जगत् शक्तीचे सृष्टीतील विलोभनीय आविष्कार

केवळ मानवाचच नाही तर अखिल प्रकृतीचा विचार करणारी, तिच्याप्रति आदर व्यक्त करणारी, भारतीय प्रकृतीचा विचार करणारी, तिच्याप्रति आदर व्यक्त करणारी भारतीय संस्कृती अनन्यसाधारण आहे.

Story: विचारचक्र | सुरेखा दीक्षित |
23rd October 2021, 12:35 am

नुकताच नवरात्रीचा जागर संपन्न झाला. संपूर्ण भारतात आदिशक्तीच्या विविध रूपांची उपासना निरनिराळ्या पद्धतीनी केली जाते. बंगालमध्ये दुर्गापूजा सार्वजनिक स्वरूपात साजरी करतात. महाराष्ट्रात घटस्थापनेपासून नवमीपर्यंत देवीपूजनाचा कुळाचार करतात. गुजरातमध्ये देवीच्या प्रतीकाभोवती फेर धरून गरबा खेळतात. उत्तर भारतातही रात्री भजन कीर्तनाचा जागर होतो. एकूणच स्त्रीरुपातल्या परमेश्वरी शक्तीची उपासना सगळीकडे केली जाते.                   

वैदिक काळापासून भारतात शक्तीपूजनाची प्रथा आहे. मुळातच सृष्टीमधील चैतन्यस्वरूपाचा, ऊर्जाप्रवाहाचा, सृजनशीलतेचा साक्षात्कार जेव्हा माणसाला झाला, तेव्हापासून तिच्या वैश्विक रुपापुढे नतमस्तक होऊन पूजनाचा प्रारंभ झाला असावा. ऋग्वेदात देवीच्या चरणी अर्पण केलेली अनेक सूक्ते आहेत. त्यातील श्रीसूक्त तर आजही तेवढ्याच भक्तिभावाने म्हटले जाते. ‘स्री’ची संकल्पना खूपच व्यापक आणि सर्वस्पर्शी आहे. ज्या वसुंधरेवर आम्ही वास करतो ती शोभायमान स्री समजली जाते. पंचमहाभूतांच्या स्पंदनांची संपूर्ण सृष्टी चैतन्यमयी बनवणारी ऊर्जाही स्रीच. जिथे जिथे दृष्टिक्षेप जाईल तिथे तिथे वास करणाऱ्या ह्या चित््शक्तीला वंदन करणारी, तिचे गुणगान गाणारी भक्ती व निसर्गाप्रती कृतज्ञता प्रकट करण्याचा प्रघात अप्रतिम आहे. केवळ मानवाचच नाही तर अखिल प्रकृतीचा विचार करणारी, तिच्याप्रती आदर व्यक्त करणारी भारतीय प्रकृतीचा विचार करणारी, तिच्याप्रती आदर व्यक्त करणारी भारतीय संस्कृती अनन्यसाधारण आहे.                    

देवी शक्तीरुपात जशी पूजिली जाते तशी ती तिच्या नानाविध गुणरुपांत ओळखली जाते. या संदर्भात मला दुर्गासप्तशक्तीमधील ‘देवगणकृतापरजितास्तुनि:’ रचना खूप भावते. महादेवी जगदम्बेची विविध गुणसंपदा आळवून तिला विनम्र अभिवादन सुरुवातीच्या श्र्लोकांमध्ये करून नंतर तिचे एक एक स्वरूप स्मरुन त्रिवार नमस्कार केला आहे. ज्या रूपांमध्ये ही जगताला आधारभूत असलेली कृतीदेवी स्थित आहे, त्याचे भावस्वरूप लक्षात घेतले तरी मन थक्क होते. प्रथम ‘या देवी सर्वभूतेक’ शब्दांनी सुरुवात करून एक एक गुणाचा उल्लेख केला आहे आणि नंतर नमस्तस्थै नमस्तस्थै नमस्तस्थै नमोनम: असे त्रिवार वंदन केले आहे. स्तोत्रातील गुणांमध्ये बुद्धी, निद्रा, क्षुधा, छाया, शक्ती, तृष्णा, क्षांती, जाती, लज्जा, शान्ती, श्रद्धा, क्रांती, लक्ष्मी, वृत्ती, स्मृती, दया, तृष्टी, मातृ, भ्रांती आदी रुपांमध्ये देवी स्थित आहे.                   

ही कल्पनाच किती रम्य आहे, सर्वभूतेषु, शब्दात पृथ्वीवरील सर्व प्राणी आणि त्यांच्यामध्ये वसत असलेली ती शक्ती, यांचा विचार करता संपूर्ण सृष्टीशी तादात्म्यभाव या स्तोत्रात व्यक्त झालेला दिसतो, निद्रा, क्षुधा, तृष्णा, आदिंमध्ये प्राण फुंकणारी ही दैवी ऊर्जा तिच्या अभावात प्रकर्षाने जाणवते. सर्वांना परिचित मातृभाव लक्षात घेतला तरी सिंहिणीपासून चिमणीपर्यंत सगळ्या प्राणीमात्रांच्या माता आपल्या पिल्लांचे भरण, पोषण, संरक्षण किती सावधपणे अन् प्रेमळपणे करतात हे आपण जाणतो. सर्व जीवनमात्रांमधील मातृभावाला नमस्कार करणे ही कल्पनाच किती थोर आहे, शेवटी सर्व जीवांच्या इंद्रियवर्गाची अधिष्ठात्री देवी, तसेच सर्व प्राणीमात्रांना व्यापून राहणाऱ्या व्याप्तीदेखील आणि संपूर्ण जगताला चैतन्यरूपाने व्यापणाऱ्या देवीला, आदिशक्तीला त्रिवार वंदन केले आहे. समजण्यास व म्हणण्यास अत्यंत सहज व सोपे असे हे स्तोत्र अनुभवाच्या पातळीवर खूप काही शिकवून जाते.                   

स्त्रीमधील शक्तीला श्रीमद्भगवदगीतेतही उच्च स्थान दिले आहे. ‘सप्तशक्ती’ नावाची आचार्य विनोबा भावेंच्या प्रवचनांची एक छोटीशी पुस्तिका आहे. ह्या पुस्तिकेत भगवद्गीतेत उल्लेखिलेल्या सात स्त्रीशक्ती केलेल्या प्रवचनांचे संकल्पन आहे. प्रास्ताविकेत विनोबाजींनी म्हटले आहे की, गीतेतील दहाव्या विभूतियोगातील किर्ति: श्रीर्वाक्य नारीणां स्मृतिर्मेधा धृति:क्षमां त्यांच्या चिंतनात बराच काळ घोळत होते. इंदूरमध्ये १९६०च्या जुलै, ऑगस्टमध्ये नारींमध्ये असलेल्या सात शक्तींची निवड करून त्यांचे विवरण विनोबांनी आपल्या प्रवचनांत केले. कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा ह्या सात शक्ती नारींना उपजत लाभलेल्या असतात आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जिथे त्या असतात, तिथे त्यांचा वास असतो.                    

वरील सात शक्तींची आवश्यकता आजच्या काळात नाही असे कोण म्हणू शकेल? विनोबाजींनी प्रत्येक शक्तीवर स्वतंत्र प्रवचन दिले आहे. शब्दांची व्युत्पत्तीशास्त्रानुसार फोड करून सूक्ष्म अर्थ विशद केला आहे, जसे कीर्तीबद्दल बोलताना ते म्हणतात,. कीर्ती एका शक्तीच्या रुपात येथे (श्लोकात) उपस्थित झाली आहे. संस्कृतीचा परिणाम म्हणून सत््कृतीचा परिणाम म्हणून जगात जी सद्भवाना उत्पन्न होते तिला कीर्ती म्हणतात. जेथे मुळातच चांगलीकृती नसते तेथे सार्वत्रिक सद्भावना उत्पन्न होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, म्हणून कृती मूळ आहे, कीर्ती तिच्या अंतर्गत आहे, म्हणून पहिली शक्ती कृती आहे. कृतीचा सुगंध साऱ्या वातावरणात पसरतो. तो सुगंध माणसाला आकर्षित करतो. चांगल्या कृतीबद्दल माणसाच्या मनात अनुराग निर्माण करतो. हा अनुराग म्हणजेच कीर्ती, स्त्रियांमध्ये प्रथम कृती, त्यातून कीर्ती आणि शेवटी संस्कृती हे सारे गुण विशेष रुपात आढळतात म्हणूनच भगवंतांनी स्त्रियांच्या कार्यात कीर्तीकार्यही सामील केले.            

कीर्तीप्रमाणेच श्रीशक्तीबद्दल बोलताना तिचे शोभा, दर्शनीय, लक्ष्मी, कांती अशा अन्य रूपांचा परिचय विनोबाजी करून देतात, त्यांच्यामते श्री म्हणजे अनेक सावधानतांचा परिणाम आहे. कर्मक्षेत्रात सावधानता, व्यवहारात सावधानता, चिंतनात सावधानता बाळगली म्हणजे स्री होते. कोणत्या वेळी काय बोलावे यातही जे औचित्य आहे त्यात स्री आहे. आधुनिक काळातही हे विचार किती चपखल बसतात. मुळातच सर्व प्रवचने वाचून मनन करण्यासारखी आहेत. वाणीबद्दल बोलताना विनोबाजी म्हणतात की, मुखावाटे प्रकट होते तेवढीच केवळ वाणी नाही. मनात उठणारी पण वाणीच आहे. तिला परावाचा असे म्हणतात. ती गूढ आहे. या परावाचेनेही हितचिंतनच झाले पाहिजे. वाईट विचार प्रकट झाला नाही तरी वातावरणावर वाईट परिणाम करतो आणि चांगला विचार अप्रकट रा​हिला तरी त्याचा बाहेर चांगला परिणाम होतो असा मोलाचा सल्ला विनोबाजी देतात. असाच मौलिक विचार ते स्मृतीबद्दल मांडतात. संस्कार व कर्म दोन्ही शुभ आणि अशुभ असतात आणि त्यांचे मनावरील ठसेही स्मृती रुपात उमटतात. ज्याचे आत्मज्ञान अत्यंत व्यापक होईल, जो सर्व सृष्टीशी एकरुप होईल, त्यांच्या सर्व वाईट, अशुभ स्मृती नष्ट होतील आणि फक्त चांगल्या शुभ स्मृतीच राहतील.            

विनोबाजी प्रवचनांमध्ये अत्यंत आधुनिक विचार मांडतात. त्याग +आकलन+निर्मलता = मेधा; असे समीकरण ते मांडतात. त्याचबरोबर धृती म्हणजे धैर्यासोबतच उत्साह हा पूरक गुण जोडला की कोणताही संकल्प पार पाडला जातो असे विधान करतानाच स्वत:वर ताबा ठेवणे, पहारा ठेवणे, संकल्प करण्यासाठी आणि तो पार पाडण्यासाठी लागणारी हिंमत असणे हे सर्व अर्थ धृती शब्दात येतात ही व्याख्याही विनोबाजी करतात, क्षमेची फोड करताना ते म्हणतात कोणी अपराध केला, त्रास दिला, इजा केली, निंदा, अपमान केला तर ते सहन करणे, त्याबद्दल माफ करणे याला क्षमा म्हणतात. क्षमा करण्यासाठी मनात दुसऱ्याबद्दल प्रेम असावे लागते.            

गीतेमध्ये भगवंताने सांगितलेल्या सात शक्ती आज कालबाह्य झाल्या आहेत, असे कोण म्हणेल? उलट स्त्रीवर्गाने त्याची कास धरून विकास साधला, आत्मोन्नती केली तर त्यांचा सन्मान वाढेल, जीवन सुसह्य आणि सुंदर होईल. प्रत्येकीने स्वत:मधील अंगभूत सुप्त शक्तींचा विकास करावा. अंतरंग शुद्ध ठेवले तर त्याची प्रभा वागण्याबोलण्यात झळकते. महिलेने एक व्यक्ती म्हणून सक्षम व्हावे. स्त्री पुरुष प्रधान जाऊन समानता प्रस्थापित व्हावी, शेवटी मुलांना घडवणारी, त्यांना आकार देणारी माताच असते. तिनेच त्यांचे संगोपन करताना उत्तम संस्कार केले तर संपूर्ण समाजाचे स्वरूप पालटून जाईल; तिने विवेक सोडला तर समाजाचे अद्य:पतन व्हायला वेळ लागणार नाही. याचा अर्थ जय असा नाही की महिलांनी केवळ सोशीकपणे अन्याय अपमान सहन करून समाजाच्या दुर्व्यवहाराकडे दुर्लक्ष करावे. स्त्रीवर्गानी मानहानी होईल, असे वर्तन कुटुंबात किंवा समाजात आढळल्यास त्याचा विरोधही महिलांनीच करायला हवा.            

समाजात सर्वच स्तरावर अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या माता भगिनींची ओळख प्रसार माध्यमांद्वारे होते. स्वत:मधील गुणांचा स्फुलिंग तेजस्वी करीत इतर कमकुवत भगिनींना आधार देण्यास स्त्रीनेच पुढाकार घ्यायला हवा, तरच स्त्रीशक्तीचा खऱ्या अर्थाने जागर होईल. कुलपरंपरा पाळत असतानाच जर शाश्वत मूल्यांचा पाठपुरावा कालानुरूप कसा करता येईल याचा विवेकनिष्ठ विचार सण- समारंभाच्या निमित्ताने केला तरी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग सार्थकी लावला, याचे समाधान मिळेल. नारीला देवीस्वरूपात मखरात बसवून पूजन केल्याने जे समाधान मिळते तेच घरातील कुलस्वामीनीला सन्मानाने वागवून प्राप्त होते. ‘रात्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’. हे भारतीय संस्कृतीचे मूल्य प्रत्येकाने जपायला हवे.