राज्यपालपदाचा राजीनामा देऊन आरोपबाजी करा : प्रदेश भाजप

भ्रष्टाचारी नेते राजकीय फायद्यासाठी मलिक यांचा वापर करत असल्याचीही टीका


26th October 2021, 11:48 pm
राज्यपालपदाचा राजीनामा देऊन आरोपबाजी करा : प्रदेश भाजप

फोटो : दामू नाईक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मंत्री असताना जमिनींचे बेकायदेशीरपणे रूपांतर करून तसेच त्यांचे झोन बदलून भ्रष्टाचार केलेले नेते आता राजकीय स्वार्थासाठी गोव्याचे माजी तथा मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा वापर करून घेत आहेत. मलिक यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच आरोपबाजी करावी, असा सल्ला प्रदेश भाजपने मंगळवारी त्यांना दिला.
यासंदर्भात पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार प​रिषदेत प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी या प्रकरणावरून राज्यातील सर्वच विरोधी पक्षांना लक्ष्य केले. भाजप सरकारात मंत्री असताना अनेक भ्रष्टाचार केले म्हणूनच भाजपने गोवा फॉरवर्ड आणि मगोला सत्तेतून बाहेर काढले. याच पक्षांचे नेते आता भाजपवरील राग काढण्यासाठी मेघालयचे राज्यपाल असलेल्या सत्यपाल मलिक यांचा वापर करून घेत आहेत. घटनात्मक पदावर असतानाही राज्यपाल मलिक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारवर नाहक आरोप करत आहेत. ही बाब चिंताजनक आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो हे पक्ष भ्रष्टाचारात बुडालेले आहेत. या पक्षातील नेत्यांच्या मंत्रिपदाच्या खुर्च्या भाजपने घालवल्या. आता त्यांना पुन्हा मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. त्यामुळेच त्यांनी सरकारवर आरोपबाजी सुरू केली आहे. मुळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने कोविड काळात केलेली कामगिरी गोमंतकीय जनतेने पाहिली आहे. त्यावरून जनतेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही गोवा सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’, ‘सरकार तुमच्या दारी’ आदींसारख्या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार गोमंतकीय जनतेचा विकास साधत आहे. हीच गोष्ट विरोधकांच्या डोळ्यांत खुपत असल्यामुळेच ते सरकारवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, अशी टीकाही दामू नाईक यांनी केली.
...........................................................
मलिक यांनी आताच तोंड का उघडले?
ज्या काळात गोव्यात भ्रष्टाचार झाला असा दावा राज्यपाल मलिक करीत आहेत, त्या काळात ते गोव्याचे राज्यपाल होते. मग, त्यावेळीच त्यांनी या भ्रष्टाचारावर बोट का ठेवले नाही, विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतरच त्यांनी तोंड का उघडले आहे, या प्रश्नांची उत्तरे गोमंतकीय जनतेला माहिती आहेत. त्यामुळे जनतेचा भाजप सरकारवरील विश्वास अजिबात ढळणार नाही, असा ठाम विश्वासही सरचिटणीस दामू नाईक यांनी व्यक्त केला.