पेडण्याचा प्रसिद्ध दसरोत्सव

गोव्यातील पेडणे महालातील प्रसिद्ध उत्सव म्हणजे पेडण्याचा दसरा आणि कोजागरी पौर्णिमेला येणारी पेडण्याची पुनव याविषयीची माहिती देणारा विशेष लेख.

Story: लोकसंस्कृती । पिरोज नाईक |
23rd October 2021, 11:34 pm
पेडण्याचा प्रसिद्ध दसरोत्सव

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संचिताचे दर्शन घडवणारा उत्तर गोव्यातील पेडणे महालातील प्रसिद्ध उत्सव म्हणजे पेडण्याचा दसरा आणि कोजागरी पौर्णिमेला येणारी पेडण्याची पुनव. पूर्वी पेडणे महाल सावंतवाडी संस्थानात येत होता नंतर पेडणे  हा गोव्याचा भाग बनला. त्याकाळी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी जाणारे राजे, संस्थानिक आपल्या राजवाड्यातून पालखीत, मेण्यात बसून जात असत. सीमोल्लंघनानंतर हत्तीवर बसून मिरवणूक काढली जाई. आजही पेडणे महालातील देशप्रभूंच्या वाड्यावरून मिरवणूक काढण्याची परंपरा राखून ठेवण्यात आली आहे.

पेडणेकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री भगवती देवीची मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात गाभाऱ्यामध्ये विराजमान झालेली पहावयास मिळते. उत्सवाच्या मिरवणुकीची मूर्ती वेगळी आहे. दसऱ्याला पेडणे महालातील श्री भगवती मंदिरात मोठी जत्रा भरते. मंदिराचा सारा परिसर विद्यूत रोषणाईने उजळून जातो. खेळणी, कपडे, खाजे, मेवा-मिठाई, देवीच्या ओटीसाठी लागणारे नारळ, खण, फुले यांची दुकाने थाटलेली असतात. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक येथील लोकांचे देवी भगवती श्रद्धास्थान असल्यामुळे या दिवशी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात श्री भगवती देवी ग्रामदेवता असून नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी असा तिचा नावलौकिक आहे.

 पेडणे गावामध्ये रवळनाथ, भूतनाथ, आदिनाथ, काळभैरव, मुळवीर, माऊली,म्हारींगण, महादेव, नारायण, द्वारपाल, सत्पुरुष, दाड यासारखी अनेक देव-दैवतांची मंदिरे पहावयास मिळतात. येथील प्रसिद्ध दसरोत्सवाची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात होते. या दिवशी ‘घट’ पूजेला लावून नऊ प्रकारचे धान्य रुजत घालतात. अन्नदात्या धरित्रीविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घटस्थापना, रुजवण, दसरा, महानवमी असे सण सुरु करून अनेक प्रथा, परंपरा जन्माला घातल्या आणि आपली संस्कृती वैभव संपन्न करण्यास हातभार लावला. नवरात्र ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत परंपरागत पंधरा दिवस साजरा होणारा हा सण पूर्वापार प्रसिद्ध आहे.

श्री देव रवळनाथाचे मंदिर म्हाऊसवाड्यावर तर देव भूतनाथांच्या जुन्या काळच्या मंदिराचे भग्नावशेष डोंगरावर जंगलात पहावयास मिळतात. दसऱ्याच्या दिवशी श्री देव रवळनाथ व भूतनाथ यांची तरंगे सजवून त्यांची पूजा करतात. रुजत घातलेले ‘रुजवण’ दोन्ही तरंगांना अर्पण करतात. देव रवळनाथाच्या तरंगाला २२ साड्या व भूतनाथाच्या तरंगाला २१ साड्या नेसवतात. तरंग उत्सवाच्या मिरवणुकीत देव रवळनाथ, भूतनाथ यांची तरंगे व देवी भगवतीच्या कळसाचा समावेश असतो. ही तरंगे रवळनाथाच्या मंदिराकडून वाजत-गाजत मिरवणुकीने भगवती देवीच्या मंदिराकडे नेतात. तरंगे चव्हाट्यावर आल्यानंतर देवीचा कळस तेथे आणला जातो.  देवीचा कळस आणि रवळनाथाचे तरंग यांचा ‘शिवलग्न’ सोहळा विधिवत साजरा केला जातो.

 कोजागरी पौर्णिमेच्या शांत-शीतल चांदण्यात पुनवेच्या मध्यरात्री ‘गाऱ्हाणे’ घालून तरंगे अधिष्ठानावर उभी करतात व जमलेल्या जनसमुदायाला कौल देतात यावेळी हजारोंच्या संख्येने भक्तगणांची उपस्थिती असते. उपस्थित भक्तगणांना कौल देऊन झाल्यानंतर भूते काढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. भूत काढणे व ‘बांध तू सायबा’ ही पेडणेच्या दसऱ्याची दोन आकर्षणे आहेत.

कोजागरी म्हणजे रात्रभर जागे राहणे म्हणजेच ‘जागृत’ राहणे. असे म्हणतात की, कोजागरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीदेवी भूतलावर येते व जो जागृत असतो त्याला धन-धान्य, सुख-समृद्धी प्रदान करते. त्यामुळे या रात्री लक्ष्मी देवीची पूजा करण्याचीही  प्रथा आहे. त्याप्रमाणे पूजा झाल्यानंतर पोहे व नारळाचे पाणी देव व पितर यांना समर्पित केले जाते. म्हणजेच जो अखंड जागृत असतो त्याचे रक्षण तर होतेच शिवाय त्याच्याबरोबर राहून देवसुद्धा त्याला मदत करीत असतो. कदाचित यामुळेच ही कोजागरीची रात्र दसऱ्यासाठी निवडली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. जत्रेच्या निमित्ताने देव-देवतांसोबत रात्रभर जागृत राहून स्वतःचे हित साधण्याचा हा हेतू खरोखरच स्तुत्य असाच आहे.

 आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, अंतराळात झेप घेतली असली तरी आपली देवावरील श्रद्धा कायम आहे. ती तसूभर देखील कमी झालेली नाही कारण मनुष्य जीवन-मरणाच्या फेऱ्यातून जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत एक अदृश्य शक्ती आपल्या अवतीभवती वावरत असते हे आपण नाकारू शकत नाही आणि म्हणूनच मृत व्यक्तीचा आत्मा भूत-पिशाच्च बनून माणसांना पछाडतो, त्रास देतो त्यांना दूर करण्याची शक्ती देव रवळनाथ व देव भूतनाथ यांच्याकडे असल्याने अशा बाधित माणसाला घेऊन लोक श्रद्धेने येथे येतात व तरंगाच्या कौलाने भूतबाधेपासून मुक्त होतात असे सांगितले जाते. हे सगळे विधी आटोपल्यानंतर देव भूतनाथ आणि आपले डोंगरावर भग्नावस्थेत असलेले मंदिर बांधून द्या  असे म्हणत डोंगराच्या दिशेने धावत सुटतो. त्यावेळी तिथे जमलेले भाविक प्रत्येक वर्षी पुढच्या जत्रे अगोदर तुझे देऊळ ‘बांध  तू सायबा‘ असे म्हणून त्याला फसवतात व माघारी आणतात.