हरमल पंचक्रोशी विद्यालयात दिवाळीनंतर पाचवीपासून वर्ग

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th October 2021, 11:08 pm
हरमल पंचक्रोशी विद्यालयात दिवाळीनंतर पाचवीपासून वर्ग

पणजी : मांद्रे येथील हरमल पंचक्रोशी विद्यालयात दिवाळीच्या सुटीनंतर इयत्ता पाचवीपासून सर्व ऑफलाईन वर्ग सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. सध्या विद्यालयात नववी आणि दहावीचे वर्ग सुरू आहेत.

कोविडमुळे मार्च २०२० पासून शाळा ऑनलाईन सुरू होत्या. मात्र, करोनाचा जोर ओसरल्याने गेल्याच महिन्यात शिक्षण खात्याने नववीपासून ऑफलाईन वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान हरमल पंचक्रोशीत अकरावी आणि बारावीच वर्ग सुरू झाले आहेत. आता दिवाळीनंतर आठवी ते दहावीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग नियमित सुरू होती. तर पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग आठवड्यातून दोन दिवस ऑफलाईन भरवले जातील, असे प्रा. पार्सेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या शिक्षण संस्थेच्या गणपत पार्सेकर महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचे वर्ग ८ नोव्हेंबरपासून सुरू होतील. या महाविद्यालयात बीए बीएड आणि बीएससी बीएड हे अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षांचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत.
विद्यार्थी बराच काळ शाळांपासून दूर घरीच आहेत. यामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. यामुळे करोनाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे पाळून वर्ग सुरू करावेत, अशी मागणी पालकांकडून होत आहे. याच कारणाने दिवाळीनंतर सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला, असे प्रा. पार्सेकर यांनी म्हटले आहे.