब्रेकनंतर सिंधूने तिला खूप त्रास दिला आणि गुण मिळवत राहिली. सिंधू एका वेळी ८-१८ अशी होती पण भारतीय खेळाडूने हे अंतर भरून काढले आणि चार गेम पॉइंट वाचवून स्कोअर १६-२० केला. सेयुंग पहिला गेम जिंकण्यापासून फक्त एक पॉइंट दूर होती जो तिने घेतला आणि गेम जिंकला.

असा होता दुसरा गेम

सिंधूने दुसऱ्या गेमची चांगली सुरुवात करत सलग दोन गुण घेतले. त्यानंतर सेयुंगने सलग दोन गुण घेत गुणसंख्या बरोबरी केली. दुसऱ्या गेममध्ये दोघांमध्ये तुल्यबळ स्पर्धा होती. स्कोअर ३-३ आणि नंतर ४-४ असा झाला. कोरियाच्या खेळाडूने वारंवार पुढे जाण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण सिंधूने लगेचच बरोबरी साधली. स्कोअर ६-६ असा होता. 

येथून कोरियन खेळाडूने मागे वळून पाहिले नाही आणि स्कोअर ९-६ असा केला. ब्रेकमध्ये तिने ११-८ असा स्कोअर केला. ब्रेकनंतर कोरियाच्या खेळाडूंनी पुन्हा वर्चस्व गाजवले. तिने येताच लागोपाठ तीन गुण घेत स्कोअर १५-८ असा केला. येथून कोरियाच्या खेळाडूने सिंधूला परतण्याची एकही संधी दिली नाही. सिंधूने काही गुण घेतले पण गुणांमधील फरक कमी करण्यात ती अपयशी ठरली. अखेर सिंधू पुन्हा एकदा विजेतेपदापासून वंचित राहिली.