टीम इंडियाचा विजय निश्चित

न्यूझीलंडविरुद्ध विजयासाठी ५ बळींची गरज : अश्विनची शानदार गोलंदाजी


05th December 2021, 10:33 pm
टीम इंडियाचा विजय निश्चित

मुंबई : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची स्थिती मजबूत झाली असून आता भारताचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे. खेळाच्या तिसऱ्या दिवशी, भारताने पाहुण्यांसमोर ५४० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आणि मुंबईच्या खेळपट्टीचा विचार करता ही धावसंख्या गाठणे जवळजवळ अशक्य आहे.

न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावल्या. न्यूझीलंडने टॉम लॅथम, विल यंग, ​​रॉस टेलर आणि डॅरेल मिशेल यांच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने ३ तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. तर टॉम ब्लंडेल शून्यावर धावबाद झाला. डॅरेल मिशेलने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक ठोकले आणि त्याच्या बॅटमधून ६० धावा निघाल्या.

भारताने आपला दुसरा डाव ७ गडी बाद २७६ धावांवर घोषित केला. भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव ६२ धावांवर आटोपला.

भारताचा दुसरा डाव आक्रमक

भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी केली. दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवाल (१०८ चेंडूत ६२ धावा), चेतेश्वर पुजारा (९७ चेंडूत ४७), शुभमन गिल (७५ चेंडूत ४७), अक्षर पटेल (२६ चेंडूत नाबाद ४१) आणि कर्णधार विराट कोहली (८४ चेंडूत ३६) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात ११९ धावांत सर्व १० बळी घेणारा फिरकीपटू एजाज पटेलने दुसऱ्या डावात १०६ धावांत चार बळी घेतले, तर रचिन रवींद्रने ५६ धावांत तीन बळी घेतले. पटेलने या सामन्यात २२५ धावा देत १४ विकेट घेतल्या. भारतातील कोणत्याही परदेशी गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

एजाज पटेलने १० बळी घेतल्यानंतरही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. भारताकडून ७० षटकात २५ चौकार आणि ११ षटकार मारले गेले. स्थिती अशी होती की, ऋद्धिमान साहा (१३) वगळता प्रत्येक भारतीय फलंदाजाने षटकार मारला. अक्षर पटेलने एकट्याने झंझावाती खेळीत तीन चौकार आणि चार षटकार ठोकले. श्रेयस अय्यरने ८ चेंडूत १४ धावांच्या खेळीत दोन षटकार ठोकले.

न्यूझीलंडच्या वरिष्ठ फलंदाजांकडून निराशा

दुसऱ्या डावात न्यूझीलंडला त्यांच्या वरिष्ठ फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण टॉम लॅथम आणि रॉस टेलरने निराशा केली. दोघेही ६-६ धावा करून बाद झाले. विल यंगने २० धावा केल्यानंतर विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला पण अश्विनने त्याचा खेळ संपवला. यानंतर मिशेल आणि हेन्री निकोल्समध्ये ७३ धावांची भागिदारी झाली पण ही जोडी अक्षर पटेलने तोडली. मिशेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. टॉम ब्लंडेल झटपट धावबाद झाल्याने न्यूझीलंडने ५वी विकेट गमावली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत रचिन रवींद्र आणि हेन्री निकोल्स क्रीजवर होते. दोघांमध्ये ४९ चेंडूत ११ धावांची भागिदारी झाली आहे.