‘आम्ही’ आणि ‘ते’

आपला भारतीय समाज लेबले तयार करण्यात आणि हवी तशी, सोयीनुसार एकमेकांच्या कपाळावर चिकटविण्यात कुशल आहे. 'सभ्य','सुसंस्कृत', 'विद्वान'- अशी लेबले काही जणांना, तर, शेलक्या अपशब्दांच्या पाट्या काही जणांच्या कपाळावर.

Story: विचारचक्र | प्रा. कुलदीप कामत |
21st October 2021, 12:12 am
‘आम्ही’  आणि  ‘ते’

प्रसिद्ध नाटककार श्री. विजय तेंडुलकर यांची बालपणीची एक आठवण  वाचली होती. त्या लेखाचे शीर्षक नेमके आठवत  नाही; पण मुसलमान समाजाविषयी जनमानसात रुळलेल्या, जोपासलेल्या अगदी सर्वार्थाने  पोसलेल्या धारणांविषयी सविस्तरपणे लिहिलेले आहे. लेखाच्या सुरुवातीला लेखक मराठीमध्ये त्याकाळी  प्रचलित असलेल्या एका अनिष्ट वाक्प्रयोग/ शब्द प्रयोगाकडे लक्ष वेधतात. आज तो शब्दप्रयोग आपण करत नाही; पण नेणिवेच्या पातळीवर  तो शब्दप्रयोग आपल्या सर्व अर्थच्छटांसह ,छोट्या छोट्या क्रिया -प्रतिक्रिया  मधून सतत डोकावताना आपल्याला दिसेल. आता 'नमनालाच घडाभर तेल ओतल्यानंतर' आपली उत्कंठा अधिक ताणून न धरता तो शब्दप्रयोग सांगून टाकतो.- 'माणूस आहेस की मुसलमान'. जुन्या पिढीतील अनेक जणांनी मला सांगितले की  हा शब्द प्रयोग त्यांच्या लहानपणी त्याने सर्रास ऐकला आहे.या शब्दप्रयोगाचा भाषेच्या अंगाने विग्रह अथवा त्याचा अर्थ स्पष्ट करणे मला अतिशय गैर वाटते.  थोडा विचार करा, एखाद्या मुसलमान गृहस्थाने हा शब्दप्रयोग कधी ना कधी ऐकलाच असेल. काय वाटले असेल त्याला त्यावेळी ?

आपला भारतीय समाज लेबले तयार करण्यात आणि हवी तशी, सोयीनुसार एकमेकांच्या कपाळावर चिकटविण्यात कुशल आहे. 'सभ्य','सुसंस्कृत',  'विद्वान'- अशी लेबले काही जणांना,  तर,  शेलक्या अपशब्दांच्या  पाट्या काही जणांच्या  कपाळावर. हा धर्माचा  प्रश्न नाही. हिंदू धर्मातील अनेक जातींच्या लोकांना इतर जातींच्या लोकांनी लावलेल्या पाट्या आपण नेहमी पाहतो. या पाट्या जरी अदृश्य असल्या तरी प्रत्येक एक सच्चा भारतीय दिव्य चक्षूच्या सहाय्याने याचे वाचन सहज करू शकतो. वर सांगितलेला शब्दप्रयोग भाषेच्या चलनातून जरी रद्द झालेला असला तरी त्याच्या जोडीला अनेक शब्द प्रयोग रूढ झालेले आहेत. उदाहरणार्थ-  ' पाकडे ','टेररिस्ट',' कटवे' इत्यादी, इत्यादी.. वगैरे वगैरे... शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी 'हे विश्वची माझे घर' म्हटले म्हणून आपल्याकडे काही जणांच्या डोळ्यांच्या कडा अजूनही ओलावतात. संत एकनाथांनी गाढवाला पाणी पाजले याचा आपणाला कोण अभिमान! आणि त्याच बाजूला, आपल्याच बांधवांचा दिव्य शब्दात उद्धार!      

 हे सगळं नक्की कधी सुरू झालं याची कारणमीमांसा करणे माझ्या सीमित अभ्यास क्षेत्राच्या आवाक्याबाहेरचे आहे. पण त्याचबरोबर आजूबाजूचा घटनाक्रम पाहता ही दरी आणि 'आम्ही' आणि 'ते' ही विभागणी कायम रहावी यासाठी काही विशेष  प्रयत्न सातत्याने जोरकसरीत्या होत असतात हे नक्की ! त्याच बरोबर 'आम्ही' आणि 'ते' असा दुजाभाव न करता 'आपण' ही भावना रुजावी यासाठी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न होत असतात. पण त्याचा प्रभाव कितपत होतो हा प्रश्नच आहे.      

दोन्ही बाजूचे कट्टरवादी (माझा आवडता शब्द )एकमेकांविरुद्ध अगदी त्वेषाने बोलत असले तरी मला आतून असे वाटते ,की त्यांचे बऱ्यापैकी पैकी संगनमत असते. कारण त्यांचे दुकान परस्परांनी केलेल्या मूर्खपणावर अवलंबून असते. समाजात कट्टरता, विद्वेष एक समाज एक हाती पसरवू शकत नाही. तो पसरवण्यासाठी त्याला 'ते' विभागातील काल्पनिक,आभासी शत्रूची गरज लागते. तो मिळाला की आगलावी भाषणे (आता फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्सअपने फार मोठी सोय केली आहे त्यासाठी मनःपूर्वक आभार) केली की त्यातले अंधभक्त काही वेडेवाकडे काम करतात. यावर प्रतिक्रिया (कट्टरवाद्यांचा आवडता शब्द 'प्रतिशोध')  म्हणून 'ते'कडून गाढवपणा केला जातो. या कारणाने कट्टरतेचा पर्यायाने कटूतेचा अग्निकुंड कायम धगधगत ठेवला जातो. सर्वसामान्य माणूस ज्याला या सगळ्यांचे काही देणे घेणे नाही तो सुद्धा 'जय हो', 'निषेध', 'धिक्कार' अशी कमेंट रुपी समिधा टाकून अग्निकुंड प्रज्वलित ठेवण्याचे धर्मकृत्य  बजावतो.             'लव्ह  जिहाद' ह्या तथाकथित हत्याराचा काही जणांनी शोध लावला आहे. लग्न ही काही सिद्ध करण्याची गोष्ट नव्हे. दोन जिवांचे मिलन हा ज्याचा त्याचा पूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न. पण आता काही राज्यांनी या लव्ह जिहादाचे कारण, बागुलबुवा उभा करून आंतरधर्मीय लग्नाला कायद्याद्वारे खोडा घालण्याचा प्रयत्न केला जातो. ज्याला प्रोत्साहन द्यायचे त्यालाच विरोध! हा प्रकार  म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्ष राज्य घटनेच्या मुलभूत मूल्यांशी प्रतारणा आहे. मुळात असे धाडस का केले जाते? कायद्याच्या चौकटीत  अशा व्देषमूलक फ़तव्याला कोणताही सैद्धांतिक आधार असणारा  नाही हे माहीत असून सुद्धा. याचे कारण,अशा प्रकारे भयाची भावना निर्माण केली की, समाजातील विभिन्न धर्माच्या लोकांमध्ये  असलेल्या संवादाची जागा संशयाने व्यापते. याची  जाणीव सर्वसामान्यांना नसली तरी  ती  पेरणाऱ्यांना  निश्चितच असते. 

माणूस हा कुठल्याही धर्माचा असो; त्याचे प्रश्न, छळवणुकीच्या, शोषणाच्या जागा सारख्याच असतात. त्या सोडवण्याचे काम, किमानपक्षी त्याची जाणीव व्हावी यासाठीचे कार्य समाजातील अनेक लोक निरपेक्ष भावनेने करतात; पण धर्मवेड्यांच्या मूर्खपणामुळे या प्रयत्नावर पाणी ओतले जाते. असे काही घडले की ही शोषित माणसे आपले खरे प्रश्न विसरुन धर्माच्या कोषात जाऊन बसतात. मग करा ' पुनश्च हरि ओम'.... परिवर्तनाच्या चळवळीत  उतरलेल्यांना हाच एक उद्योग बनून  जातो. परिवर्तनाची चाके धर्म वेड्यांच्या तुलनेने सावकाशीने पडतात याचे हे प्रमुख कारण.                      दुसरा समूहाला अपराधी ठरवून त्याच्यावर तुटून पडणे, हे चुकीचे ! हे समजण्याइतके आपले समाज मन निश्चितच सजग आहे. पण या  गोष्टींचा त्याच्याकडून प्रतिकार का होत नाही? याचे कारण - या सगळ्याकडे आपण सुरक्षित जागी राहू होऊन पाहत असतो. समाजातील बहुसंख्य 'आम्ही 'वर्गातील असल्यामुळे 'ते' वर्गातील कुचंबणा आपल्याला कळते पण त्याची धग  कदाचित 'आम्ही' तील विवेकी वर्गाला जाणवत  नाही किंवा हा प्रकार अतिशय क्षुल्लक आहे, असेही कदाचित त्यांना वाटत असावे. अनिष्ट प्रकारांचे भान असलेल्या व तरीसुद्धा निषेधाचा उद्गार न काढणा-या सर्वांना ही जर्मन कवीची कविता सादर करतो.       

First   they came for the socialists and I did not speak out - Because I was not socialist.      

 then they came for the Jews, and I did not speak out-      Because I was not a Jew  Then they came for me - and there was no one left to speak for me.      

माणसाला बुद्धीची अनमोल देणगी लाभली आहे. याच्या आधारावर जगात वाट्टेल तेवढा गोंधळ घालण्याचा स्वातंत्र्य आपण उपभोगुया  पण  समाजात दुहीची बीजे पेरणाऱ्या धर्मांधांकडे आपली बुद्धी गहाण टाकण्यात कोणते शहाणपण आहे ?