कर्नाटकात करोनाचे संक्रमण वाढले

- निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना लागण; तर ७ नवे डेल्टा प्लसचे रुग्ण

Story: बंगळूर |
29th October 2021, 12:34 am
कर्नाटकात करोनाचे संक्रमण वाढले

बंगळूर : कर्नाटकमध्ये करोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोडगू जिल्ह्यातील एका निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० मुली आणि २२ मुलांचा समावेश आहे. एका आठवड्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी नववी ते बारावीच्या वर्गातील आहेत. तसेच राज्यात डेल्टा प्लस प्रकाराचा संसर्ग झालेले सात रुग्ण आढळले आहेत. या प्रकारच्या संसर्गाचे तीन रुग्ण बेंगळुरूतील असून, इतर चार रुग्ण राज्याच्या अन्य भागांतील आहेत, अशी माहिती कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आयुक्त डी. रणदीप यांनी दिली.

 करोनाच्या नवीन प्रकारच्या संसर्गामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. मात्र, दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'आंतरराष्ट्रीय विमानप्रवाशांसाठी कर्नाटक सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना करोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही चाचणी प्रवास सुरू करण्यापूर्वी ७२ तास आधी केलेली असावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 'एअर सुविधा' पोर्टलवर प्रवशांना हा अहवाल अपलोड करावा लागेल. विलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही,' असेही रणदीप यांनी सांगितले.


हेही वाचा