हरवलेल्या फाईल्सवरून मडगाव पालिकेत गदारोळ

कनिष्ठ अभियंत्याला कचरा विभागात पाठवण्याचा ठराव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th October 2021, 11:04 pm
हरवलेल्या फाईल्सवरून मडगाव पालिकेत गदारोळ

अभियंता विकास प्रभुदेसाईच्या टेबलची झडती घेताना नगरसेवक व अधिकारी. (संतोष मिरजकर)

मडगाव : सोनसडोवरील शेड उभारणीची फाईल्स माझ्याकडे नाही, असे सांगणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याच्या टेबलची झडती घेतली असता फाईलसोबतचे ‘मेजरमेंट बुक’ टेबलमध्येच सापडल्याने मडगाव पालिका मंडळाने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर संबंधित अभियंत्याला कचरा विभागात पाठवावे, न्यायालयाशी संबंधित कामे द्यावीत, पण विकासकामांच्या फाईल्स त्याच्याकडे देऊ नयेत, असा ठराव घेण्यात आला.
मडगाव पालिका मंडळाची गुरुवारची बैठक पालिका कार्यालयातून हरवणाऱ्या फाईल्सवरून वादग्रस्त ठरली. सोनसडो येथे शेड उभारणी करण्याबाबतच्या कामाची फाईल गेली दीड वर्षे मिळत नव्हती. त्यामुळे बैठकीत नगरसेवकांनी कनिष्ठ अभियंत्याकडे विचारणा केली. यावेळी नगरसेवक सगुण नाईक, सदानंद नाईक, दामोदर शिरोडकर, महेश आमोणकर, पूजा नाईक यांच्यासह इतर नगरसेवकांनी हा मुद्दा उचलून धरला. पालिकेचा तांत्रिक विभाग कोणतेही काम करत नसल्याने अनेक कामे रखडली असल्याचे यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. तर, कनिष्ठ अभियंता विकास प्रभुदेसाई यांनी शेड बांधकामाची फाईल माझ्याकडे नाही, असे सांगितले. यावर चर्चेअंती अभियंत्याच्या टेबलची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्याच्या टेबलची पाहणी केली, त्यावेळी सोनसडो येथील शेड बांधकामाचे ‘मेजरमेंट बुक’ मिळाले. फाईल मात्र मिळाली नाही. ती फाईल दुसऱ्या पालिका अधिकाऱ्याकडे दिलेली असल्याचे कारण अभियंत्याने दिलेले आहे. फाईल दिली असती तर संबंधित मेजरमेंट बुकही फाईल्ससोबत देणे गरजेचे होते. मात्र, ते अभियंत्याकडेच आढळून आले. त्यामुळे नगरसेवकांचा संशय बळावला.
कनिष्ठ अभियंत्याचे वर्तन संशयास्पद असल्याने त्यांना सोनसडो येथील कचरा विभागात पाठवण्यात यावे. कोणत्याही प्रभागाच्या विकासकामाची फाईल त्यांच्याकडे देण्यात येऊ नये, असे पालिका मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले. पालिका कार्यालयातून हरवलेल्या सर्व फाईल्स मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी यावेळी दिले. फाईल्स कुणाकडून हरवलेल्या आहेत, याचा पुढील काही दिवसांत पाठपुरावा करणार. त्यानंतर गरज पडल्यास पोलिसांत तक्रार नोंद करणार असल्याचेही नगराध्यक्ष परेरा यांनी सांगितले.

अडीच वर्षांपासून कोट्यवधींचा निधी विनावापर!
२०१८-१९ साली पालिकेला प्राप्त झालेल्या निधीपैकी ८ कोटी १२ लाखांचा निधी अजून कोणत्याही विकासकामांसाठी वापरण्यात आलेला नाही. याशिवाय सुवर्णजयंतीनिमित्त घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळालेल्या निधीपैकी १ कोटी ८ लाख ७५ हजाराचा निधी वापराविना आहे. याशिवाय चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त १० कोटी व १५व्या वित्त आयोगाचे प्राप्त ८ कोटी ४३ लाखांचा निधी अजूनही पालिकेकडे विनावापर असल्याची माहिती बैठकीवेळी मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली.

नगराध्यक्ष परेरा म्हणतात...
- व्यापार परवाना, बांधकाम मंजुरी आलेल्या अशा कोणत्याही प्रकारच्या फाईल्स नगराध्यक्ष म्हणून माझ्याकडे पाठवण्यात आलेल्या नाहीत. रस्ता बांधकामाबाबतची फाईल थेट मुख्याधिकाऱ्याकडे देण्यात आल्याचे मुख्य अभियंत्याने सांगितले आहे. त्या ठिकाणाहून ती फाईल हरवली आहे.
- शेड उभारणी करण्याची व ग्रासकटर घेण्याबाबतची फाईल्स हरवली आहे. सर्व प्रकारच्या फाईल्स कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, मुख्य अभियंता यांच्याकडून मुख्याधिकारी व त्यानंतर मुख्य अभियंता यांच्याकडे दिली जाते. नगराध्यक्षांना या प्रक्रियेत घेतलेच जात नाही.