ताकद निरोगी मनाची !

मानसिक अनारोग्याकडून उत्तम मानसिक आरोग्याकडे वाटचाल करण्याचा हा प्रवास खडतर नक्कीच आहे, खाचखळग्यांनी भरलेला आहे, या वाटेवर चालताना वारंवार निराशाही हाती लागू शकते, हा अगदीच परिपूर्ण किंवा सोपा मार्गही नाही; पण याची निष्पत्ती मात्र कायमच दिलासादायक असेल, हे नक्की!

Story: समुपदेशन । सारा शनिया मिरांडा |
23rd October 2021, 12:17 am
ताकद निरोगी मनाची !

‘जग हे बंदिशाला' सारखी परिस्थिती सत्यात उतरवणाऱ्या करोनासारख्या महामारीमुळे समस्त मानवजातीला शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपण्याचाही वसा अंगीकारावा लागला. आधीच समाजप्रिय असलेला माणूस एकट्याने राहू लागला आणि सगळंच अवघड होऊन बसलं. या एकटेपणातून आलेल्या तणावासमोर तग न धरता आल्याने कैक प्रथितयश सेलिब्रिटींपासून ते आपल्या जवळच्या कित्येकांनी या जगाला कायमचा रामराम ठोकण्यासाठी आत्महत्येचा पर्याय निवडला. या महामारीने कित्येकांच्या मानसिक स्वास्थ्यावर घाला घातला पण तरीही या विषयाबद्दल बोलण्यासाठी सहसा कुणी पुढाकार घेताना दिसत नाही.

जेव्हा जेव्हा मानसिक आरोग्याचा विषय चर्चेत येतो, तेव्हा थेरपिस्टकडे जाण्याच्या मुद्द्यावर चर्वितचर्वण सुरु होते. हा अगदीच उत्तम पर्याय असला तरीही या वाटेवर पाऊल टाकण्याचं धाडस फार कमीजणच करू शकतात. प्रदीर्घ काळापर्यंत आपल्याला मदतीची गरज आहे याचा स्विकारच त्यांना करवत नाही. जे सत्य आपण समजू किंवा स्वीकारू शकत नाही, त्याचा सामना करून बदल घडवणे अवघड असते. कित्येकांना आपल्या आयुष्यात सध्या काय चाललंय, भूतकाळातील अनुभवांवर आधारित असलेले आपले आचार-विचार आपल्या मानसिक स्वास्थ्यावर खरोखरच परिणाम करत आहे का, याची पुसटशी कल्पनाही नसते. काहीजण आपल्या तणावाला कसंबसं लपवून हा विषय टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात, तर काही या तणावासाठी स्वतःऐवजी इतरांना जबाबदार धरतात. आपल्या ताणतणावासाठी इतर कोणतीही व्यक्ती कारणीभूत ठरत असली तरी तो दूर करण्यासाठी इतरांनी नव्हे, तर स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मानसिक आरोग्याचा मुद्दा कित्येकांना अस्वस्थ करून सोडतो, हे कटू सत्य आहे. त्याच्यावर चर्चा करणे म्हणजे महागड्या स्पामध्ये सुश्राव्य संगीताचा आनंद घेत, शॅम्पेनचे घोट रिचवत बाथटबमध्ये डुंबून राहण्याइतके सहजसोपे नसते. कित्येक रात्रींची जागरणं, कसल्याश्या अनामिक भीतीने सतत होणारा निद्रानाश, अचानकच उद्भवणारे पॅनिक अटॅक्स, सतत निराशेच्या वेढ्यात अडकलेलं मन, शारीरिक अवस्थेबद्दल दाटून येणारा न्यूनगंड, अकारण एकटेपणा आणि उदासीनता जाणवणे ही सगळी मानसिक अनारोग्याचीच लक्षणे आहेत. अश्यावेळी शरीर आणि मनावरचा विश्वास उडून आपल्याच जीवनाचा ताबा आपल्या हातात राहिला नसल्याची,  भावना अनावर होऊ लागते. जे घडतंय त्याकडे असहाय्यपणे बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय मागे उरत नाही.

यातून बाहेर पडून खरोखरच मानसिक स्वास्थ्य सुधरवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर बारीकसारीक बाबींपासून सुरुवात करायला हवी. रात्री उशिरापर्यंत फोन वापरणं सोडायला हवं, बॉसला खूश करण्यासाठी ओढवून घेतलेला वर्कलोड दूर सारायला हवा, आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या व्यसनाला नकार देणं जमायला हवं. हे असे छोटेछोटे बदलच मानसिक अनारोग्याकडून आरोग्याकडे नेणाऱ्या पायऱ्या बनत जातात. स्वतःसाठी वेळ काढणे, त्या वेळात स्वतःला पुरेपूर समजून घेणं, आपली बलस्थाने आणि मर्यादा ओळखणे हाही या बदलांचा महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या मर्यादा ओळखण्यात अपयशी ठरते, तेव्हा खऱ्या अर्थाने थेरपिस्टकडे जाण्याची गरज भासू लागते. अश्या केसेसमध्ये योग्य वेळी तज्ञ व्यक्तीची मदत घेणं हे कधीही फायदेशीरच ठरल्याची बरीच उदाहरणे आहेत.

थेरपी घेणे फारच लाजिरवाणे आहे असा एक घोर गैरसमज सध्या प्रचंड फोफावला असून, त्याबद्दल समाज काय विचार करेल ही एक भीती अनेकांच्या मनात घर करून बसलेली आहे. एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज आहे हे कळल्यावर त्याला कमकुवतपणाचं लेबल लावलं जातं. मुळात त्या व्यक्तीने आपल्याला मदतीची गरज असल्याचं कबूल करणे आणि आपल्या स्वास्थ्यासाठी आवश्यक ती मदत घेणे हे खरोखरच धाडसाचे लक्षण आहे. मदतीची गरज असलेल्या व्यक्तीला मानसिक अनारोग्याशी संबंधित कपोलकल्पित धारणांमध्ये बंदिस्त करू पाहणे आणि त्याची थट्टा उडवणे हाही एक प्रकारचा मानसिक आजारच आहे. या सगळ्या प्रकरणाकडे डोळसपणे पाहिल्यास तुम्हाला हे जग फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगलेलं दिसेल आणि त्याचसोबत हेही जाणवेल की इथे तर प्रत्येकालाच या मदतीची गरज आहे. प्रत्येकातच थोडासा वेडसरपणा तुम्हाला दिसेलच, त्यामुळे ‘समाज काय म्हणेल?’ या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून स्वतःसाठी भूमिका घेणे गरजेचे ठरते.

मुळात स्वतःची मनःशांती ढळू न देण्याचं आणि मानसिक आरोग्य जपायचं ‘अॅनिमल इन्स्टींक्ट’ मानवाकडे उपजतच असते. समाजभान जपताना मानसिक आरोग्याशी संबंधित विविध दिन, सोहळे साजरे करणं हे आपलं कर्तव्य आहेच, पण त्यामागच्या गुंतागुंतीच्या, किचकट, वेळखाऊ प्रक्रियेला आणि त्याला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

फक्त मानसिक स्वास्थ्याशी निगडित रकाने भरभरून वाहणारे लेख वाचत राहण्यापेक्षा स्वतःसाठी थोडा वेळ काढून आत्मपरीक्षण करायला हवं. आपली मनोवस्था सुस्थितीत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हा ‘एक उनाड दिवस’ स्वतःसोबत घालवायला हवा. जेव्हा आपण परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपोआपच ती परिस्थितीही बदलू लागते. मानसिक आरोग्याची निगा राखताना सद्य परिस्थितीला आहे तसं स्वीकारायचा आणि बदलण्याचा आत्मविश्वास वाढीस लागतो. जर मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर बदलत्या परिस्थितीनुसार वेळोवेळी तटस्थ आणि कणखर भूमिका घेऊन निर्णय घेण्यास मदत होते.

मानसिक अनारोग्याकडून उत्तम मानसिक आरोग्याकडे वाटचाल करण्याचा हा प्रवास खडतर नक्कीच आहे, खाचखळग्यांनी भरलेला आहे, या वाटेवर चालताना वारंवार निराशाही हाती लागू शकते, हा अगदीच परिपूर्ण किंवा सोपा मार्गही नाही; पण याची निष्पत्ती मात्र कायमच दिलासादायक असेल, हे नक्की! 

 (लेखिका सारा शनिया मिरांडा या व्ही. एम. साळगावकर इंस्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन (VMSIIHE), रियाच्या माजी विद्यार्थिनी आहेत)