तेजपाल यांच्या वकिलांनी मागितली वेळ

पुढील सुनावणी होणार १६ नोव्हेंबरला


28th October 2021, 12:25 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राज्य सरकारने सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राज्य सरकारने आव्हान दिलेल्या याचिकेत बाजू मांडण्यासाठी तेजपाल यांच्यातर्फे वकिलांनी आणखीन मुदत मागितली आहे. याची दखल घेऊन खंडपीठाने पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.      

तेजपाल यांना २०१३ मधील सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २१ मे रोजी दोषमुक्त केले होते. या निवाड्याला राज्य सरकारने खंडपीठात आव्हान दिले आहे. याप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली असता, वरिष्ठ वकील अमित देसाई इतर प्रकरणात व्यस्त असल्यामुळे या प्रकरणात  बाजू मांडण्यासाठी आणखीन वेळ मागितला आहे. याची दखल घेऊन खंडपीठाने पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.      

गोव्यात झालेल्या ‘थिंक फेस्ट’ सोहळ्यावेळी एका सहकारी महिलेवर ७ व ८ नोव्हेंबर २०१३ रोजी हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राष्ट्रीय वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातमीची स्वतःहून दखल घेऊन २२ नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.