अगम्य (भाग २)

मागच्या भागात आपण पाहिले की डॉक्टरांचा मित्र त्यांना आपला अनुभव कथन करताना त्याला एका इस्पितळात दिसलेल्या एका आजी आणि नातवाविषयीचे वर्णन करतो... आता पुढे...

Story: स्टेथोस्कोप । डॉ. अनिकेत मयेकर, ९४२०१५ |
23rd October 2021, 11:46 pm
अगम्य (भाग २)

आतून अचानक एवढ्यात जमदग्नीच्या कडकडाटाचा आवाज आला. त्या शिकावू डॉक्टरवर ते कडाडत होते. आणि भरीस भर म्हणून समोरच्या पेशंटने त्याला डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्ट केल्या नव्हत्या. मला त्या जमदग्नीचा रागच आला. फाडफाड नुसता बोलतच होता. काही ऐकून न घेता. मग काय विचार केला. ताड्कन उठला, बाहेर आला. जमदग्नी म्हणजे नेमकं काय प्रकार असेल तो समोर मूर्तिमंत उभा. डोळे रागाने लाल्लाल झालेले . खाऊ की गिळू नजरेने त्याने आधी त्या पेशंटला टेस्ट करायला पाठवलं. राऊंडला जाऊन नंतर डॉक्टर पुढचे पेशंट घेणार असं समजलं. झालं. म्हणजे अजून तास दीड तास सहज जायचा. मनातल्या मनात जमदग्नीला शिव्या घालत असताना जमदग्नी पुढे चालत गेलेला तो अचानक काहीसं आठवल्यासारखा मागे वळला. आला आणि थेट आज्जीच्या समोर जाऊन खाली वाकला. बसल्या जागी आजीने उठायचा प्रयत्न केला. नातवाला मांडीवर घेऊन उठायला काही तिला जमेना. त्या नातवाला डॉक्टरनी स्वतः उचलून घेतलं अगदी अलगद. त्या पांढऱ्याशुभ्र ऍप्रनवर काहीशी नाराजीची लहर पसरली…

 त्या बाळाला उचलून घेऊन आजींना त्याने एका हाताने उठवलं. काय आज्जे… सांगितलं ना जमिनीवर बसत जाऊ नकोस. अगं एकदा करोना आपलं काही बिघडवू शकला म्हणून काय एवढा कॉन्फिडन्स?अगं नातवाला ऑफिसमध्ये डबा करुन द्यायला राहणार आहेस की नाही?? असं काय ते करायचं? चल, opd मध्ये बस." तेवढ्यात इतर इंटर्नना त्यांनी काही सूचना दिल्या आणि आज्जीकडे पिटाळलं. "मी येतो याला घेऊन."असं म्हणून डॉक्टर त्या तिच्या नातवाला घेऊन कॅन्टीनच्या दिशेने निघून गेले. पुन्हा आलें ते त्या मुलाच्या हातात मोठी चॉकलेट आणि आपल्या एका हातात खाऊची पिशवी घेऊन. नातू पण आता छान हसत होता. त्याला घेऊन ते आत opd मध्ये गेले.

मी इकडे अवाक् होऊन हे सगळं मघापासून पाहत होतो. मघाची फरशी पुसणारी बाई तिथेच होती. मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे एकदा बघितलं आणि तिने थोडक्यात सांगितलं. लातूरच्या भूकंपात डॉक्टरांचे आई वडील गेले. आपल्या आजोबांसोबत लहान वयात कोल्हापूरात ते आले आणि आजोबांनी त्यांना तळहाताच्या फोडासारखं जपत वाढवलं. रोजंदारीवर कामं करुन आजोबांनी आपल्या नातवाला लहानाचं मोठं करुन चांगला मोठा डॉक्टर बनवलं. नातू पण आपल्या आजोबांवर तेवढाच जीव घालतो." वरवरून जमदग्नी जरी वाटत असले, तरी आत शहाळ्याचा गोडवा बरं का आमच्या सायबांचा. असे काय उगीच रागावणार नाय.. असतोच ना लोड इतका … पेशंट पण ऐकत नाहीत सांगितलेलं डॉक्टरांनी..." मावशी फरशी पुसता पुसता अभिमानाने त्यांच्याबद्धल बोलल्या… "

" मी मात्र विचारात पडलो.. मी मनातल्या मनात या डॉक्टरांना जमदग्नी म्हटलेलं ह्या मावशींना समजलं कसं!!!" तो डोळे मिचकावत माझ्याकडे मिश्किलपणे हसत बोलत होता.

 खरंच… रुग्णांची वाढलेली संख्या, जबाबदारी आणि तासनतास कामामुळे आलेला ताण, निःस्वार्थीपणे स्वीकारलेलं हे वैद्यकीय सेवेचं व्रत… या सगळयांत कधीतरी तोल जातोच. त्या त्या वेळी ते पट्टीचं बोलणंही कदाचित तेवढंच गरजेचं असतंच. डॉक्टरांनी सांगूनही काही गोष्टी न ऐकणारे पेशंट, न पाळलेली पथ्ये,न केलेल्या टेस्ट…अश्या कळवळ्याने सांगून न ऐकल्यावर थोडा त्रागा व्हायचा तो होतोच ना.. शेवटी ते ही एक माणूसच! बरोबर ना?

( समाप्त )