नोकऱ्या सोडण्याचा नवा ट्रेंड; महासत्तेसमोर आव्हान

Story: संतोष गरुड / विश्वरंग, अमेरिका |
17th November 2021, 12:13 Hrs
नोकऱ्या सोडण्याचा नवा ट्रेंड; महासत्तेसमोर आव्हान

करोनाच्या संकटातून सावरत असतानाच जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेत सध्या नोकऱ्या सोडण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. The Great Resignation या हॅशटॅगखाली हा ट्रेंड सध्या अमेरिकेत सुरू आहे. जुलै २०२१ पासून लाखोंच्या संख्येने लोक नोकऱ्या सोडू लागल्याने येथील उद्योगांसमोर कुशल मनुष्यबळाचे मोठे संकट उभे राहिले आहे. आधीच करोना काळातील लॉकडाऊनमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आता करोना संकट गेले असले तरी मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने उद्योगांना सावरण्याचे मोठे आवाहन महासत्तेसमोर उभे राहिले आहे.      

अमेरिकेच्या कामगार खात्याच्या ‘जॉब ओपनिंग आणि लेबर टर्नओव्हर’ विभागाने चार दिवसांपूर्वी जारी केलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. या आकडेवारीनुसार, एका सप्टेंबर महिन्यात तब्बल ४४ लाख लोकांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. ऑगस्टमध्ये ही संख्या ४३ लाख तर जुलैमध्ये ३६ लाख होती. म्हणजे तीन महिन्यांत एक कोटीहून अधिक लोकांनी नोकरी सोडली आहे. हे सत्र अजूनही सुरूच आहे.      

 करोनामुळे जगात अनेक देशांत बेरोजगारीची समस्या गंभीर बनली असताना अमेरिकेत मात्र नोकरीचा राजीनामा देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार नोकऱ्या सोडणाऱ्यांमध्ये आदरातिथ्य, वाहतूक, घाऊक व्यावसायिक व सेवा क्षेत्रातील कर्मचारी अधिक आहेत. काही काळ नोकरी बदलण्याच्या विचारात असलेले लोकसुद्धा नोकरीचा राजीनामा देत आहेत. अमेरिकेत स्टार्टअपकडे वाढता कल दिसत असून नोकरी सोडणाऱ्यांत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे.      

चांगला पगार, बोनस देऊनही कर्मचारी नोकरी सोडत आहेत. याचे कारण पैसा नव्हे तर, तणावमुक्त जीवन असल्याचे नोकरी सोडणाऱ्यांचे म्हणणे आहे. करोनाकाळात अमेरिकेत २.२ कोटी लोकांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड तणाव होता. यामुळे मागितल्यानुसार वेळेवर सुट्टी न मिळणे, कामाचा अधिक ताण, मालकांची अरेरावी, लाईफस्टाईल बदलण्याची इच्छा अशा अनेक कारणांनी आता नोकऱ्यांना राजीनामा दिला जात आहे. करोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत होते. आता अनेक कंपन्या ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास सांगत आहेत. ज्यांनी घरून काम केले त्यांना ऑफिसला जाणे त्रासाचे वाटत आहे. याचे कारण म्हणजे वर्क फ्रॉम होम पद्धतीमुळे कुटुंबांसमवेत वेळ घालविण्याची सवय त्यांना लागली आहे. याचा परिणाम कुशल कामगारांची कमतरता जाणवण्यात झाला असून बड्या उद्योगांच्या मालकांसमोर उद्योग सुरू ठेवणे, हे मोठे आव्हान बनले आहे.      

अमेरिकेत सुरू झालेला The Great Resignation हा ट्रेंड आता ऑस्ट्रेलियातही फोफावू लागला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये करोनाची पहिली लाट आल्यानंतर लॉकडाऊन काळात अनेक उद्योगांनी आपले कर्मचारी कमी करून उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून प्रचंड काम करून घेतले. वर्क फ्रॉम होम देतानाचा कामाचा प्रचंड ताणही दिला. मात्र, आता करोनाचा परिणाम कमी झाल्यानंतरही कामाचा ताण तसाच आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांना सुटी मिळत नसल्याने त्यांच्या मनावर मोठा परिणाम होत आहे. या कारणाने लोक स्टार्टअप अंतर्गत स्वतःचा लघु व्यवसाय सुरू करण्यावर भर देऊ लागले आहेत. परिणामी येथील उद्योगांतही कुशल मनुष्यबळाचा अभाव निर्माण होऊ लागला आहे.