सुर्‍याचा धाक दाखवून लुबाडणारी टोळी गजाआड

कळंगुट पोलिसांची कारवाई : १२ मोबाईल जप्त


28th October 2021, 12:01 am
सुर्‍याचा धाक दाखवून लुबाडणारी टोळी गजाआड

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : लोकांना निर्जनस्थळी गाठून सुर्‍याचा धाक दाखवून किंवा दुचाकीवरून महागडे मोबाईल हिसकावणार्‍या चार जणांच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला कळंगुट पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयितांकडून सुमारे ८ लाख रुपयांचे १२ आयफोन मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी साईराज गोवेकर (२३, पिळर्ण), मायलन व्हिएगस (२७, ताळगांव), सुनील चव्हाण (२४, पिळर्ण) आणि सलीम रोटीवाला (२१, नेरूळ) यांना अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेरूळ पुलाजवळ, पिळर्ण आद्योगिक वसाहत आणि पिळर्ण या कळंगुट, साळगाव व पर्वरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत संशयितांनी मोबाईल फोन हिसकावून नेण्याचा सपाटाच लावला होता. कांदोळी येथे नेरूळ पुलाजवळ दि. १८ ऑक्टोबर रोजी असाच प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे कळंगुट पोलिसांनी मंगळवारी रात्री या चौघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून अंदाजे ८ लाख रुपयांचे १२ आयफोन मोबाईल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली एक पल्सर व एक ज्युपिटर दुचाकी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राजाराम भागकर, सपना गावस, हवालदार देविदास हळदणकर, विनय श्रीवास्तव, विनोद नाईक, काँस्टेबल शंशाक साखळकर, दिनेश मोरजकर, रूपेश साळगावकर यांनी ही कारवाई केली. संशयितांना येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संशयितांवर विविध स्थानकांत गुन्हे नोंद
अटक केलेल्यांपैकी तिघे संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद आहेत. संशयित साईराज गोवेकर याच्याविरुद्ध १० गुन्हे नोंद असून त्यात एक लैंगिक अत्याचार, प्राणघातक हल्ला व चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. संशयित सुनील चव्हाण याच्यावर चार गुन्हे नोंद आहेत. संशयित मायलन व्हिएगस याच्यावर तीन गुन्हे नोंद आहेत. सलीम रोटीवाला याचाही अनेक गुन्ह्यांत सहभाग आहे; पण त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झालेला नाही.

हेही वाचा