खांतोली

पूर्वी घरात असा पदार्थ भरपूर प्रमाणात केला गेला म्हणजे घरातल्या लोकांना पर्वणीच वाटायची. दिवसभर तो खाल्ला जायचा आणि उरलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी खाण्याची मजा काही औरच. आज डायबिटीस असलेल्या व्यक्ती हे गोडधोड खाऊ शकत नाहीत आणि लहान मुले तर मागतसुद्धा नाहीत . ह्याचे कारण म्हणजे त्यांना पिझ्झा-बर्गरपुढे हे पदार्थ फिके वाटतात. पिझ्झा-बर्गर आरोग्याला किती घातक हे त्यांना कुठं माहीत!!

Story: शीतल लावणीस |
23rd October 2021, 12:33 am
खांतोली

आपल्या हिंदू धर्मात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात आणि ह्या सणाच्या दिवशी देव-देवतांच्या नैवेद्यासाठी वैविध्यपूर्ण गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. हे पदार्थ थोड्याजास्त प्रमाणात आवर्जून केले जातात. पण आज हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ले जातात ह्याचं मुख्य कारण म्हणजे मधुमेहासारख्या रोगाने लोकांना त्राही भगवान करून सोडले आहे व त्यांना खाण्यावर मुरड घालावी  लागते.

पूर्वी  घरात असा पदार्थ  भरपूर  प्रमाणात  केला गेला म्हणजे घरातल्या लोकांना पर्वणीच  वाटायची. दिवसभर तो खाल्ला जायचा आणि उरलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी खाण्याची मजा काही औरच. आज डायबिटीस असलेल्या व्यक्ती  हे गोडधोड खावू  शकत नाहीत आणि लहान मुले तर मागतसुद्धा नाहीत . ह्याचे  कारण  म्हणजे त्यांना पिझ्झा-बर्गरपुढे हे पदार्थ फिके वाटतात. पिझ्झा-बर्गर आरोग्याला किती घातक हे त्यांना कुठं माहीत!!

चला तर मैत्रिणींनो आज तुम्हाला अशाच एका गोड पदार्थाची ओळख करून देते. पुष्कळांना माहीत असेलच हा पदार्थ. हा पदार्थ करायला अगदी सोपाच. पदार्थाचं  नांव आहे खांतोली .

हा पदार्थ मी 35 वर्षांपूर्वी खाल्लेला अजून चांगला आठवणीत आहे.त्याचं असं झालं माझ्या जाऊबाईची  डिलिव्हरी झाली तेव्हा त्यांच्या आई तिच्याकडे आलेल्या, तिने हा पदार्थ आपल्या मुलीसाठी करायला घेतला. तो करताना मी जवळच होते. तयार झाल्यावर मी  खाऊन  बघितला. मला तो पदार्थ खूपच आवडला. तर हा पदार्थ म्हणजेच  खांतोली.

ह्या खांतोलीला लागणारे सामान आपल्या घरातच उपलब्ध असते..

१)तांदुळ धुवून वाळवून त्याचा काढलेला १ वाटी रवा 

२)१ वाटी गूळ 

३)३ वाटी  नारळाचा रस  (जाडसर)

४)काजुगर

५)वेलची पूड

६)मीठ  चवीपुरते

कृती : एका कढईत २ चमचे तुपात रवा खरपूस भाजावा. एका पातेल्यात नारळाचं दूध, गूळ व मीठ घालून उकळी येऊ द्यावी. उकळलेल्या मिश्रणमध्ये रवा घालून चांगले ढवळावे. पाणी सुकल्यावर त्यात वेलचीपूड व काजूगर  घालावे. 

एका परातीत  हळदीची पाने ठेवावी. त्यावर हे मिश्रण  ओतून थापावे. हवे असल्यास थोडे खोबरं पेरावे. गार झाल्यावर  आपल्याला हव्या त्या आकाराची कापं करावी.

टीप: तांदळाऐवजी तुम्ही केशरी रवाही घेऊ शकता