कौशल्य व डिझाईनिंग विद्यापीठ गोव्यात स्थापणार

मुख्यमंत्री : आसगावात नोकरी मेळाव्याचे उद्घाटन


28th October 2021, 12:04 am
कौशल्य व डिझाईनिंग विद्यापीठ गोव्यात स्थापणार

फोटो : नोकरी मेळाव्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत महसूलमंत्री जेनिफर मॉन्सेरात, आमदार ग्लेन टिकलो, आमदार जोशुआ डिसोझा, कामगार आयुक्त राजू गावस व श्रीकृष्ण पोकळे.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी विविध सरकारी योजना आणि शिक्षणासाठी अनुदान दिले जाते. गोव्यात लवकरच कौशल्य व डिझाईनिंग विद्यापीठ सुरू केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. बुधवारी आसगाव-म्हापसा येथील ज्ञानप्रसारक महाविद्यालयात ‘स्वयंपूर्ण गोवा’अंतर्गत कामगार खात्याच्या पुढाकाराने नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री जेनिफर मॉन्सेरात, आमदार ग्लेन टिकलो, आमदार जोशुआ डिसोझा, ज्ञानप्रसारक महाविद्यालयाचे चेअरमन श्रीकृष्ण पोकळे, कामगार आयुक्त राजू गावस उपस्थित होते.
या मेळाव्यात सुमारे ६० कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. २५ सरकारी खात्यांचे स्टॉल्स लागले होते. १० व ११ नोव्हेंबर रोजी दोनापावला येथे श्यामा प्रसाद स्टेडियममध्ये राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यावेळी राष्ट्रीय आणि राज्यातील विषयांवर वादविवाद घडवून आणले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महसूलमंत्री जेनिफर मॉन्सेरात म्हणाल्या, नोकरी मेळाव्यातून युवकांना विविध क्षेत्रांशी निगडित कंपन्यांची माहिती मिळते. रोजगाराची संधी मिळण्याचे हे व्यासपीठ आहे. आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले, युवकांनी सरकारी नोकर्‍यांच्या मागे धावू नये. खासगी क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध असतात. खासगी क्षेत्राला कमी लेखू नये.

हेही वाचा