आर्यनच्या जामिनावर आज निर्णय शक्य

- ‘एनसीबी’च्या वतीने सरकारी वकिलांचा होणार युक्तिवाद

Story: मुंबई : |
28th October 2021, 12:38 am
आर्यनच्या जामिनावर आज निर्णय शक्य

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन याला बुधवारीही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. आर्यन खान प्रकरणाची सुनावणी अपूर्ण राहिली असून, गुरुवारी दुपारपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
आरोपी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या वकिलांनी आरोपींना जामीन मिळावा, यासाठी कोर्टात युक्तिवाद केला. आता एनसीबीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांचा गुरुवारी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर हायकोर्टाकडून लगेच आदेश दिला जाण्याची शक्यता आहे किंवा निर्णय राखूनही ठेवला जाऊ शकतो.
असे झाले युक्तिवाद...
* सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडली; तर मर्चंटची बाजू ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मांडली. तसेच अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग कोर्टात एनसीबीची बाजू मांडण्यासाठी कोर्टात दाखल झाले होते.
* 'आजपर्यंत आरोपींना कट कारस्थानाच्या आरोपाखाली अटक दाखवण्यातच आलेली नाही. अटकेच्या वेळी अमली पदार्थ बाळगणे आणि सेवन एवढ्याच आरोपाखाली कलमे लावली होती, हे त्यांचा अटक पंचनामा पाहिल्यानंतर स्पष्ट होते. एनसीबीने नंतर त्यांना कोर्टात हजर करून कोठडी मिळवताना कलम २८, २९ ही कट कारस्थानाची कलमे लावली,' असा दावा अमित देसाई यांनी केला.
* 'अमली पदार्थाचे सेवन केले, हे प्रुव्ह करण्यासाठी सुद्धा रक्त तपासणी करणे आवश्यक असते, तेही एनसीबीने केलेले नाही. जसे रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबी आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित रक्त तपासणी केली जाते. महत्त्वाचे म्हणजे कट कारस्थानाच्या एनसीबीने मांडलेल्या थिअरीमध्येच आरोपी असलेल्या याच प्रकरणातील दोघांना काल एनडीपीएस कोर्टानेही जामीन मंजूर केला. क्रूझ परत आल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी सेवनाच्या आरोपाखाली एनसीबीने त्यांना अटक केली होती’, असेही देसाई यांनी कोर्टात सांगितले.
* दरम्यान, अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग हे कोर्टात एनसीबीच्या बाजूने युक्तिवाद करतील. त्यानंतरच कोर्ट आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.