चार आमदार लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये!

आघाडीची युद्धपातळीवर तयारी; ममता बॅनर्जी २८ रोजी गोव्यात येण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st October 2021, 11:33 pm
चार आमदार लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये!

पणजी : राज्यातील एका प्रादेशिक पक्षाच्या तीन आमदारांसह आणखी एक असे एकूण चार आमदार येत्या काहीच दिवसांत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २८ ऑक्टोबर रोजी गोव्यात येणार असून, ममतांच्या उपस्थितीत या चार आमदारांना तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर राज्यातील दोन प्रादेशिक पक्ष आणि दोन अपक्ष आमदार आघाडी करून भाजपविरोधात मैदानात उतरतील, अशी चिन्हे दिसत होती. दोन प्रादेशिक पक्षांतील एका पक्षाने गेल्या वर्षभरापासून आघाडीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी व्हावी यासाठी या पक्षाच्या अध्यक्षांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती. वारंवार काँग्रेसला अल्टिमेटम दिले होते. तरीही काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव वगळता वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांच्यासह इतर एकाही नेत्याकडून युती किंवा आघाडीवर भाष्य झाले नाही. त्यामुळे कंटाळलेल्या त्या प्रादेशिक पक्षाच्या अध्यक्षाने काँग्रेसला वगळून राज्यात इतर पक्षांची आघाडी उघडण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून, त्यासंदर्भात जोरदार हालचालीही सुरू आहेत. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या प्रादेशिक पक्षाच्या अध्यक्षाने आपला पक्ष तसाच ठेवून आपल्यासोबत आपल्या पक्षाचे दोन आणि इतर एका आमदाराला घेऊन तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेस आणि भाजपने विधानसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केल्यानंतर नाराज असलेल्यांना तृणमूलमध्ये प्रवेश देऊन त्यांना त्यांच्या मतदारसंघांत उमेदवारी देणे, या काळात राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणे आणि निवडणूक निकालानंतर आवश्यकता भासल्यास काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन करणे अशा दिशेने या अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी विचार चालवला आहे. यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू असून, येत्या दोन-तीन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊनही काँग्रेसकडून युती किंवा आघाडीसाठी काहीच संकेत मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता पसरली आहे. या महिन्याच्या अखेरीस काँग्रेसने युतीसंदर्भातील भूमिका स्पष्ट न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसनेही तृणमूलला साथ देऊन पुढील वाटचाल करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार तथा तृणमूलसाठी गोव्यात काम करीत असलेल्या प्रशांत किशोर यांच्यात याबाबत चर्चाही सुरू आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ममता आल्यानंतर राजकारण आणखी तापणार!
- गोव्यात काँग्रेसला पर्याय म्हणून उभे राहण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तृणमूल काँग्रेसचा पाया भक्कम करण्यासाठी पक्षाचे खासदार डॅरेक ओब्रायन गोव्यात मुक्काम ठोकून आहेत.
- पक्ष कार्याला आणखी गती देण्यासाठी ममता बॅनर्जी स्वत: २८ रोजी गोव्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या गोव्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
- भाजपसोबत युतीसाठी एकही प्रादेशिक पक्ष तयार होत नाही. याच संधीचा फायदा घेऊन प्रादेशिक पक्षांना हातात धरून गोव्यात पाय घट्ट रोवण्याचे नियोजन प्रशांत किशोर यांच्याकडून होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

हेही वाचा