मितभाषी...अबोली

अबोलीच्या ताटव्याकडे लक्ष देऊन बघा. गावातल्या साध्या सरळ पण सुंदर पोरी हदगा भोंडला खेळण्यासाठी घोळका करून थांबल्यासारख्या वाटतात...

Story: त्या फुलांच्या गंधकोषी । आसावरी कुलक� |
23rd October 2021, 12:25 am
मितभाषी...अबोली


सांजवेळी सखी 

पाण्याला गेली

मावळतीचे रंग 

लेऊन आली 

तळ्याच्या काठाला

कोण भेटियेला

गंध शब्द सारे

विसरून गेली 

एका गावात एक शेतकरी रहात असे. खूप काबाडकष्ट करून आपले कुटुंब सुखी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. देवाधर्माचे करायचा. खूप वर्षाच्या नवसानंतर त्याला एक गोंडस मुलगी झाली. शेतकरी आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करायचा, तिला जपायचा. ही मुलगी सुंदर तर होतीच शिवाय तिला जन्मजात सुगंधी असण्याची देणगी लाभली होती. ती जिथे जायची तिथे आपल्या बोलण्याने आणि सुगंधाने सर्वांना आपलंस करायची. असे करता करता ती मोठी झाली. आईला मदत करू लागली. अशीच एका संध्याकाळी ती तळ्यावर पाणी आणण्यासाठी गेली. पाण्याचा माठ भरून होतो न होतो, तिला अचानक समोरच्या बाजूला दिव्य प्रकाश दिसला. ती झाडामागे लपली आणि पाहू लागली, तर साक्षात सूर्यदेव तळ्यात अंघोळीला उतरले होते. तिने यापूर्वी इतके सुंदर काहीही पहिले नव्हते. ती सूर्यदेवांच्या प्रेमात पडली आणि त्यांना भेटायला समोर गेली, संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्याची प्रखरता एवढी नव्हती,त्यामुळे ती सरळ गेली त्यांना भेटायला. त्यांच्या तेजाने तिचे डोळे दिपून गेले होते. मंत्रमुग्ध होऊन ती बघत बसली त्यांना. सूर्यदेवाने तिला बघितले, त्यांनी तिच्या मनातले भाव चटकन ओळखले, तिला म्हणाले हे सुंदर कन्ये, कृपा करून इथून निघून जा, माझी प्रखरता तुला सहन होणार नाही, यापूर्वी प्राजक्ता नावाच्या राजकन्येचे नुकसान झाले माझ्या प्रखरतेमुळे, तु खूप नाजूक आहेस त्यामुळे घरी जा. ही काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तशीच एकटक बघत त्यांच्या जवळ गेली, तिची त्वचा एव्हाना तांबूस व्हायला लागली होती. डोळे जळायला लागले होते. शेवटी अगदी जवळ गेल्यावर ती जळून गेली. बराच वेळ घरी न आल्यामुळे आई बाप दोघेही तळ्याशी शोधायला आले, पहातो तो काय ? मुलगी अचेत अवस्थेत पडलेली, रंग लालसर  झालेला.तिथे सूर्यदेव असलेले त्यांनी पहिले. त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी सूर्यदेवाला शाप दिला. हे सूर्यदेवा तुझ्यामुळे माझी कन्या गेली, आम्ही तुला शाप देतो की आजपासून तुला एकाच जागी रहावं लागेल. तुला कुठेही फिरता येणार नाही पृथ्वीवर तर नाहीच नाही. सूर्याने शांतपणे सगळे ऐकले. त्यांनी खरी गोष्ट सांगितली कि आधी कल्पना देऊनही कशी ती जवळ आली आणि जळून गेली. आई बाप भानावर आले, त्यांनी सूर्याची माफी मागितली. सूर्यदेवाने सांगितले कि या मुलीच्या शरीराची राख तुमच्या घराच्या बागेत पुरा. तिथे एक झाड उगवेल त्याला येणारी फुलं ही माझ्या मावळतीचे प्रतीक असेल. लोकांना ती अतिशय प्रिय असेल, फक्त सुगंध मात्र असणार नाही. लोक तिला कनकाम्बरा म्हणून ओळखतील.कनक म्हणजे सोन, म्हणजे एका अर्थी माझ्याच नावाने ओळखतील. शेतकऱ्याने तसेच केले आणि अशारितीने दक्षिण भारतातल्या मलबार प्रांती कनकाम्बराचा जन्म झाला.

पावसाचा ऋतू निरोप घेता घेता गोव्यातल्या पोरसात काही फुलं हळूहळू आपली जाग दाखवतात. अशीच एक नाजूक पण मोहक अबोली. या अबोलीला असं का म्हणतात काय माहीत. म्हणजे एखाद्या सुंदर ललनेला ठकी किंवा दगडूबाई असलं काही तरी म्हटल्यासारखं आहे. अबोली फुलं नेहमीच अबोल, मितभाषी स्त्रियांसाठी प्रतीक म्हणून वापरले जाते. मराठीत तर एक सिनेमाही येऊन गेलाय अबोली नावाचा. ज्यात नायिका रेणुका शहाणे मुकी असते. खरंतर अबोली किती बोलते भरभरून. अबोलीच्या ताटव्याकडे लक्ष देऊन बघा. गावातल्या साध्या सरळ पण सुंदर पोरी हदगा भोंडला खेळण्यासाठी घोळका करून थांबल्यासारख्या वाटतात. हिच अबोली सुबक फातीत बांधून एखाद्या स्त्रीचे सौंदर्य खुलवते. तर घोडेमोड्निच्या वेळी वीररस पसरते. कुंद मोगरी बरोबर गुंफल्यावर दाक्षिणात्य रूप देते. देवळात तरंग सजवल्यावर तेवढीच पवित्र भासते. त्यामुळे ती अबोल नसतेच मुळी. थोडी कमी बोलणारी असेल, गंध नसल्यामुळे चटकन लक्षात येणारी नसेल पण अबोल नक्की नाही.

अबोली हे गोव्याच्या सांस्कृतिक/पारंपरिक लोकजीवनाचा अविभाज्य भाग असलेले फुलं. सत्तरच्या दशकात म्हणे राज्यफुल म्हणून घोषित झालंय. पण नक्की माहिती मिळालेली नाही. एकूणच या फुलाचे महत्त्व तेवढेच आहे हे नक्की. एका भागात संपणार थोडच आहे?या फुलाची महती, उपयोग इत्यादी आपण पुढच्या भागात पाहू. तो पर्यंत आपल्या पोरसात लावलेल्या अबोलीच्या फुलाला निरखून बघा एकदा, हितगुज मांडा मनातलं, अबोली बोलेल मनसोक्त....