उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय अभ्यास महत्त्वाचा

उपराष्ट्रपती : आंबिये महाविद्यालयाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th October 2021, 11:02 pm
उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय अभ्यास महत्त्वाचा

उद्घाटन सत्रात दीपप्रज्वलन करताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू. सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर व आमदार दयानंद सोपटे.

पेडणे : २१ व्या शतकातील अर्थव्यवस्थेत, कोणतेही क्षेत्र एका विशिष्ट चाकोरीत काम करत नाही. त्यात बहुकुशलता अपेक्षित आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांमध्येही सर्व महाविद्यालयांनी अधिकाधिक बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. हाच दृष्टिकोन लक्षात घेऊन गोवा सरकारने ‘राज्य संशोधन प्रतिष्ठान’ स्थापन करण्याची आखलेली योजना कौतुकास्पद आहे. हा उपक्रम उच्च शिक्षण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट दर्जा निर्माण करेल, असे उद्गार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी काढले.
पेडणे येथील संत सोहिरोबनाथ अांबिये शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन संकुलाचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, आमदार दयानंद सोपटे, मुख्य सचिव परिमल राय आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ आखले आहे. त्याला पोषक असे संशोधन कार्य करण्यासाठी गोवा सरकारने योजना आखली आहे. त्यात उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय विद्यावृत्ती प्रदान करण्यावर भर देण्यात येत आहे. कारण विषयांच्या कठोर पृथक्करणाचे युग संपले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात बहुशाखीय दृष्टीकोन स्वीकारणे गरजेचे आहे, असे आवाहन उपराष्ट्रपती नायडू यांनी यावेळी केले. कला आणि सामाजिक विज्ञानाचे शिक्षण सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचार करायला तसेच विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते, असे ते म्हणाले. गोवा सरकारच्या अनेक संस्थांमध्ये वाणिज्य आणि आर्थिक प्रयोगशाळा आणि भाषा प्रयोगशाळा स्थापन केल्याबद्दल नायडू यांनी गोवा सरकारची प्रशंसा केली.
या कार्यक्रमात राज्यपाल पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. सावंत व केंद्रीय मंत्री नाईक यांनी समयोचित विचार मांडले. उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव राय यांनी आभार मानले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.

उपराष्ट्रपती म्हणतात...
- वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या शिक्षण पद्धतीचे भारतीयीकरण करण्याची गरज आहे.
- आपण जगातील कुठल्याही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि स्वीकारल्या पाहिजेत.
- जगातील चांगल्या गोष्टी स्वीकारताना भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर ठाम विश्वास देखील हवा.
- गोवा मुक्ती संग्रामात अनेकांनी बलिदान केले. याविषयी विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे.
- शालेय स्तरावरील शिक्षणात मातृभाषेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.