देशासाठी बाहेर बसण्याची तयारी

खराब फॉर्ममुळे इंग्लंडच्या कर्णधाराची टोकाची भूमिका


20th October 2021, 10:47 pm
देशासाठी बाहेर बसण्याची तयारी

इयॉन मॉर्गन

दुबई : आयसीसी टी-२० विश्वचषकाला युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आघाडीवर आहेत. सुपर १२ मध्ये पोहोचलेले संघ सध्या सराव सामने खेळत आहेत. अशावेळी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने चक्क देशासाठी संघाबाहेर बसण्याची तयारी दाखवली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणाऱ्या इयॉन मॉर्गनने मोठी घोषणा केली असून संघाच्या विजयासाठी त्याने बाहेर बसण्याची तयारी दाखवली आहे.
इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१९चा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता. इंग्लंडने २०१० साली टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. आता इंग्लंडचे लक्ष्य दुसऱ्या विजेतेपदावर आहे. पण, यासाठीची मोठी अडचण म्हणजे स्वत: कर्णधार मॉर्गन आहे. मॉर्गनने केकेआरला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचवले असले तरी तो सध्या अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे. मॉर्गनने आयपीएलमध्ये १७ सामन्यांत ११.०८च्या सरासरीने १३३ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून खेळताना त्याने गेल्या ७ टी-२० सामन्यांत ११.७१च्या सरासरीने फक्त ८२ धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१६च्या टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारली होती. पण, वेस्ट इंडिजने त्यांचा पराभव केला होता. 

कर्णधार मॉर्गन म्हणाला...
वर्ल्डकपमध्ये मी संघासाठी अडथळा ठरणार नाही. मी फार कमी धावा केल्या आहेत. पण माझी फलंदाजी चांगली झाली आहे. मी सध्या चांगला खेळत नाही. त्यामुळेच माझ्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संघाच्या विजयासाठी माझी बाहेर बसण्याची तयारी आहे.