साळ - पुनर्वसनच्या अन्नपूर्णा

यथा अन्नं तथा मनः।।, तत्पूर्वी अनुक्रमे 'योग्य खा, चावा घेऊन चावा', 'अन्नासह पुढे जा', 'इष्टतम शिशु आणि तरूण बाल आहार पध्दती: उत्तम बाल आरोग्य' या सारखे थीम असलेले परिपत्रक महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे सप्टेंबर महिन्यात शिक्षण खात्यात झळकतात. यावर्षी मात्र परिपत्रकात सप्ताहाचे माह झाले.

Story: असे उपक्रम अशी शाळा । संकेत सुरेश नाईक |
23rd October 2021, 11:43 pm
साळ - पुनर्वसनच्या अन्नपूर्णा

पूर्ण देशभर शिक्षण खाते व इतर खात्यातर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले गेले. सदर परिपत्रकाच्या अनुशंगाने असाच पुनर्वसन साळ शाळेतर्फे चौकोटीच्या बाहेर जाऊन (कोविड १९ च्या काळात) एक उपक्रम आयोजित केला गेला. भव्य दिव्य नव्हे, तर नाजूक साजूक असा 'अन्नपूर्णा' शीर्षकाखाली 'राष्ट्रीय पोषक माह' साजरा केला गेला. तरीही अन्नपूर्णा नावातच भव्यता-दिव्यता आली. 

शाळेतील  व पुनर्वसनातील अन्नपूर्णेला व 'महालक्ष्मी महिला बचत गट' यांना साजेल अशी पारंपरिक पाककला स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. स्पर्धेच्या नियमात चविष्ट, रूचकर व पोषक पाकशैलीसाठी वापरण्यात येणारे जिन्नस व सजावटीला लागणाऱ्या पर्णाचा उल्लेख स्पष्ट केला त्यानंतर चार दिवस अगोदर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हे नियम स्पर्धकांना पाठविले.

फास्ट फूड आणि जंकफूडच्या जमान्यात जिभेचे चोचले पुरवणारे अगणित पदार्थ बाजारात उपलब्ध असताना जाणीवपूर्वक  'पाखड,  वरी, गावठी उकडे तांदूळ, नाचणी' हे पारंपरिक जिन्नस वापरून पाककृती करायला सांगण्यात आली. सदर जिन्नसातील उकड्या तांदळातून हायब्रिड तांदूळ वजा केला.  पाककला प्रदर्शनाच्या जोडीला पारंपरिक खाद्य अभ्यासक व पर्यावरण प्रेमी श्री. राजेंद्र केरकर सरांचे 'पारंपरिक खाद्य पदार्थ' या विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले. 'अन्नपूर्णा- स्तुतीदायक उपक्रम'  असे प्रतिपादन करून राजेंद्र केरकर सरांनी अन्नपूर्णांना व आम्हा खवय्यांना मार्गदर्शन केले.  त्यात त्यांनी म्हटले की, 'आजच्या चमचमीत जेवण पध्दतीमुळे आपण आपल्या कोकण प्रांतातील पारंपरिक खाद्य पदार्थ इतिहास जमा होत चालले आहेत . वरीची पेज, खांडोळी, बिबिंका, वरीचा भात, भाकरी, धोधेल, रानभाज्या, यांसारख्या पारंपरिक पाकखाद्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. पोषकयुक्त असा आहार आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिला. बदलत्या जीवनशैलीत पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये आधुनिकीकरण करून सदर पाककला  जिवंत होणे आवश्यक आहे.' 

नियम व अटीला अनुसरून सकाळी साडे नऊ ते साडे दहापर्यंत खमंग अशा पाककलेचे पदार्थ शाळेच्या वर्गात येऊन चानाडो व केळीच्या पानावर विराजमान होऊ लागले. पाककलेबरोबर पाककृती व अन्नपूर्णा शाळेत येऊ लागल्या. पाल्याबरोबर दिक्षिता नाईक,  सुलोचना डिमॅलो,  साक्षी तुळसकर,  प्रज्ञा गवस, अनघा वझे, हर्षिता मणेरीकर, सीता मणेरीकर, अस्मिता मणेरीकर,  संतोषी नाईक,  संपदा चौबे, अवनी खोवरे,  मनस्वी तारी, ऋतूजा गवस, संध्या नाईक,  राजेश्री राणे, अपर्णा चारी, आकांक्षा गावस, प्रांजल सावंत आदी अन्नपूर्णा, पालक व ग्रामस्थ श्रोत्याच्या भूमिकेत स्थानापन्न झाले.

प्रदर्शन व व्याख्यान अश्या जोडीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वात प्रथम प्रथिने, फायबर, कॅल्शियम, जीवनसत्वे आणि अनेक खनिजांनी युक्त असलेल्या 'कडिपत्ता' च्या रोपट्याला पाणी अर्पण करून उदघाटन केले. औषधी गुणधर्म असलेल्या कडिपत्याला वंदन केले गेले.

पाककलेमध्ये नाविन्य आणण्यासाठी 'साखरे' ऐवजी 'माडाचे गूळ' घालून पदार्थ तयार करणे वा उकड्या तांदळातील प्रजाती म्हणजे खोचरी, दामगो, बेळो, कोरगूट सारखे जिन्नस वापरून स्पर्धा आयोजित करता येतील. पाककलेला थीम दिल्यास नकळच उपक्रम स्तुत्य होऊन जातो. असाच एक उपक्रम सलग दोन वर्षे सरस्वती पूजनानिमित्त आंबेशी पाळी येथील  प्राथमिक शाळेत आयोजित  केला गेला होता.  थीम अनुक्रमे 'नाचणी'  आणि  'रानभाज्या' ठेवण्यात  आली  होती.  उत्स्फूर्त  प्रतिसाद लाभला होता. वेरेकर,  मुळगावकर , पिळयेकर, गावडे , काणेकर, नार्वेकर,  खानोळकर आदि  अन्नपूर्णांनी  तर  परीक्षकांना थक्क  करून सोडले. 

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व गोव्याच्या उत्तर सीमेवरील पुनर्वसन शाळेत यानिमित्ताने पाककलेवर तिखट, मीठ,  आंबट, गोडाचा आस्वाद चढला होता. त्यामुळे नाचणी, वरी, उकडे तांदूळ, पाकयुक्त मोदक,  लाडू, सत्व, हलवा,  केक, पातोळी, आंबिल,  धावणे, यल्लाप्पे,  भाकरी, तवसोळी  आदी पदार्थांमध्ये वेगळेपण दिसून येत होते. खाद्यपदार्थांच्या नजराण्याला  चाखण्यासाठी व परीक्षण करण्याचा मान तरबेज खाद्यसम्राट  श्री. परशुराम नाटेकर व श्री. शरदचंद्र गावस यांनी मिळाला. 

बाजारातील आकर्षित  व  रूचकर खाद्यपदार्थांना फाटा देण्याचे काम पुनर्वसनातील महिलावर्गाने या उपक्रमांतर्गत करून दाखविला आणि एका अर्थाने उपक्रमाची पूर्ती केली. शेवटी श्रोत्यांचे खवय्ये होऊन  गुळाच्या चहाबरोबर प्रदर्शनातील पारंपरिक खाद्य पदार्थांवर ताव मारण्यात आला.