लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अंशकालिक शिक्षकांचा इशारा


28th October 2021, 08:22 am
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच

आझाद मैदानावर आंदोलन करणारे अंशकालिक शिक्षक. (नारायण पिसुर्लेकर)

लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच
समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अंशकालिक शिक्षकांचा इशारा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राट तत्त्वावर असलेल्या राज्यातील अंशकालिक (पार्टटाइम) शिक्षकांनी बुधवारी आझाद मैदानावर आंदोलन करून सेवेत कायम करण्याची मागणी केली. जोपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी कंत्राटावरील अंशकालिक शिक्षकांनी
दिला.
राज्यातील विविध विद्यालयांमध्ये आमची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर अंशकालिक शिक्षक म्हणून झाली असली तरी आम्ही सेवेत कायम असलेल्या शिक्षकांप्रमाणे काम करत आहोत. पण, आम्हाला अजूनही महिन्याला फक्त १५ हजार रुपये पगार दिला जातो. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी भरती केली होती. आता एवढी वर्षे झाली तरी अजून आम्हाला सेवेत कायम केलेले नाही. राज्यातील विविध विद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये आमची भरती करावी. अन्यथा ज्या शाळेत आम्ही काम करत आहोत तेथे कायम करावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली.
शिक्षक होण्यासाठी जी पदवी, जो अनुभव आहे तो सर्व आमच्याकडे आहे. सेवेत कायम असलेल्या शिक्षकांप्रमाणेच आम्ही काम करत आहोत. पण आम्हाला पगार मात्र तुटपुंजा दिला जातो. आम्ही अंशकालिक शिक्षक असलो तरी काम नियमित शिक्षकांप्रमाणे आाहे. शिक्षकांनी सर्व पदव्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्याने आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला सेवेत कायम करावे, अशी मागणी अंशकालिक शिक्षकांनी केली आहे.
सरकार आता विविध खात्यांमध्ये १० हजार नोकर्‍या काढत आहे. त्यामुळे, शिक्षण खात्यात नोकर्‍या काढून आम्हाला तिथे सेवेत घ्यावे. आम्ही प्रामाणिकपणे गेली अनेक वर्षे शिकवत आहोत. पण, या तुटपुंज्या पगारामुळे आर्थिक अडचणी येत आहेत. १५ हजारांमध्ये कुटुंबाचा सांभाळ करणे कठीण आहे.
आमच्याकडे सर्व शैक्षणिक पात्रता असून तसेच एवढ्या वर्षांचा अनुभव असूनही आमच्यावर हा अन्याय होत आहे. जोपर्यंत आम्हाला सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे, असे यावेळी या अंशकालिक शिक्षकांनी सांगितले.