बाबूशच्या मौनात दडलंय काय?

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तिसवाडी तालुक्यातील पाचही मतदारसंघांतील राजकारण दिवसेंदिवस रंगतदार बनत चालले आहे. त्यात पाचपैकी पणजी, ताळगाव, सांताक्रूज आणि सांतआंद्रे हे चार मतदारसंघ भाजपला जिंकून देण्याची हमी देणाऱ्या पणजीचे भाजप आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी गेल्या काही दिवसांपासून मौनव्रत धारण केले आहे. त्यामुळे भाजपातील अस्वस्थता वाढत चालली आहे.

Story: तालुक्याचे राजकारण । सिद्धार्थ कांबळ |
20th November 2021, 11:13 pm
बाबूशच्या मौनात दडलंय काय?

तिसवाडीतील पाचही मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. पण, त्यातील चार मतदारसंघांचे आमदार भाजपने २०१९ मध्ये काँग्रेसमधून आयात केलेले आहेत. गेल्या वर्षभरापूर्वीच आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडूनच लढवण्याचे जाहीर करीत पाचपैकी चार मतदारसंघ आपण भाजपला जिंकून देऊ अशी हमीही त्यांनी पक्षाला दिलेली होती. त्यानुसार बाबूश यांनी कामही सुरू केले होते. पण, त्यानंतर पणजीचे माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर राजकीय मैदानात उतरले. भाजपने येत्या विधानसभा निवडणुकीत पणजीतून आपल्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी पणजीतील मतदारांकडून होत आहे. पक्षाने याचा गांभीर्याने विचार करून पणजीची उमेदवारी आपल्याला द्यावी, अशी मागणी उत्पल यांनी भाजपच्या केंद्रीय आणि स्थानिक ज्येष्ठ नेत्यांकडेही केली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्पल यांना पणजीतून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मतदारांची सहानुभूतीही मिळत आहे. त्यामुळे आमदार बाबूश मॉन्सेरात यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. काहीच दिवसांपूर्वी भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी बाबूश आणि पणजी मनपातील भाजप समर्थक नगरसेवकांची बैठक घेऊन भाजपची पणजीतील उमेदवारी बाबूश यांनाच दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. तरीही भाजप अखेरच्या टप्प्यात काय निर्णय घेईल, हे सांगता येत नसल्याने बाबूशसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दुसऱ्या बाजूला आमदार बाबूश आणि मंत्री जेनिफर मॉन्सेरात यांचा बालेकिल्ला असलेल्या ताळगावातही यावेळी बाबूश-जेनिफर यांना दणका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताळगावच्या आमदार तथा महसूलमंत्री जेनिफर मॉन्सेरात ताळगावचा विकास साधण्यात तसेच स्थानिक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्या आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्या ताळगावात फिरलेल्याच नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात निराशा व्यक्त करण्यात येत आहे. याचा फायदा काँग्रेस किंवा आम आदमी पार्टीच्या ताळगावातील उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या बाजूला बाबूश मॉन्सेरात यांना सांताक्रूजमधून उमेदवारी देऊन उत्पल पर्रीकर यांना पणजीतून उतरवावे अशी बाजू सातत्याने मांडत असलेला एक गट भाजपात आहे. पण, बाबूश यांनी यासाठी स्पष्टपणे नकारही दिलेला आहे. शिवाय बाबूश पुन्हा सांताक्रूजमधून निवडून येण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्यांनी आपले कट्टर समर्थक तसेच ताळगावचे माजी सरपंच आग्नेल डिकुन्हा यांच्या नावाची भाजपकडे शिफारस केलेली आहे. तसे केल्यास विद्यमान आमदार टोनी फर्नांडिस गोवा फॉरवर्डकडून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे तेथेही बाबूश यांच्यासमोर पेच आहे.

या तीन कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून आमदार बाबूश मॉन्सेरात कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्याच अस्वस्थतेतून ते पक्षापासूनही दूर जात असून, पुढील काही दिवसांत ते वेगळी चूल मांडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. उत्पल पर्रीकर यांनी कोणत्याही परिस्थितीतून पणजीतून माघार न घेण्याचे निश्चित केले आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी त्यांना उघड, तर काहींनी छुपा पाठिंबाही दिलेला आहे. बाबूश भाजपात आल्यानंतर नाराज असलेले भाजप समर्थकही त्यांच्या बाजूने जात आहेत. अशा परिस्थितीत भाजपने पणजीत बाबूश यांना उमेदवारी दिली आणि उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणून उभे राहिले तर भाजपच्याच मतांची विभागणी होईल आणि अशा स्थितीत काँग्रेसने पणजीची उमेदवारी माजी महापौर उदय मडकईकर यांना दिल्यास निश्चित उदय मडकईकर यांचा विजय होईल हे लक्षात आल्यामुळेच बाबूश यांनी मौनव्रत धारण केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाढत चाललेली आव्हाने आणि बदलते राजकारण यातून बाबूश कसा मार्ग काढणार, हे येत्या काहीच दिवसांत स्पष्ट होईल.

तिसवाडीतील कुंभारजुवे मतदारसंघही तेथील उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे चर्चेत आला आहे. कुंभारजुवेतून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी युद्धपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी समील वळवईकर आणि युवा नेते राजेश फळदेसाई यांच्यात चुरस लागली आहे. त्यात या दोन्ही पक्षांतील इतर काही नेत्यांनीही उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे. पण उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

सांतआंद्रे मतदारसंघातून फ्रान्सिस सिल्वेरा यांना मैदानात उतरण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पण तसे झाल्यास तेथील भाजप नेते रामराव वाघ बंड पुकारून दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवू शकतात. काँग्रेसकडून लढण्यासाठी अरुणा वाघ इच्छुक असल्या तरी सांतआंद्रेतून युवा नेत्याला उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.