विहिरीतील घागरी…

मांद्रेकर मामांची विहीर खोदताना तात्यांना जमिनीत पुरलेली एक घागर हाती लागते. त्यानंतर आता पुढे वाचा...

Story: तात्यांच्या बाता । दीपक मणेरीकर |
23rd October 2021, 10:54 pm
विहिरीतील घागरी…

ती घागर मी तिथून बाहेर काढली व विहिरीच्या तळावर ठेवली. कसल्याशा धातूच्या पत्र्याने त्या घागरीचं तोंड गच्चपणे बंद करण्यात आलं होतं. या घागरीत नक्की काय असावं या उत्सुकतेने मी घागरीच्या तोंडावरील तो पत्रा उघडण्याचा प्रयत्न सुरू केला. भरपूर मेहनत केल्यावर पिकासाच्या सहाय्याने मी त्या घागरीचं तोंड उघडलं मात्र... त्या घागरीच्या आतील धनसंपत्ती बघून मला भोवळ आल्यासारखी झाली. ती घागर सुवर्ण मुद्रांनी काठोकाठ भरलेली होती. मला हे धन सापडलंय ही गोष्ट कुणालाही समजण्यापूर्वी ती घागर विहिरीच्या बाहेर काढून लपवून ठेवणं गरजेचं होतं. आमच्या पुरणीत सहसा कुणी फिरकत नसे पण विहिरीचं काम सुरू झाल्यापासून, काम कुठवर पोचलंय हे बघण्यासाठी गावातील काही माणसं तिथे येऊन बसत असत. त्या दिवशी काम बंद असल्याने तिथे कुणी येण्याची शक्यता कमी होती. तळावर आणून ठेवलेल्या घागरीचं तोंड त्या पत्र्याच्या सहाय्याने मी परत बंद केलं व जिथे ती घागर मला सापडली त्याच्या बाजूची जमीन खोदायला मी सुरूवात केली.  तिथे आजूबाजूला आणखीन एखादी घागर सापडण्याची शक्यता होती आणि ती खरीच ठरली.. मला आणखीन एक घागर त्या ठिकाणी सापडलीच. ती घागर तिथून न हलवता, एका क्षणात मी एक निर्णय घेतला. पहिल्यांदा सापडलेली घागरसुध्दा मी मातीत पुरून ठेवली व मी लगेच विहिरीच्या बाहेर पडलो. तिथून घरी न जाता मी झपाझप पावलं टाकत, शेजारच्या गावातील मांद्रेकर मामाचं घर गाठलं...

मांद्रेकर मामा आपल्या घरासमोरील खळ्याच्या मेरेवर बसलेला होता. मला आपल्या घरी येताना बघून तो घरात गेला व माझ्यासाठी खुर्ची घेऊन परत खळ्यात आला. तो मला काही विचारणार या पूर्वीच खुर्चीवर बसता बसता मी म्हणालो " मामा, पुढील दोन दिवस जमिनीखालच्या कसल्याही कामासाठी निषिद्ध असल्याने आपल्या विहिरीचं काम आपल्याला दोन दिवसांसाठी बंद ठेवावं लागेल" हे ऐकून मामाने होकारार्थी मान हलवली. त्याने माझ्यासाठी तांब्यातून आणलेलं पाणी थोडंसं घशात ओतून मी परत निघालो तो थेट माझ्या घरीच गेलो. न्याहारी खाऊन मी परत पुरणीत गेलो. झपाट्याने विहिरीत उतरून दोनपैकी एक घागर विहिरीत सोडलेल्या दोरखंडाला बांधली व परत वर येऊन ती घागर वर ओढून घेतली. आमच्या करलाच्या पुरणीत, अवजारं ठेवण्यासाठी बांधलेली एक खोप होती. त्या खोपीत मी ती घागर लपवून ठेवली. दुसरी घागरसुध्दा मी त्याच प्रकारे खोपीत आणून ठेवली. विहिरीत उतरून सर्वात अगोदर मी खोदलेली माती बुट्टीच्या सहाय्याने विहिरीच्या बाहेर काढली. हे सर्व काम मी एकट्याने करत होतो कारण मला या गुप्तधनाच्या गोष्टीचा गवगवा होऊ द्यायचा नव्हता. विहिरीतील सर्व माती काढून झाल्यावर मी परत एकदा खोदकामाला सुरूवात केली. एकामेकांना खेटून पुरलेल्या, गुप्त धनाने गच्च भरलेल्या एकूण सहा घागरी मी खोपीत आणून दडवल्या. आता आणखीन एकच घागर मला तिथे दिसत होती पण ती जराशी खोलवर रुतून बसली होती. मी पिकास घेऊन तिच्या आजूबाजूची माती उरकत असतानाच ती घागर सैल झाली आणि जमिनीतून पाण्याचा फवाराच माझ्या चेहऱ्यावर उडाला.. मी लगबगीने ती घागर कशीबशी विहिरीच्या बाहेर काढून खोपीत नेऊन लपवली. विहिरीला पाणी लागलं याचा मला अपार आनंद झाला होता पण मी ही गोष्ट एवढ्यात कुणालाही सांगू शकत नव्हतो कारण मला विहिरीत सापडलेल्या गुप्तधनाची गोष्ट जर कुणालाही समजली असती तर कर्णोपकर्णी ही गोष्ट पोर्तुगीज पाखल्यांपर्यंत पोहचायला वेळ लागला नसता. जर हे गुप्तधन त्यांच्या हाती लागलं असतं तर त्या धनाद्वारे मिळवलेला पैसा त्यांनी आमच्या गोव्याच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या विरूध्द कारस्थानं करण्यासाठी वापरला असता आणि मला ते कदापि सहन झालं नसतं...

घागरी खोपीत लपवून मी  लगबगीने घरी पोहोचलो तेव्हा दुपार टळून गेली होती. माझी वाट बघून सर्वांनी जेवून घेतलं होतं. मी घरात आल्या आल्या हात धुऊन पाटावर बसलो. आईने जे काही वाढलं ते बकाबक गिळून हात धुऊन घराबाहेर पडलो. कोण कसले प्रश्न विचारत आहेत याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. झपाझप, अतिजलद चालत मी भारताच्या सीमेच्या दिशेने चाललो होतो. पोर्तुगीज पाखल्यांची नजर चुकवत, एकदाचा मी भारतात पाऊल टाकलं आणि तेथील पोलीस चौकी गाठली. माझी सत्यकथा ऐकून, तेथील अधिकाऱ्यांनी मला गाडीत बसवून थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर हजर केलं. त्या अधिकाऱ्यांनी, घडलेली सर्व वित्तंबातमी ट्रंककॉल वरून मुंबई स्थित मंत्र्यांपर्यंत पोहचवली. या सर्व गोष्टी फार तातडीने केल्या गेल्या कारण वेळ दवडण्याने फार मोठं नुकसान झालं असतं. काही क्षणातच मुंबईतील अधिकारी वर्गाने दिलेल्या सुचनांनुसार गोवा - भारत सीमेवरील पोलीस अधिकारी, अबकारी अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील अतिमहनीय व्यक्ति (ज्यांचा, पंच व साक्षीदार म्हणून उपयोग केला गेला) व मी असे सारे, काळोख पडल्या पडल्या गोव्याच्या हद्दीत दाखल झालो व लपत छपत, पाखल्यांची नजर चुकवत, आमच्या पुरवणीतील खोपीत हजर झालो. तिथे लपवून ठेवलेल्या, सुवर्णाने भरलेल्या सर्व घागरी मी त्या भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या. त्यांनी रात्रभर त्या घागरींचं वजन, मोजमाप वगैरे करून त्यांचा पंचनामा केला व पहाट होण्यापूर्वी त्या घागरी त्यांच्या सोबत आलेल्या मजुरांच्या डोक्यावर ठेवून ते लोक निघून गेले आणि मी घरी जाऊन खळ्यातील बाकावर झोपलो. (क्रमश :)