पाकिस्तानची न्यूझीलंडवर सहज मात

किवींना १३४ धावांत गुंडाळले : पाकच्या गोलंदाजांचा पुन्हा प्रभावी मारा

|
26th October 2021, 11:57 Hrs
पाकिस्तानची न्यूझीलंडवर सहज मात

शारजा : पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकने निम्मा संघ माघारी गेला असताना अक्रमक खेळी करणाऱ्या आसिफ सोबत ६ व्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावरच पाकिस्तानने न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला. शोएब मलिकने नाबाद २६ धावा केल्या तर आसिफ अलीने १२ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा ठोकल्या. मोहम्मद रिझवाननेही ३३ धावांची चिवट खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोधीने २८ धावा देत सर्वाधिक २ विकेट घेतल्या.
न्यूझीलंडने ठेवलेल्या १३५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्ताची सुरुवात संथ झाली. न्यूझीलंडने संथ होत असलेल्या विकेटचा फायदा उचलत बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला पॉवर प्लेमध्ये फार हात खोलण्याची संधी दिली नाही. याच दबावात सहाव्या षटकात बाबर आझम साऊदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
बाबर बाद झाल्यानंतर आलेल्या फकर जमानलाही मोठे फटके मारता आले नाही. तोही १७ चेंडूत ११ धावा करून सोधीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सँटनरने ६ चेंडूत ११ धावांची छोटेखानी खेळी करणाऱ्या पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीजला पॅव्हेलियन धाडले. यामुळे पाकिस्तानची अवस्था ११ षटकांत ३ बाद ६३ धावा अशी झाली.
भारतीय वंशाच्या इश सोधीने पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा धक्का दिला. त्याने ३४ चेंडूत ३३ धावांची खेळी चिवट खेळी करणाऱ्या मोहम्मद रिजवानला बाद केले. रिझवाननंतर इमाद वासिमही ११ धावांची भर घालून माघारी गेला. निम्मा संघ माघारी गेल्यानंतर अनुभवी शोएब मलिकने पाकिस्तानचा डाव सावरत धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. त्याच्या जोडीला आलेल्या आसिफ अलीने टीम साऊदीला पाठोपाठ दोन षटकार मारत धावा आणि चेंडूतील अंतर बरेच कमी केले.
त्यानंतर शोएब मलिकने सामना आवाक्यात आणला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी स्वैर मारा केल्यामुळे सामना त्यांच्या हातातून निसटला. अखेर आसिफने ट्रेंड बोल्ट टाकत असलेल्या १९ व्या षटकात षटकार आणि त्यानंतर विजयी दोन धावा घेत सामना संपवला. पाकिस्तानने आपल्या ग्रुपमधील दोन मोठ्या संघांना मात देत गुण तालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने आपल्या डावाची सुरुवात आक्रमक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्टिन गुप्टील आणि डॅरेल मिशेलला फक्त ३६ धावांची सलामी देता आली. गुप्टील १७ धावा करून बाद झाला. त्यानंतर २० चेंडूत २७ धावा करणाऱ्या मिशेलही संघाचे अर्धशतक धावफलकावर लागल्यानंतर माघारी परतला. यानंतर येणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना फार काळ टिकाव धरता आला नाही. संघाची मदार असलेला केन विल्यमसन देखील २५ धावांवर धावबाद झाला. विल्यमसन बाद झाला त्यावेळी न्यूझीलंडच्या १३ षटकांत ९० धावा झाल्या होत्या.
विल्यमसननंतर आलेल्या कॉनवॉय (२७) आणि ग्लेन फिलिप्स (१३) यांनी न्यूझीलंडला शतक पार करून दिले. हॅरिस रॉफने एकाच षटकात या दोघांना बाद करून स्लॉग ओव्हरमध्ये न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. त्यानंतर न्यूझीलंडने रडत खडत १३४ धावांपर्यंत पोहचला. पाकिस्तानकडून हॅरिस रॉफने २२ धावांत ४ विकेट घेतल्या. त्याला शाहीन, वासिम आणि हाफीजने प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली.

 टीम इंडियाला दिलासा
पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. ३१ रोजीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडसोबत जिंकावेच लागेल. यानंतर अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडसोबत भारताला मोठे विजय प्राप्त करावे लागतील. पाकिस्तान आणि भारताने न्यूझीलंडला हरविले तर भारत उपांत्या फेरीमध्ये पोहचू शकतो.

संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १३४ धावा
पाकिस्तान : १८.४ षटकांत ५ बाद १३५ धावा