प्रेमळ बाबा

माझे बाबा मला उपदेश करत नाहीत. आई जशी दररोज सांगते जसे की, हे नीट कर, ते उचल, योग्य जागेवर ठेव... पण माझ्या बाबांच्या वागण्यातूनच त्यांच्या मनात काय चालले आहे ते मला सर्व काही समजते.

Story: माझे बाबा । प्राची परवार, कासारपाल |
23rd October 2021, 12:31 am

माझ्या बाबांचं नाव तुळशीदास विष्णू परवार . माझे बाबा खूप हुशार, अत्यंत शिस्तीचे.पण त्याचबरोबर खूप प्रेमळ असे आहेत. ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे, पण पुढे आरोग्याच्या तक्रारीमुळे त्यांनी घरीच रहावे लागले. त्यांना संगीताची त्याचबरोबर छोटे मोठे प्रसंग लिहून ठेवण्याची आवड आहे. माझे बाबा मला नेहमी चांगल्या व मूल्यवान गोष्टी सांगतात. बाबांच्या मते,  अभ्यासाबरोबर आपल्याला स्वयंपाक, घरातील कामे आली पाहिजेत. फक्त मुलींनाच नाही, तर मुलांनाही. म्हणजे कधीही कुठल्या निकडीच्या प्रसंगी अडून राहायला नको. स्पर्धांमध्ये भाग घेण्यास त्यांचेच प्रोत्साहन असते. प्रोत्साहनाबरोबर कुठल्याही स्पर्धेत किंवा कामात प्रयत्न हे करावेतच, ते आपल्याला आज नाही तर उद्या यश देतील. आजपर्यंत मला जे काय हवे असेल ते माझ्या आईबाबांनी दिले आहे हे जरी खरे असले तरी  खरोखरच  गरज असेल तेच देतात. मी मागितलं ते सरळ आणून दिलं असं अजिबात करत नाहीत. ते विचार करून, योग्यपद्धतीने देतात.

माझ्या बाबांविषयी सांगायला भरपूर आहे.  ते कधीही लिहून संपणार नाही. माझ्या बाबांचा प्रवास खूप संघर्षमय आहे. त्यांच्या हातातील कित्येकदा कामेसुद्धा  निघून गेली, पण इतकी सगळी संकटं झेलूनसुद्धा त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांना कंबरदुखीचा त्रास सुरु झाला. त्यांचे ऑपरेशन झाले. ते दहा दिवस हॉस्पिटलमध्ये होते.त्यांना आता आधी करायचे तसं एकदम काम करायला होत नाही. पण त्यांच्या तोंडावर  नेहमीच एक सकारात्मक आशा दिसते. त्यांना पाहून मला खूप बरे वाटते. बाबांच्या मते,  शिक्षण हे खूप मौल्यवान असते ते कधीही वाया जात नाही. ते आणखी एक गोष्ट सांगतात, आपण परिस्थितीमध्ये मोठेपणामध्ये मोठे नसलो, तरी काही हरकत नाही ; पण शिक्षणामध्ये मात्र मोठे व्हावे.

माझे बाबा मला उपदेश करत नाहीत. आई जशी दररोज सांगते की,  हे नीट कर, ते उचल, योग्य जागेवर ठेव... पण माझ्या बाबांच्या वागण्यातूनच त्यांच्या मनात काय चालले आहे ते मला सर्व काही समजते. माझ्या बाबांसोबत एक सुंदर प्रसंग आहे. तसे खूप आहेत, पण त्यांतील एक हा खूप जास्त प्रेमळ आहे. हा प्रसंग मला माझ्या आईने सांगितला होता. एके दिवशी मी व माझी आई माझ्या मामाच्याघरी रहायला गेलो होतो. तेव्हा माझे बाबा कामाला गेले होते म्हणून ते तिथे आले नव्हते. मी तेव्हा दोन वर्षांची होते. संपूर्ण दिवसभर मी खूप खेळले, मामासोबत फिरले. नंतर संध्याकाळी मला माझ्या बाबांची आठवण आली असेल, तेव्हा तिथे एक बाबांचा फोटो असलेली फ्रेम होती. मी ती फ्रेम पहिली.  माझी आई मला जेवण भरवत होती. मी ते मला नको म्हणून आईचा हात ढकलून त्यांच्या फ्रेमजवळ जाऊन त्या फोटोला हाताने गोंजारत बसले. मी अगदीच लहान. मला  बाबा हवे होते. मी खूप दु:खी होते. माझ्या आईला पण खूप वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आईने बाबांना फोन करून तिथे बोलावले व सगळं सांगितलं. बाबा थोडे कामात होते पण आपले काम सोडून तिथे संध्याकाळी पोहोचले. माझ्या आईने जेव्हा म्हटले, "बाय तुझे बाबा येतात, ते बघ" तेव्हा मी झटकून उठले व जोराने धावून बाबांना घट्ट मिठ्ठी मारली. माझ्या बाबांनी मला पटकन उचलले. त्यांना खूप आनंद वाटला. मलाही खूप चांगले वाटले.मी बाबांना "पप्पा" म्हणून हाक मारली. नंतर मात्र मी माझ्या बाबांना सोडलं नाही. जेवतानासुद्धा त्यांच्या मांडीवरच राहिले. आई आपल्याजवळ बोलावत होती पण मी तिच्याकडेही गेले नाही. हा असा एक प्रेमळ प्रसंग आहे.