‘द किंग ऑफ ऑल वर्ल्ड’ चित्रपटाने होणार इफ्फीचा शुभारंभ

इस्टेवान, मार्टिन यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव’

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd October 2021, 12:06 Hrs
‘द किंग ऑफ ऑल वर्ल्ड’ चित्रपटाने होणार इफ्फीचा शुभारंभ

पणजी : यंदाच्या ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इस्टेवान स्झाबो आणि मार्टिन स्कोर्सेस यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केली.
हा चित्रपट महोत्सव येत्या २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. मेस्टिस्टो (१९८१), फादर (१९६६) यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले जाणारे इस्तवान स्झाबो हे गेल्या अनेक दशकांतील समीक्षकांनी गौरवलेल्या प्रमुख हंगेरियन चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तर मार्टिन स्कॉर्सेझ हे हॉलीवूडच्या नव्या धारेतील प्रमुख व्यक्तिमत्व आहे. त्यांना चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक मानले जाते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले३० चित्रपट होणार प्रदर्शित
कार्लोस सौरा दिग्दर्शित ‘द किंग ऑफ ऑल वर्ल्ड’ (एल रे डी तोडो एल मुंडो) या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. हा या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमियर देखील असेल. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार विजेते जेन कॅम्पियन दिग्दर्शित ‘द पॉवर ऑफ द डॉग’ हा चित्रपट ‘मिड फेस्ट फिल्म’ म्हणून महोत्सवादरम्यान दाखवला जाईल. जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गौरवलेल्या ३० चित्रपटांची निवड ही ‘महोत्सव कॅलिडोस्कोप आणि वर्ल्ड पॅनोरमा’ या विभागामध्ये प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विभागात ९६ देशांतील विक्रमी ६२४ चित्रपटांचा सहभाग आहे.
ओटीटी मंचा होणार सहभागी
यंदा इफ्फीने प्रथमच ओटीटी मंचाशी संबंधित आघाडीच्या संस्थांना महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, झी५, व्हूट आणि सोनी लिव हे पहिल्यांदाच विशेष वर्ग, नव्या आशयाचे सादरीकरण आणि पूर्वावलोकन, संग्रहित चित्रपटांचे प्रदर्शन आणि इतर विविध प्रत्यक्ष तसेच आभासी माध्यमातील कार्यक्रमांद्वारे महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. ओटीटी मंचावर चित्रपट पाहण्याचा कल वाढत आहे. अशात इफ्फी हे नवीन तंत्रज्ञान प्रथमच स्वीकारत असून त्यामुळे चित्रपट उद्योगातील कलाकारांना ओटीटी संस्थांबरोबर संवाद साधण्यासाठी मंत्रालय एक व्यासपीठ प्रदान करत आहे, असे ठाकूर म्हणाले.
‘७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’चे आयोजन
७५ सर्जनशील कलावंतांना (३५ वर्षांखालील) उद्योगातील शीर्ष प्रमुखांशी संवाद साधण्यासाठी आणि महोत्सवातील विशेष वर्गांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल. देशभरातील तरुण चित्रपट निर्मात्यांसाठीच्या एका स्पर्धेद्वारे या तरुणांची निवड केली जाईल. ७५ तरुण चित्रपट निर्माते, अभिनेते, गायक, पटकथा लेखक आणि इतरांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कार्यक्रमात त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर आहे. ‘७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’साठी चित्रपट दाखल करण्याबाबतची तपशीलवार मार्गदर्शक सूचना अर्जासह www.dff.gov.in आणि www.iffi.org वर उपलब्ध आहेत.
‘ब्रिक्स’ चित्रपटांचे प्रदर्शन
यंदा ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून इफ्फीमध्ये पहिल्यांदा पाच ब्रिक्स राष्ट्रांचे चित्रपट प्रदर्शित केले जातील. ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारत हे पाच देश इफ्फीमधील लक्षवेधी देश असतील. सिंहावलोकन विभागात प्रख्यात हंगेरियन चित्रपट निर्माते बेला तार यांचे चित्रपट प्रमुख आकर्षण असतील. त्यांच्या चित्रपटांनी बर्लिन, कान आणि लोकर्नो चित्रपट महोत्सवात प्रशंसा मिळवली आहे. ते एक असे स्वतंत्र चित्रपट निर्माते आहेत ज्यांनी स्वतःची दृश्य शैली तयार केली आहे.
दरम्यान, इफ्फीमध्ये दिवंगत चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्यासह सुमित्रा भावे, बुद्धदेब दासगुप्ता, संचारी विजय, सुरेखा सिक्री, जीन-पॉल बेलमोंडो, बर्ट्रड टेवेनिअर, ख्रिस्तोफर प्लमर आणि जीन क्लॉड कॅरीअर यांना आदरांजली अर्पण केली जाईल.
वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम...
- महोत्सवात ‘इमेज अँड आर्ट्स, गोबेलिन्स-स्कूल एल इमेज’ या पॅरिस इथल्या संस्थेच्या सहकार्याने नेटफ्लिक्सतर्फे तीन दिवसीय विशेष आभासी वर्गाचे आयोजन.
- जेन कॅम्पियनच्या ‘द पॉवर ऑफ द डॉग’च्या भारतातील प्रीमियरचे नेटफ्लिक्सवरून आयोजन.
- रविना टंडन आणि आशुतोष राणा अभिनीत आगामी ‘धमाका’ चित्रपटाचे विशेष सादरीकरण.
- गुन्हे थरारपट मालिकेतील ‘अरण्यक’च्या पहिल्या भागाचे पूर्वावलोकनही.
- सोनीलिव्ह या ओटीटी मंचाने ‘स्कॅम-१९९२’ या वेबसिरीजचे पटकथा लेखक सुमित पुरोहित आणि सौरव दे यांच्या विशेष वर्गाचे आयोजन.
- झी-५ हा ओटीटी मंच इफ्फीसाठी नितेश तिवारी आणि अश्विनी अय्यर यांची पेस आणि भूपती यांच्यावर आधारित ब्रेक पॉईंट विशेष वेब सिरीजचे प्रदर्शन.