गोव्यात बदल घडवण्याची क्षमता आपमध्येच : नाईक


28th October 2021, 11:07 pm
गोव्यात बदल घडवण्याची क्षमता आपमध्येच : नाईक

पत्रकार परिषदेत सत्यविजय नाईक, वाल्मिकी नाईक, महादेव नाईक व शुभम शिवोलकर.

पणजी : मी दिल्लीत आम आदमी पक्षाचे काम पाहिले आहे. यामुळे गोव्यातही बदल घडवून आणण्याची क्षमता आपमध्ये आहे, यावर माझा ठाम विश्वास बसला आहे, असे प्रतिपादन वाळपईचे नेते सत्यविजय नाईक यांनी केले आहे.

नाईक यांनी बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी आपचे गोवा उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, सदस्य महादेव नाईक आणि शुभम शिवोलकर उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत नाईक यांनी राणे पिता-पुत्रावर टीका केली. वाळपईत कोणतीच विकासकामे झालेली नाहीत. अनेक तरुण बेरोजगार आहेत. या तरुणांना केजरीवाल यांचा ‘रोजगार हमी योजना’ उपयुक्त ठरणार आहे. केजरीवाल हे शब्दाचे पक्के आहेत. म्हणूनच आपमध्ये प्रवेश केला, असे ते यावेळी म्हणाले.
वाळपईच्या आमदाराची हुकूमशाही आपण अनुभवत आहोत. अनुभवी नेते सत्यविजय नाईक वाळपईमध्ये विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणतील, असा मला विश्वास आहे, असे मत शुभम शिवोलकर यांनी यावेळी व्यक्त केले. आम आदमी पक्ष वाळपईमध्ये अथकपणे काम करत आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याच्या प्रवेशाने या कामाला गती मिळेल, असा विश्वास महादेव नाईक यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यासाठीच प्रामाणिक नेते आणि गोवेकर ‘आप’शी जोडले जात आहेत, असे वाल्मिकी नाईक यावेळी म्हणाले.