अग्रलेख / पुन्हा ‘जय श्री राम’

ममता बॅनर्जी यांचे मनोबल खचविण्यासाठी काही करायचे असेल तर संकल्पनाही तेवढीच जबरदस्त हवी, मग त्यात वाद निर्माण झाला तरी चालेल अशा हेतूने भाजपने 'जय श्री राम 'चा नारा शोधून काढला असेल.

Story: अग्रलेख |
29th October 2021, 12:26 Hrs
अग्रलेख / पुन्हा ‘जय श्री राम’

टीएमसीने एक कार्टून गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यात ममता बॅनर्जी यांच्या पायाखाली काही नेते येत आहेत असे दाखवले गेले. नंतर लगेच ते कार्टून हटवले. गोव्याच्या राजकारणाशी ते संबंधित होते असे तर्क काढले गेले. ते कार्टून हटवल्यामुळे तृणमूलला आपण केलेली चूक कळून चुकली पण त्यापूर्वीच त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. ह्या कार्टूनमुळे भाजपला प्रचंड राग होता. त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गोवा दौऱ्यामुळे त्यांना गोव्यात आल्या आल्या कसे चिडवायचे आणि त्यांचे मनोबल खचेल असे काहीतरी अभिनव करायचे, यासाठी भाजप गेले चार पाच दिवस विवंचनेत होती. दिल्लीत बैठका, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या गोव्यात बैठका, इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू होते आणि शेवटी त्यांना काही युक्त्या सुचल्या. शेवटी ममता बॅनर्जी यांचे मनोबल खचविण्यासाठी काही करायचे असेल तर संकल्पनाही तेवढीच जबरदस्त हवी, मग त्यात वाद निर्माण झाला तरी चालेल अशा हेतूने भाजपने 'जय श्री राम 'चा नारा शोधून काढला असेल. गोव्याच्या राजकारणात असे नारे कधी लागले नाहीत. इथे प्रभू राम, येशू ख्रिस्त यांना मानणारे सारेच एकत्र नांदतात. धार्मिक सलोख्याच्या बाबतीत गोवा कायम अग्रेसर राहिला आहे. अशा वेळी भाजपचा 'जय श्री राम' चा नारा चर्चेत आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्यासमोर 'जय श्री राम' चा नारा लावल्यास तिथे भाजप मूळ धरू शकते, असा समज भाजपच्या कार्यकर्त्यांनी करून घेतल्यापासून ते हाच नारा वापरून बॅनर्जी यांना कमी लेखण्याच्या प्रयत्न करत आहेत. ह्या नाऱ्यामुळे त्यांना खलनायिका केले गेले आणि लोकसभा निवडणुकीत तृणमूलला २२ जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपला थेट १८ जागा मिळाल्या असे मानले जाते. भाजपला ते कळल्यानंतर त्यांनी तिथे विधानसभा निवडणुकीतही तेच 'भांडवल' गुंतवलेॉ; पण तिथे मात्र भाजपचे काही चालले नाही. आता गोव्यात त्यांना 'जय श्री राम' चा नारा देऊन चिडवण्याचा प्रयोग भाजप करू पाहत आहे पण हा प्रयोग किती यशस्वी होतो ते येणाऱ्या काळात कळेल.
नारा देणारे लोक प्रभू राम यांच्याविषयी किती आस्था ठेवतात किंवा त्यांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांच्याविषयी काय, किती माहिती आहे हे त्यांनाच ठाऊक. रामाच्या नावाने राजकारण करण्यात माहीर असलेल्या भाजपने वेळोवेळी त्यांच्या नावाचा वापर केला. कधी मंदीर बांधण्याचे आश्वासन देऊन तर कधी जय श्री राम म्हणून. पण गोव्याच्या राजकारणात असा प्रकार कधी घडलेला नव्हता. गोव्यात ज्या पद्धतीने ठिकठिकाणी जय श्री रामचे होर्डींग्ज रात्रीत उभे राहिले ते पाहता भाजपला काय अपेक्षित आहे हा प्रश्न आहे. कारण भाजपजवळ निम्मे आमदारच ख्रिस्ती समाजाचे आहेत. अशा वेळी भाजप प्रभू रामांचे कार्ड वापरून कशा पद्धतीने मतदारांसमोर जाईल की हे होर्डींग्जचे राजकारण भाजपला त्रासदायक ठरेल ते येत्या निवडणुकीत कळेल. गोव्याच्या राजकारणात निश्चितच काही ठिकाणी काही धर्मगुरुंचा प्रभाव आहे. निवडणुकीच्या काळात काही स्वामी, चर्चचे धर्मगुरू हे आपल्या परीने लोकांना संदेश देत असतात. पण इतके असूनही जसा धार्मिक सलोखा जपला गेला तसाच धार्मिक सलोखा यापुढेही जपणे हे गोव्यातील राजकीय पक्षांचे काम आहे. जय श्री रामचा नारा लावणे यात काही गैर नाही. पण त्याच्या आडून राजकारण करण्याचा प्रकार टाळणे गरजेचे आहे.
जिथे ममता बॅनर्जी यांचे फलक लागलेले आहेत तिथेच शेजारी 'जय श्री राम' चे बॅनर आणि होर्डींग लागलेले राज्यभर चित्र आहे. काही ठिकाणी बॅनर्जी यांच्या पोस्टरला काळे फासण्याचेही प्रकार घडले आहेत. तर भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी व्हॉट्सएपचा आपला स्टेटस आणि सोशल मीडियावर तृणमूलच्या विरोधात एक संदेश पोस्ट केला आहे. 'पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने निवडणूक पूर्व काळात हजारो भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली, त्यांना श्रद्धांजली म्हणून ममता बॅनर्जी गोव्यात येत आहेत, त्या निमित्ताने सर्वांनी 'जय श्री राम' असा स्टेटस ठेवूया' असा इंग्रजीतील एक संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट केला आहे. सर्वांचा स्टेटस व सर्वांचे पोस्ट जशास तसे आहेत. एकूणच काय तर गोव्याच्या राजकारणात तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या सोबतच 'जय श्री राम' चा नाराही आला आहे.