क्षात शिस्त, एकजूट ठेवा : सोनिया गांधी


26th October 2021, 10:21 pm
क्षात शिस्त, एकजूट ठेवा : सोनिया गांधी

क्षात शिस्त, एकजूट ठेवा : सोनिया गांधी
नवी दिल्लीः
पक्ष पदाधिकार्‍यांच्या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी  यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर रोज कॉंग्रेसकडून विधाने केली जात आहेत. पण तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचत नाहीत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. धोरणात्मक मुद्द्यांवर राज्यस्तरीय नेत्यांमध्ये वैचारिक स्पष्टता आणि एकजुटीचा अभाव दिसतो. पक्षात शिस्त आणि एकजूट ठेवण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षा सोडून संघटनेसाठी काम करायला हवे. यावरच आपले वैयक्तिक आणि सामूहिक यश अवलंबून आहे, असे कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सोनिया गांधींनी पुन्हा एकदा पक्षाच्या नेत्यांना सूचना केली आहे.
महागाई आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर १ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या सदस्यत्व अभियानाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सरचिटणीस, प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींनी भाजप-आरएसएसवरही जोरदार प्रहार केला. भाजप-आरएसएसच्या द्वेषपूर्ण मोहिमेला तोंड देणे आणि त्यांचा पर्दाफाश करणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण तयारीनिशी देशात लोकशाही, संविधान आणि कॉंग्रेसची विचारधारा वाचवण्याची लढाई लढता येईल, जेणेकरून वाईट प्रचार ओळखता येईल आणि त्याचा सामना करता येईल, असे सोनिया गांधी म्हणाल्या. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते.
राष्ट्रीय मुद्द्यांवर कॉंग्रेसची भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही आणि धोरणात्मक मुद्द्यांवर राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये स्पष्टता आणि एकजुटीचा अभाव असल्याबद्दल सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली. कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि विविध मुद्द्यांवर आंदोलनाची गरज आहे. शेतकरी, शेतमजूर, तरुण, छोटे दुकानदार, अशा सरकारपासून पीडित असलेल्या घटकांसाठी आपल्याला लढा अधिक तीव्र करावा लागेल, असे आवाहन सोनिया गांधींनी कर्याकर्त्यांना केले.
सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकार जबाबदारी टाळण्यासाठी संस्थांना कमकुवत करत आहे. राज्यघटनेच्या मूल्यांना डावलले जात असून लोकशाहीच्या पायावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, अशी टीका सोनिया गांधींनी केली. आपल्या आकांक्षांना आवाज देणार्‍या आंदोलनाच्या शोधत देशभरातील तरुण आहेत. त्यांना असे व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन सभासदत्व मोहीम पारदर्शकपणे राबवावी लागणार आहे, अशी सूचना सोनिया गांधी यांनी केली.