पुढील काही दशके देशात भाजपचीच सत्ता

तृणमूलचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे भाकीत

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th October 2021, 11:06 pm
पुढील काही दशके देशात भाजपचीच सत्ता

पणजी : पुढील अनेक दशके भाजप हा देशातील शक्तिशाली पक्ष म्हणून राहणार आहे. जनतेने मोदींना हटवले तरी भाजप कायम राहणार आहे. ही गोष्ट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समजेना, असे खोचक विधान तृणमूल काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे. याच विधानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. किशोर यांच्या विधानामुळे तृणमूलचा हेतू काय आहे ते स्पष्ट होते, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
तृणमूलच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी गुरुवारी गोव्यात दाखल झाल्या. तत्पूर्वीच प्रशांत किशोर यांनी वरील विधान केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सलग ४० वर्षे सत्तेत होती. आज भारतीय राजकारणात अशीच स्थिती भाजपची आहे. जनता नाराज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना उलथवून टाकेल, असे काहींना वाटत असेल, तर असे अजिबात होणार नाही. मोदींचा विजय होवो अथवा परायज, देशात भाजपच शक्तिशाली पक्ष राहणार आहे, असा दावा किशोर यांनी यावेळी केला आहे. राहुल गांधी यांची समस्या हीच आहे. काही काळाने जनता भाजपला झिडकारून देईल, असे राहुल यांना वाटते. पण तसे होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसची समस्या अत्यंत जटिल बनली आहे. काही काळांमध्ये त्यावर उपाय होऊ शकणार नाही, असे काही दिवसांपूर्वीच त्यांनी म्हटले आहे.

तृणमूलच्या गोव्यातील प्रवेशामागे शहा यांचा हात!
प्रशांत किशोर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. भाजपला विजयी करण्यासाठीच तृणमूलने गोव्यात प्रवेश केला आहे, असे यापूर्वीच काँग्रेसने स्पष्ट केले होते. किशोर यांच्या विधानामुळे त्याची पुष्टी झाली आहे. यामुळे तृणमूलचे रणनीती काय आहे, ते स्पष्ट झाले आहे. गोव्यात तृणमूलच्या स्थापनेमागे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा हात आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ भाजपला मिळवून देण्याचा डाव आखण्यात आला आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.