जो बात कहते डरते है, सब तु वो बात लिख...

- मराठी साहित्य संमेलनात दिलखुलास जावेद अख्तर

Story: नाशिक : |
04th December 2021, 01:29 am
जो बात कहते डरते है, सब तु वो बात लिख...

नाशिक : जो बात कहते डरते है, सब तु वो बात लिख... असे म्हणत गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहिण्यासाठी साद घातली. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे सुरू झाले. शुक्रवारी त्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर म्हणाले की, मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आणते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले.
भाषाच वादाचे कारण!
मी मराठी साहित्य संमेलनात जाण्यास मी योग्य आहे की नाही, हा विचार माझ्या मनात आला. पेशव्यांच्या दरबारात शायरही असायचे. हे मी वाचले होते, म्हणून मी आलो. बोलण्याचे माध्यम म्हणजे भाषा. मात्र जगात भाषाच वादाचे कारण झाले आहे. संत साहित्य हे खरे अध्यात्म आहे. संत ज्ञानेश्वर, त्यांचे बंधू यांच्या रचना. संत तुलसीदास यांचे दोहे, हे खरे अभिजात साहित्य आहे, असे जावेद अख्तर यांनी सांगितले.
साहित्य आणि राजकारण
ते पुढे म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही, हे योग्य नाही. आपले परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. साहित्य आणि राजकारण याच नाते काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याचे घनिष्ठ नाते आहे. घाबरून आयुष्य जगणे योग्य नाही, असेही जावेद अख्तर म्हणाले.
नारळीकरांच्या अनुपस्थितीमुळे वेगळी किनार...
तीन वर्षांपूर्वी साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीसाठी घटना बदलली. मात्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत डॉ. जयंत नारळीकर आले असते तर बरे झाले असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, उस्मानाबाद साहित्य संमेलनात मणक्याचे दुखणे असताना फादर फ्रान्सिस दिब्रेटो आले होते. मला नारळीकर यांना दोष द्यायचा नाही. मात्र, त्यांची सर्व तयारी करण्याचे ठरवूनही ते आले नाही. यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला वेगळी किनार लागली. आता पुन्हा घटना बदलावी ही आमची इच्छा असल्याचेही कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.