मला वेड लागले प्रेमाचे.....

लँडलाईन किंवा मोबाईल नव्हता त्यावेळी कबुतरच्या माध्यमातून प्रेमपत्रे पाठविली जात असत. कबुतर त्यावेळीचे गूगल मॅप्स होते जे अचूक डाकिया डाक लाया...प्रमाणे प्रेमपत्रे पोहोचवत असत. लँडलाईन आल्यानंतर बोलणे सोपे झाले खरे पण…

Story: आदित्यचा चष्मा । आदित्य सिनाय भांगी स |
20th November 2021, 11:10 Hrs
मला वेड लागले प्रेमाचे.....

लँडलाईन किंवा मोबाईल नव्हता त्यावेळी कबुतरच्या माध्यमातून प्रेमपत्रे पाठविली जात असत. कबुतर त्यावेळीचे गूगल मॅप्स होते जे अचूक डाकिया डाक लाया...प्रमाणे प्रेमपत्रे पोहोचवत असत. लँडलाईन आल्यानंतर बोलणे सोपे झाले खरे पण तितकी प्रायव्हसी मिळत नव्हती. म्हणजे एक तर फोन तिच्या/त्याच्या आई वडिलांनी उचलला तर? मग कंपनीच्या फोनप्रमाणे नक्कल करायला पडत होती. दुसरे म्हणजे घरच्यांसमोर बोलायचे कसे? मोबाईल आल्यानंतर हे सर्व आणखीनच सोपे झाले. कुठेही घेऊन जाता येऊ लागला. कारण पण होते की नेटवर्क मिळत नाही म्हणून दूर जातो. मग दूर जाऊन कुठे बस स्टॉपवर किंवा झाडाच्या सावलीत, जे.सी.बी च्या पुढील भागात किंवा अगदी मोठ्या पाईपमध्ये बसूनसुद्धा प्रेम-संवाद चालत होते.

 म्हणतात ना की भिंतीलासुद्धा कान असतात. मोबाईल आल्यानंतर सुद्धा ही भीती कायम राहिलीच कारण कोण कुठून ऐकतो कोण जाणे किंवा स्वतःचेच आई-वडील जासूसी करायला कुठे लपून बसले तर? ह्या सर्व समस्या पण दूर करायचा मार्ग आला तो म्हणजे एस.एम.एस. त्यामुळे भावना व्यक्त करण्यास आणखी मोकळीक झाली. आणखी एक गोष्ट म्हणजे जे आम्ही बोलू शकत नाहीत ते आम्ही सहजरित्या लिहून व्यक्त करू शकतो. (तुम्ही म्हणणार उदाहरण तुझेच घे. प्रेमाचे नाव न घेणारा प्रेमावर लेख लिहू लागला) एस.एम.एस. आला खरा पण तिकडेसुद्धा एक समस्या होती ती म्हणजे काही वर्षांपूर्वी मुला-मुलींकडे स्वतःचा मोबाईल नव्हता. वडिलांचा मोबाईल वापरत होते. वडिलांना पण मोबाईल जास्त वापरायला येत नव्हता. ते फक्त कॉल करायचे व घ्यायचे पण अचानक बॅलंस कमी झाले तर मग ते बुचकळ्यात. मग आले मॅसेज पॅक. हळूच ते पॅक घालून प्रेमी युगलांच्या गप्पा चालत होत्या. मग अमुक ते अमुक वेळ मोबाईल वडिलांपाशी असणार हा मॅसेज त्याकाळी आयुष्यात प्रत्येक मुलाने/मुलीने एकदा तरी पाठवलाच असणार. तरी कधी चुकून वडिलांनी मॅसेज वाचला तर मग व्यवस्थित 'प्यार का पंचनामा' होत असे. जर बापाने रिप्लाय केला की मी तिचा वडील मग काही डॅरिंग मुले तर सरळ बापाला मॅसेज पण करत असत तू थांब, इकडे ती माझ्याशी बोलत नाही आणि तू मध्येच आला, तिला फोन दे. खरेच, हा कॉन्फिडंस पाहिजे राव जीवनात!

 मग प्रत्येकाच्या हातात स्वतःचा फोन आला पण फायनांसर वडील मंडळीच होती. तेव्हा लवकर मॅसेज पॅक संपला तर 'शक' 'यक़ीन' में बदलत होता. जेव्हा प्रत्येक मोबाईलमध्ये इंटरनेट आले व व्हॉट्सएप, हाईकसारखे मॅसेंजर आले तेव्हा टेंशन कमी झाले कारण मॅसेज पाठवायला जास्त डेटा लागत नसत. पण फोटो, व्हिडियो पाठवायला मात्र डेटा जास्त लागत असत. पण तरी ते न पाठवता मॅसेज पाठवणे जास्त महत्त्वाचे होते. कारण दिल की बात पोहोचवणे महत्त्वाचे होते.

 जर कुणी सिंगल होते तर त्यांना सोशल मीडियावर कुणी भेटत असत व मग सर्व सुरू. मग एकदा भेट झाली व पसंती पडले तर लपून सर्व सुरू. जर प्रेमी-प्रेमिका एकाच वर्गात असले तर हजेरी पूर्ण. एकाच महाविद्यालयात पण वेगळ्या वर्गात असले तर हेजरीवर थोडा परिणाम व्हायचा व जर वेग-वेगळ्या कॉलेज मध्ये असले तर मग हजेरीत व परीक्षेत दिवे लागलेच समझा. प्रेमी जोडप्यांचा सर्वात आवडीचा सण म्हणजे व्हॅलंटाईन व्हीक. त्यात ते वेग-वेगळे डे जणू आशिकांचा इंद्रधनुष्य होता. हे सर्व करून घरच्यांनी जर ऐकले तर ठीक नाहीतर अशी जोडपी कधी ऐतिहासिक स्थळांवर खूप कारनामे करताना दिसतात. कधी-कधी तर आत्महत्यासुद्धा करतात. कुणी एकदा लिहिले होते - "आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये. अपमान करण्यात येईल." मग त्या पाटीवर जाऊन एकाने लिहिले: "तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या स्थळी फिरताना दिसते. लवकर उरकून टाका तिचं!" ही सत्यस्थिती होती.

 हे पण सत्य आहे की वाईट मुलांना, वाईट व्यसने असणाऱ्यांना, गुंड जसे दिसणाऱ्या मुलांना चांगल्या मुली मिळतात. त्यांच्याशी लगेच मुली पटतात. चांगल्या मुलांकडे मुली बघतच नाही. आधी प्रेम आंधळे होते. आता ते बँक बॅलंस, जॉब व बंगला आधी बघते.

आजकाल तर काही सिंगल मुले सोशल मीडियावर मीम बघून एकटेच हसतात. पण तरी त्यांच्यावर संशय घेतला जातो की ह्याचं काही चक्कर चाललंय का? तसं मुस्कराने की वजह तुम हो म्हणजे मुलगीच असायला पाहिजे असे नव्हे, ते मीम पण असू शकतात!