भाजपच्या सत्ताकाळात चौफेर विकास

भाजपाध्यक्ष नड्डा यांचे कौतुकोद्गार : डिचोली कार्यकर्ता मेळावा उत्साहात

|
26th November 2021, 12:06 Hrs
भाजपच्या सत्ताकाळात चौफेर विकास

फोटो : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, सोबत मान्यवर.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
डिचोली : केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे गोव्याने चौफेर विकास साधला आहे. राज्याने सर्वच क्षेत्रांत मोठी भरारी घेतली असून प्रतिकूल परिस्थितीत डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा उत्तम प्रकारे पार पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पुन्हा एकदा मोठे यश मिळवून द्या, असे आवाहन भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. डिचोली मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
आमोणा येथे आयोजित केलेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती राजेश पाटणेकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी केला. ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नेते कै. मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा देताना नड्डा म्हणाले, परीकरांनी ‘गोल्डन गोवा’चे स्वप्न पाहिले होते. त्यांच्यामुळेच गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कायमस्वरूपी आयोजन शक्य झाले. सामान्य व्यक्तीलाही विकासाचा लाभ व्हावा, ही त्यांची इच्छा होती. पर्रीकरांचा जोश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कायम ठेवला आहे.
लसीकरणाला यश
कोविडप्रतिबंधक लसीकरणाला १०० टक्के यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडप्रतिबंधक लस तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले. देशातच दोन लसींची निर्मिती झाली. लस घेणार नसल्याची वल्गना करणाऱ्या विरोधकांनीही लस घेतली आहे. लोकांची दिशाभूल करणाऱ्या विश्वासघातकी पक्षांना घरी पाठवा. राज्यात १०० टक्के लसीकरण होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत, सभापती पाटणेकर, मंत्री, खासदार यांनी मोठे योगदान दिले आहे. सुरक्षिततेमुळेच आज पर्यटन वाढले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच बाबतीत विकास साधला आहे. गोव्यातही पूल, रस्ते, विमानतळ साकारत आहे. भाजपच्या सत्ताकाळात गुन्हे घटले असून चौफेर विकास होत आहे. गोवा उत्तम पर्यटन केंद्र असून शिक्षण, आरोग्य क्षेत्रांतही अग्रेसर आहे.
---
पर्रीकरांचे ‘भांगराळे गोंय’चे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक पक्ष गोव्यात येत आहेत. कोविड काळातही आम्ही सामाजिक योजना बंद केल्या नाहीत. डिचोली तालुक्याचा विकास केला जात आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’अंतर्गत प्रत्येक योजना घरोघरी पोहोचवण्याचा आमचा ध्यास आहे. मोदींचे ‘नवभारत’ व पर्रीकरांचे ‘भांगराळे गोंय’ करण्याचे स्वप्न साकार करायचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
--

नड्डांकडून पाटणेकर यांची उमेदवारी निश्चित?
डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्याशी आपली जुनी मैत्री आहे. ते अतिशय प्रेमळ असून मतदारसंघात त्यांनी चांगले काम केले आहे. या मतदारसंघात त्यांचे बळ वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. या वक्तव्यामुळे पाटणेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

.....
भाजप हा सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. पूर्वीच्या राजकीय संस्कृतीने स्वार्थ साधला, विकास केला नाही. आगामी निवडणुकीत २२हून अधिक आमदार विजयी करून पुन्हा सत्ता स्थापन करायची आहे. तृणमूल काँग्रेस ही दहशतवादी पार्टी व गुंडगिरीची सकाळ आहे.
_ श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री