अग्रलेख । तृणमूलची भरती, काँग्रेसला गळती!

आज तरी देशात खरा भाजप विरोधक म्हणून तृणमूल काँग्रेसकडे पाहिले जाते. याच कारणास्तव अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते या पक्षाकडे आकृष्ट झाल्याचे चित्र गोव्यात दिसते आहे.

Story: अग्रलेख |
20th October 2021, 12:29 Hrs
अग्रलेख । तृणमूलची भरती, काँग्रेसला गळती!

पश्चिम बंगालहून थेट गोव्यापर्यंत धडक दिलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे गोव्यात आतापर्यंत काहीही संघटनात्मक काम नव्हते, असे असतानाही ज्या राज्यांत येत्या वर्षी निवडणुका होणार आहेत, अशा राज्यांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसने चालविला आहे. गोव्यात तर असंतुष्ट काँग्रेस नेत्यांची रांग तृणमूलमध्ये प्रवेशासाठी लागल्याचे दिसते. पक्षांतर करायचे तर राष्ट्रवादी काँग्रेस का नाही, आम आदमी पक्षात का प्रवेश करीत नाही, या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळून जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार कधीही ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत, कधी ते पंतप्रधानांवर तुटून पडतात, तर कधी त्यांची प्रशंसा करतात. खुद्द मोदी यांना ते आपले राजकीय गुरू वाटतात. आम आदमी पक्ष हा भाजपला जवळचा पक्ष असल्याचा उघड आरोप काँग्रेस नेते करतात. या नेत्यांना वैचारिकदृष्ट्या तृणमूल काँग्रेस पक्ष जवळचा वाटतो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमल काँग्रेसच्या अध्यक्ष या नात्याने आपल्या राज्यात नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांना दिलेली यशस्वी टक्कर त्यांचा भाजपविरोध किती कडवा आहे, हे दाखवण्यास पुरेसा आहे. त्यामुळे आज तरी देशात खरा भाजप विरोधक म्हणून तृणमूल काँग्रेसकडे पाहिले जाते. याच कारणास्तव अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते या पक्षाकडे आकृष्ट झाल्याचे चित्र गोव्यात दिसते आहे. काँग्रेसचा भाजपला विरोध तकलादू व बेभरवशाचा असल्याचे मत गोव्यातील मतदार व्यक्त करीत असल्यास त्यात नवल वाटायचे कारण नाही. भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून डॉ. प्रमोद सावंत पुढे येण्यापूर्वी एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे नाव भाजपमध्येच चर्चिले जात होते. दहा आमदारांनी एकाच वेळी भाजपमध्ये उडी घेऊन काँग्रेस पक्ष ही भाजप नामक नाण्याची दुसरी बाजू असल्याचे दाखवून दिले होते. अशा वेळी लुईझिन फालेरो यांनी गोमंतकीयांना नवी वाट दाखवली आहे. याच वाटेवरून असंतुष्ट काँग्रेस नेत्यांनी चालायला सुरुवात केली आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांतील नाराज काँग्रेस कार्यकर्ते सरळ तृणमूलची वाट धरत आहेत. ही गळती कशी थांबवावी, याची चिंता गिरीश चोडणकर, दिगंबर कामत, रेजिनाल्ड लॉरेन्स यांना सतावत असल्यास नवल नाही. पक्षात चैतन्य निर्माण करण्याचा ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा खटाटोप वाया जातो की काय असे वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यामागे अन्य काही कारणे असू शकतात. तृणमूल काँग्रेस आर्थिकदृष्ट्या सबळ आहेच, शिवाय ममतांच्या खंबीर नेतृत्वाचे आकर्षण आहे. याउलट काँग्रेसची केंद्रीय पातळीवर अवस्था आहे. गोव्यातील आणखी काही नेते भविष्यात तृणमूल काँग्रेसमध्ये जातील असे संकेत मिळत आहेत, त्यात काँग्रेसचे नेते तर आहेतच, अन्य एका प्रादेशिक पक्षाचे नेते याकामी ‘फॉरवर्ड’ असल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत काँग्रेस सावरणे ना केंद्रातील नेत्यांना शक्य आहे, ना स्थानिक नेत्यांची तेवढी कुवत आहे.
गोव्याचे लोक अजीब असल्याचे पहिले पंतप्रधान पं. जवाहलाल नेहरू यांनी म्हटले होते, असे सांगितले जाते. गोव्याचे राजकारण ज्या प्रकारे सुरू आहे, ते पाहाता गोव्याचे मतदार आणि नेते नेहमीच अनपेक्षितरीत्या वागले, याचा प्रत्यय येतो. देशात इंदिरा लाट आली, त्यावेळी इंदिरा काँग्रेसला डावलून त्यावेळच्या फुटीर काँग्रेस अर्स या पक्षाला गोमंतकीयांनी निवडून आणून सत्ता बहाल केली. मात्र हे सारेच लोकप्रतिनिधी एका रात्रीत इंदिरा काँग्रेसवासी झाले आणि राज्यात प्रथमच काँग्रेस सरकार सत्तेवर आले. पक्षांतरातही गोव्याने कोणीही केले नसतील असे विक्रम प्रस्थापित केले आहेत. भाजपला हरवून काँग्रेसच्या चिन्हावर निवडलेले आमदार राजीनामा देऊन पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन मिजास दाखवत असल्याचे चित्र याच गोव्यात दिसले. दोन वर्षापूर्वी तर विकासाच्या नावाने विरोधी पक्षनेत्यासह दहा आमदार भाजपमध्ये एकगठ्ठा सामील झाले होते, तर मगोचे दोन आमदार सहजपणे एकाला मागे ठेवून सत्तेत सहभागी झाले. सर्वांनाच विकासाची एवढी ओढ लागलेली प्रथमच या राज्यात दिसली. अशा प्रकारे आपला तह्रेवाईकपणा लोकांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी अनेक वेळा केवळ सिद्ध केला असे नाही, तर देशातील राजकारण्यांना नको तो धडा घालून दिला. पुन्हा एकदा राज्यात अजिबात अस्तित्व नसलेल्या तृणमूल काँग्रेसकडे नेते व कार्यकर्ते ज्या पद्धतीने धाव घेत आहेत, ते पाहाता काँग्रेसला लागलेली गळती थांबवणे अशक्य आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.