नोकऱ्या न दिल्यास तीव्र आंदोलन

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचा आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार


28th October 2021, 08:19 am
नोकऱ्या न दिल्यास तीव्र आंदोलन

आझाद मैदानावर आंदोलन करताना स्वातंत्र्यसैनिकांची मुले. (नारायण पिसुर्लेकर)

नोकऱ्या न दिल्यास तीव्र आंदोलन
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचा आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार     
पणजी :  स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या संघटनेने बुधवारी आझाद मैदानावर निदर्शने केली. नोव्हेंबरपर्यंत सरकारी नोकर्‍या मिळाल्या नाहीत तर १ डिसेंबरपासून सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी दिला आहे.      
गेल्या जानेवारी महिन्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी आझाद मैदानावर सरकार विरोधात आमरण उपोषण केले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच लेखी आश्वासन दिले होते. पण, फक्त २३ जणांना अजूनपर्यंत सरकारी नोकर्‍या दिल्या आहेत. सरकारच्या यादीनुसार अजून २२७ जणांना सरकारी नोकर्‍या दिलेल्या नाहीत. काही जणांनी नोकरीसाठी पात्र वयोमर्यादा ओलांडली आहे. तरीही, सरकारने या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांची काहीच दखल घेतलेली नाही. आता १० हजार सरकारी नोकर्‍या सरकार काढत आहे. यात या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सामावून घ्यावे अन्यथा १ डिसेंबरपासून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी या संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी दिला.


बाबू च्यारी  यांना नोकरी किंवा पेन्शन द्या!      
स्वातंत्र्यसैनिक नागेश च्यारी यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांचे घर त्यांच्या पेन्शवर चालत होते. नागेश च्यारी यांचे सुपुत्र बाबू च्यारी अजून बेरोजगार आहेत. सरकारने बाबू च्यारी यांना सरकारी नोकरी द्यावी. अन्यथा त्यांची पेन्शन त्यांच्या कुटुंबाला द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सरकारने स्व. नागेश च्यारी यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही. सरकारला स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा आता विसर पडला आहे. 
— डॉ. शिवाजी शेट