आयएसएल : केरळा ब्लास्टर्सने मिळवला पहिला विजय


05th December 2021, 10:34 pm

वास्को : केरळा ब्लास्टर्स संघाने हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची चव चाखली. याआधीच्या तीन सामन्यांत २ ड्रॉ व १ पराभव अशा निकालांवर केरळा ब्लास्टर्सला समाधान मानावे लागले होते. पण, आज त्यांनी गुणतक्त्यात टॉप चारमध्ये असलेल्या ओडिशा एफसीवर २-१ असा विजय मिळवला.
या पराभवामुळे ओडिशा एफसीचे विजयी हॅटट्रिक मिळवण्याचे स्वप्न भंगले. अल्व्हारो गार्सिया व प्रसंथ मोहन यांनी केरळा ब्लास्टर्ससाठी दुसऱ्या हाफमध्ये गोल केले. ओडिशासाठी भरपाई वेळेत निखिल कुमारने गोल केला. केरळा ब्लास्टर्सने गुणतक्त्यात ६व्या स्थानावर झेप घेतली.
केरळा ब्लास्टर्स संघाने सुरुवातीपासून चेंडूवर ताबा राखताना त्यांच्या क्षेत्रात सुरेख खेळ केला. त्यांनी बराच काळ चेंडू त्यांच्या क्षेत्रात खेळवत ठेवला, परंतु ११व्या मिनिटाला ओडिशा एफसीने हे चक्रव्यूह भेदून गोल करण्याची संधी तयार केली. पण, गोलजाळीच्या जवळून झेव्हियर हर्नांडेझला गोल करता आला नाही. १६व्या मिनिटाला ओडिशाच्या मोईरांगथेम थोईबाला पिवळे कार्ड दाखवले गेले. झेव्हियरच्या हुकलेल्या संधीनंतर ओडिशाचा खेळ उंचावत गेला अन् त्यांची आक्रमणाची धार तीव्र होत गेली. पहिल्या २० मिनिटांच्या खेळात केरळा ब्लास्टर्सना दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यांना गोल करता आला नाही. ३३ व्या मिनिटाला झेव्हियर व ब्लास्टर्सच्या सहाल अब्दुल समद यांच्यात जोरदार टक्कर झाली अन् फ्रान्सिस्कोला प्राथमिक उपचारासाठी काहीकाळ मैदानाबाहेर जावे लागले. निकोलस लुनाचा प्रयत्न ओडिशाचा गोलरक्षक कमलजित सिंगने हाणून पाडला.
४१व्या मिनिटाला हेंद्री अँथोनीने लाँग रेंजवरून चेंडू अप्रतिमरित्या भिरकावला, पण केरळाच्या गोलरक्षक अल्बिनो गोमेज याने तितक्याच चपळाईने तो अडवला. पुढच्याच मिनिटाला केरळा ब्लास्टर्सकडून पलटवार झाला, परंतु अल्व्हारो गार्सिया याला चेंडूला अंतिम दिशा दाखवण्यात अपयश आले. दोन मिनिटांच्या भरपाई वेळेत ओडिशाच्या खेळाडूंनी आघाडी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांना पहिल्या सत्रातील गोलशून्य बरोबरीत बदल करता आला नाही. पहिल्या हाफमध्ये केरळा ब्लास्टर्सकडे चेंडूचा सर्वाधिक ताबा असला तरी ओडिशाकडून गोलजाळीच्या दिशेने सर्वाधिक १० शॉट्स मारले गेले. त्यापैकी ३ शॉट्स ऑन टार्गेट होते. केरळाकडून ५ पैकी २ शॉट्स ऑन टार्गेट मारले गेले.
दुसऱ्या हाफच्या पहिल्याच मिनिटाला ओडिशाकडून हल्लाबोल झाला. ओडिशाच्या खेळाडूंनी सुरेख पासिंगचा खेळ करताना चेंडू गोलजाळीनजीक केला, पण अ‍ॅरीडाई सुआरेझ चेंडूला अंतिम टच देणार त्याआधीच केरळाच्या गोलरक्षक गोमेझने बचाव भिंत उभी केली. त्यामुळे सुआरेझने भिरकावलेला चेंडू गोलजाळीवरून गेला. ४८व्या मिनिटाला केरळाच्या मार्क लेस्कोव्हिचला पिवळ कार्ड मिळाले. दरम्यान उत्तरार्धात ओडिशाने एक बदल करताना इसाक रॅल्टेला बदली म्हणून इसाक व्हनमालसावमाला मैदानावर उतरवले. ओडिशाकडून सातत्याने गोल करण्याचे प्रयत्न होताना दिसले, तेच केरळा ब्लास्टर्स कुठेतरी बॅकफुटवर गेले होते.
६२व्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सच्या अल्व्हारो गार्सियाने ओडिशाच्या गोलरक्षकाला तालावर नाचवत पहिला गोल केला. निशू कुमारच्या पासवर हा गोल झाला. ६८व्या मिनिटाला गार्सियाकडून आणखी एक गोलचा प्रयत्न झाला, परंतु यावेळी ओडिशाच्या गोलरक्षकाने तो रोखला. ७२व्या मिनिटाला केरळाच्या गोलरक्षक गोमेजला दुखापतीमुळे मैदाना सोडावे लागले. ओडिशाने आक्रमण तीव्र केले, परंतु केरळाकडून तितकाच तोडीसतोड बचाव होताना दिसला. ओडिशाने चेंडूवर अधिक काळ ताबा राखून आक्रमण सुरू ठेवले असले तरी त्यांना गोल करता येत नव्हता. पण, ए लुनाच्या पासवर ८५व्या मिनिटाला प्रसंथ मोहनने गोल करून केरळाची आघाडी २-० अशी भक्कम केली. सहा मिनिटांच्या भरपाई वेळेत केरळाकडून बचावात्मक खेळ झाला. त्यातही केरळाच्या खेळाडूंचा ताळमेळ चुकल्यामुळे ओडिशाला गोल करता आला. निखिल कुमारने भरपाई वेळेत संघासाठी पहिला गोल केला.